Pages

Saturday, 11 August 2012

घाटंजीत बारा फूटाच्या अजगरास सर्पमित्रामुळे जीवदान




तालुक्यातील सायखेडा (आंबा) शिवारात आढळलेल्या तब्बल १२ फूट लांबीच्या विशाल अजगरास सर्पमित्रामुळे जीवदान मिळाले. शिवारात काही मुले शेळ्या चारत असतांना त्यांना एक विशाल साप शेळीच्या पिलाला गिळंकृत करीत असतांना दिसला. ही सर्व मुले भयभीत होऊन गावाच्या दिशेने पळाली. लगेच अनेक गावकरी या अजगराला मारण्याच्या उद्देशाने घटनास्थळी आले. ताराच्या फासामध्ये पकडून गावात मारण्यासाठी नेत असतांना काही प्राणीमित्र युवकांनी त्यांना अडविले. त्यांच्यापैकी सुनिल वाडे या युवकाने घाटंजी येथिल सर्पमित्र जितेंद्र सहारे यांना याबाबत कळविले. सहारे हे तातडीने पशुचिकीत्सक डॉ.दिनेश गाऊत्रे यांचेसह घटनास्थळ गाठले. गावक-यांकडून अजगर ताब्यात घेऊन त्याचेवर प्रथमोपचार केले. त्यानंतर त्याला घाटंजी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी यवतमाळ येथिल सहाय्यक वनसंरक्षक वानखडे, घाटंजीचे वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड.राठोड, वनपाल कुमरे यांचेसह सर्व वनकर्मचा-यांनी या दुर्मीळ अजगरास जीवदान दिल्याबद्दल सर्पमित्र व त्यासाठी सहकार्य करणा-या सर्वांचेच कौतुक केले. वनकर्मचा-यांच्या मदतीने या अजगरास नंतर टिपेश्वर अभयारण्यामध्ये सोडण्यात आले. यावेळी सर्पमित्र जितेंद्र सहारे म्हणाले की, अजगर हा बिनविषारी साप असुन त्याच्याबद्दल ग्रामिण भागात अनेक गैरसमज आहेत. त्याला आर किंवा चितीण या नावानेही ओळखल्या जाते. हा साप विषारी घोणस सदृष असल्याने लोक त्याला विषारी समजुन मारतात. तसेच तो दुधाळ जनावराच्या पायाला विळखा मारून दुध प्यायल्याने जनावराचे दुध वाढते असाही गैरसमज आहे. मात्र हा साप मांसाहारी असुन दुध कधीच पित नाही. घाटंजी तालुक्याच्या परिसरात विसच्या वर सापाच्या जाती आढळतात. त्यापैकी मण्यार, नाग, फुरसे व घोणस या चारच जाती विषारी आहेत. काहीजण सापाची कातडी व विषाच्या तस्करीकरीता मारतात. मात्र सापांना मारणे, त्यांची तस्करी करणे, सापाचे खेळ करणे वन्यजीव कायद्यांतर्गत दंडनीय अपराध आहे. सहारे यांनी आजवर हजारो सापांना पकडून जीवदान दिले आहे. जर आपल्या घराच्या परिसरात साप निघाला तर त्याला न मारता जवळच्या सर्पमित्राशी  किंवा  वनकर्मचा-यांशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
साभार :- देशोन्नती 


घाटंजी शहरात कुठेही साप निघाल्यास संपर्क करा 

जितेंद्र सहारे (सर्पमित्र), घाटंजी
मोबाईल क्रमांक :- ९९७५७५६७६६

अजगराबद्दल अधिक माहिती........!
अजगर हा उष्ण कटिबंधात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारत, सुमात्रा व जावा या प्रदेशात अधिक आढळते. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर अँनॅकाँडा म्हणून ओळखले जातात.

पायथॉन रेटिक्युलेटस या सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मी. पर्यंत तर घेर २५ सेंमी. आढळला आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ दोन पायांच्या अवशेषांची दोन नखे स्पष्टपणे दिसतात. आतल्या बाजूला या नखांना लागून पायांची घटलेली हाडेसुद्धा असतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते.
हा सर्प बोजड असला तरी भक्ष्य पकडताना तो कमालीची चपळाई दाखवतो. प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. त्याच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. परिणामी अजगराच्या विष्ठेमध्ये फक्त केस, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात. एकदा हरिणासारखे भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगराला सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करण्याची गरज भासत नाही.
जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मीलनकाळ असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी ८ - १०० अंडी घालते. पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते. शरीराचे आकुंचन-प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंड्यांसाठी ऊब निर्माण करते.
मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नाही. तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू मात्र आहे. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते. म्हणूनच अजगराची चोरटी शिकार आणि त्याच्या कातड्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते.
फार मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत. भारत सरकारने अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी घातली आहे.

No comments:

Post a Comment