Pages

Sunday 12 August 2012

पुरग्रस्तांचे जीवन उभारणारा कार्यक्रम राबवणार

मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक शब्द



















 




अतिवृष्टीने आलेल्या पुरामध्ये ज्यांचे सर्वस्व वाहुन गेले त्यांचे जीवन नव्याने उभारणारा कार्यक्रम राबविणार या आश्वासक शब्दांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.पृथ्वीराज चव्हाण यांनी घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्तांचे सांत्वन केले. पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौ-यामध्ये कोळी (बु.) येथे पुरग्रस्तांना संबोधीत करतांना ते बोलत होते. पुररेषेखाली येणा-या धोकादायक गावांचे सुरक्षीतस्थळी पुनर्वसन करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, पुनर्वसनाबाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगीतले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री ना.नितिन राऊत, सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासनमंत्री ना.मनोहर नाईक, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके,  आमदार निलेश पारवेकर, विजय खडसे, वामनराव कासावार, संजय राठोड, संजय देशमुख यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरग्रस्तांशी हितगूज करतांना ते पुढे म्हणाले की, कधी नव्हे एवढा महापुर या भागात आला. ढगफुटीमुळे एकाच दिवशी तब्बल २९० मि.ली.पावसाची विक्रमी नोंद झाली. प्रशासकीय यंत्रणा झालेल्या नुकसानाचे पंचनामे करीत आहे. मात्र कुटूंबांचे झालेले नुकसान केवळ पंचनाम्याने कधीच भरून निघणार नाही. पुरात जीवन किती उध्वस्त होते याची जाणीव असल्याचे ते यावेळी म्हणाले. अतिवृष्टीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळे पुराचा धोका असलेल्या गावांचे गावापासुन जवळ असलेल्या सुरक्षीतस्थळी पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिथे जमिन मिळणार नाही तिथे अधिग्रहण करून पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातील. घाटंजी तालुक्याचा परिसर रम्य आहे. येथिल शेतकरी कष्टाळू आहे. योग्य सोयीसुविधा मिळाल्या तर आत्महत्याग्रस्त परिसरातील शेतकरी सुखी होऊ शकतील. या भागातील शेतक=यांनी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल त्यासाठी शासन अनुदान सुद्धा देईल असे त्यांनी सांगीतले. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पुरग्रस्तांच्या दु:खात सहभागी असुन त्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दुपारी १२ वाजुन ५० मिनीटांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोळी (बु) येथे पोहचला. आमदार निलेश पारवेकर हे स्वत: मुख्यमंत्री बसुन असलेली पजेरो गाडी चालवित होते. याच गाडीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, पालकमंत्री ना.नितीन राऊत हे देखिल होते.  कोळी (बु) चे उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांनी मुख्यमंत्र्यांना गावात झालेल्या भिषण नुकसानाची माहीती दिली. रामपुर प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पुराम व त्यांच्या चमुकडून मुख्यमंत्र्यांनी या भागातील आरोग्य विषयक बाबींबद्दल विचारणा केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी विवीध संघटना व नागरिकांची निवेदने स्विकारून त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.  कवठा (खु.), चांदापुर (आश्रम), किन्ही, विरूळ, कोळी (खु.), कापसी (कोपरी) या पुराने सर्वाधीक बाधीत झालेल्या गावातील अनेक ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांपुढे आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी कोळी (बु) येथे जमले होते.


पुरग्रस्तांना मायेचा आधार द्यावा - ना.मोघे

घाटंजी तालुक्यात प्रथमच पुरामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी भरीव मदत करून पुरग्रस्तांना मायेचा आधार द्यावा अशी मागणी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केली. पुरग्रस्तांसाठी सध्या घराची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे लाभार्थ्याची उत्पन्न मर्यादा न पाहता सर्व पुरग्रस्तांना सरसकट घरे देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

हारतुरे स्वागत स्विकारले नाही

आपल्या गावात राज्याचे मुख्यमंत्री येणार या आशेने सुखावलेल्या पुरग्रस्त कोळी गावातील ग्रामस्थांनी आपल्या वेदना विसरून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी केली होती. ग्रामिण भागातील परंपरेनुसार कार्यक्रमस्थळी पाय धुवायला पाणी ठेवले होते. तसेच स्वागतासाठी पुष्पहार आणण्यात आले होते. मात्र कोणत्याही प्रकारच्या स्वागतास मुख्यमंत्र्यांनी नम्र नकार दिला. केवळ कपाळी अक्षत लावुन घेतल्यावर त्यांनी लगेच गावाची पाहणी करण्यासाठी प्रस्थान केले.

फलकातूनही दिसली पुराची भिषणता

पावसाच्या पाण्याने सर्वस्व वाहुन गेलेल्या ग्रामस्थांनी आपल्या गावाची ओळख दाखविण्यासाठी आणेलेले फलक सुद्धा पावसाची भिषणता दाखवित होते. कुणी वापरण्यासाठी असलेल्या एकमेव उपरण्यावर गावाचे नाव लिहीले होते तर कुणी फाटक्या धोतराच्या कापडावर. गावाचे नाव लिहीलेले कापड सुद्धा पावसात भिजल्याने नावे धुसर झाली होती. या भिजलेल्या कापडांमधुन गावात पावसाने घातलेल्या थैमानाचे चित्र स्पष्ट दिसत होते.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती  

छायाचित्र सौजन्य :-
संदिप डिजीटल फोटो स्टुडीओ, शिरोली 
(प्रो.प्रा.संदिप वानखडे), Mob.No.9421770650
निलेश जुनगरे, शिरोली




No comments:

Post a Comment