शेतजमीन सौदे प्रकरणात ७ लाख रूपये घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून पारवा पोलीसांनी माजी जि.प.सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार यांचेविरूद्ध कलम ४१७, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी या प्रकरणात न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रीया संहिता कलम १५६ (३) अन्वये घाटंजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंग संधु यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करून ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जयप्रकाश काटपेल्लीवार यांचे कुर्ली येथिल शेत गट क्रं ४/१ जमिन आहे. यापैकी ४ हेक्टर ८० आर जमिन त्यामधील विहीर व विद्युत मोटरपंपासह विक्रीचा करार सौदेपत्र फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांचेसोबत दि. १९ मे २००९ रोजी झाला होता. ईसारा दाखल ७ लाख रूपये विक्रीचा करारनामा नोंदवुन घेतला. मात्र त्यानंतर ठरलेल्या तारखेवर काटपेल्लीवार हे दुय्यम निबंधक कार्यालयात जमिन खरेदी करून देण्यासाठी आले नाही. त्यामुळे त्यांनी सौदेपत्राच्या अटी नियमांचे पालन न करून फसवणुक केली आहे. त्यामुळे फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांनी १३ जुलै रोजी पारवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र राजकीय दबावातून पारवा पोलीसांनी या प्रकरणात चौकशी केली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment