Pages

Saturday, 13 October 2012

शेतक-यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यास वचनबद्ध - सभापती अभिषेक ठाकरे


बाजार समितीच्या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ करून शेतक-यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यास वचनबद्ध असल्याचे बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी समितीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलतांना सांगितले. या सभेला प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, विशेष अतिथी म्हणुन भुविकास बँकेचे माजी अध्यक्ष शंकर ठाकरे, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच घाटंजी न.प.चे उपाध्यक्ष अकबर तंव्वर, सभापती राम खांडरे, संजय इंगळे, माणिक मेश्राम, श्याम बेलोरकर, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सभापती ठाकरे पुढे म्हणाले की, बाजार समितीला जास्तीत जास्त प्रमाणात  शेतकरीभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी गुरांच्या बाजाराचा लिलाव पद्धतीने  कंत्राट देऊन समितीच्या उत्पन्नात तिपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात महापुराने तालुक्यात झालेल्या नुकसानानंतर कोळी, कवठा, कोपरी या गावात सर्वप्रथम मदतीचा हात देण्यात घाटंजी बाजार समिती पुढे होती असे ते म्हणाले. शेतक-यांना दिलेल्या आश्वासनानुसार बाजार समितीचे संगणकीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असुन शासनाच्या मंजुराती नंतर लवकरच समितीचे कार्यालय संगणकीकृत होईल अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासुन तालुक्यातील शेतक-यांसाठी बाजार समितीत योग्य सोयी उपलब्ध नाहीत. अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळातच शेतक-यांच्या सुविधेसाठी कोट्यवधी रूपयांची बांधकामे सुरू झाल्याचे पाहुन पोटशुळ उठलेल्या विरोधकांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून ही कामे बंद पाडण्याचे उद्योग सुरू केले आहेत. अशावेळी शेतक-यांनी संघटीत होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे भावनिक आवाहन बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे यांनी केले.
वार्षीक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन व आभार प्रदर्शन समितीचे सचिव कपील चन्नावार यांनी केले. सभेचे संचालन र.मा.देशमुख यांनी केले. या सभेला तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, त्यांचे प्रतिनिधी, विवीध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष तथा शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती  

No comments:

Post a Comment