ढोलताशाचा गजर, गुलालाची मुक्त उधळण व उत्साहाने भारलेल्या वातावरणात घाटंजीत नवरात्रौत्सवाची सांगता झाली. यादरम्यान कुठेही अनुचीत घटना घडल्याचे वृत्त नाही. घाटंजी शहराच्या दुर्गोत्सवाला सामाजीक सद्भावनेची अनोखी परंपरा असल्याने सर्वधर्मीय नागरिक या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतात. यावर्षी दुर्गा विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी घाटंजीकरांची गर्दी जमल्याने शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ, नवयुवक दुर्गोत्सव मंडळ, पंचमहा दुर्गोत्सव मंडळ, जय बजरंग दुर्गोत्सव मंडळ, नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ, आदर्श दुर्गोत्सव मंडळ, युवाशक्ती दुर्गोत्सव मंडळ या प्रमुख मंडळांसह अनेक ईतरही मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले होते. वैविध्यपुर्ण ढोलताशांमुळे मिरवणुकीला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले होते.
परळी वैजनाथ, डोंगरगढ, देवगाव, नाचणगाव, नागपुर, यवतमाळ यासह विवीध ठिकाणचे ढोलताशा पथक यावर्षी आणण्यात आले होते. नवयुवक दुर्गोत्सव मंडळाने लावलेले स्त्री भ्रुणहत्या विरोधी फलक लक्ष वेधुन घेत होते. मिरवणुकीच्या मार्गावर स्व. देविदास महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ रूपाली ट्रेडर्स तर्फे, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी मित्र मंडळ, राम अग्रवाल, संतोष झाडे, सुरेश चौधरी, लक्ष्मण नागरीकर यांचेतर्फे महाप्रसाद व पाण्याचे स्टॉल भक्तांकरीता ठेवण्यात आले होते. उल्लेखनिय म्हणजे काही स्टॉलवर मुस्लिम नागरीकही स्वयंस्फूर्तीने महाप्रसाद वितरीत करतांना दिसत होते. घाटंजी तालुक्यातील अनेक दुर्गोत्सव मंडळांमध्ये मुस्लिम धर्मीय पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. बकरी ईद व दुर्गा विसर्जन एकाच कालावधीत आल्याने अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण असतांना घाटंजीकरांनी मात्र सामाजीक सौहार्दाचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे.
विसर्जन मिरवणुकी दरम्यान घाटंजी पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता. जुना बसस्थानक चौकात दोन ढोलताशा पथकांमध्ये लागलेल्या स्पर्धेमुळे सुमारे तिन ते चार तास वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलीसांनी सांगितल्यावरही ते तिथुन हटले नाही हे विषेश.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment