Pages

Showing posts with label घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती. Show all posts
Showing posts with label घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती. Show all posts

Monday, 8 December 2014

घाटंजी बाजार समितीत सी.सी.आय.ची खरेदी सुरू व्हावी

सभापती अभिषेक ठाकरे यांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे
कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी अंतर्गत केंद्र शासनाच्या हमी भावानुसार सी.सी.आय. ची खरेदी सुरू करावी अशी मागणी बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा या भागाचे खासदार हंसराज अहिर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे. 
बाजार समितीच्या काही संचालकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी नुकतीच ना.अहिर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या मागणीचे निवेदन त्यांना दिले. दरवर्षी घाटंजी येथे सी.सी.आय.चे खरेदी केंद्र सुरू असते. मात्र यावर्षी अद्याप पर्यंत खरेदी सुरू करण्यात आली नाही. बाजार समितीने या संदर्भात सी.सी.आय.च्या अकोला विभागीय कार्यालयाशी लेखी व दुरध्वनी द्वारे वेळोवेळी पाठपुरावा देखील केला. 
मात्र सदर कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. सी.सी.आय.ची खरेदी सुरू न झाल्याने शेतक-यांना कवडीमोल भावात कापुस विकण्याची पाळी येत आहे. शेतक-यांची ही अडचण लक्षात घेऊन माजी आमदार व पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर यांच्या माध्यमातून सभापती अभिषेक ठाकरे यांनी ना.अहिर यांची भेट घेऊन सदर समस्या त्यांच्या निदर्शनास आणुन दिली. 
वारंवार दुष्काळाचे फटके झेलत असलेल्या शेतक-याच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा अशी घाटंजी बाजार समितीची आग्रही भुमिका असुन सी.सी.आय.ची खरेदी सुरू झाल्यास तालुक्यासह परिसरातील शेतक-यांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे ना.अहिर यांनी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी सभापती अभिषेक ठाकरे यांनी केली. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे, माजी नगराध्यक्ष राम खांडरे, सचिन पारवेकर, विवेक भोयर, अशोक यमसनवार, यांचेसह मान्यवर उपस्थित होते.


Wednesday, 5 December 2012

तोडफोडीचा खटला मागे घेण्यासाठी मनसेचे ‘ब्लॅकमेलिंग’

कृऊबास सभापती अभिषेक ठाकरे यांचा आरोप

दोन वर्षांपुर्वी मनसे कार्यकर्त्यांनी बाजार समिती मार्केट यार्ड व कार्यालयात केलेल्या तोडफोडप्रकरणी न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घ्यावा यासाठीच मनसे तक्रारींच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करीत असल्याचा आरोप कृ.ऊ.बा.स.सभापती अभिषेक ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला. आधारहीन तक्रारींमुळे केवळ कामात अडथळे निर्माण होत असुन त्यामुळे शेतक-यांचेच नुकसान होत आहे. घाटंजी बाजार समिती शेतक-यांच्या फायद्याचे उपक्रम राबवित आहे. अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय राहावा कोणत्याही घटकाचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समिती प्रयत्नशिल आहे. व्यापा-यांवर आमचे पुर्ण नियंत्रण आहे. शेतक-यांवर कुठेही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही दक्ष आहोत. खासगी बाजार समित्यांमुळे बाजारात स्पर्धा वाढल्याने व्यापा-यांप्रती टोकाच्या सक्तीचे धोरण अवलंबिता येत नाही. कारण व्यापारीच नसतील तर माल खरेदी कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तब्बल दोन कोटी रूपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प बाजार समितीने सुरू केला आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास आल्यावर शेतक-यांना सर्व सुविधा प्राप्त होतील. मात्र मनसेचे पदाधिकारी तसेच काही शेतकरी विरोधकांनी केलेल्या अर्थहीन तक्रारींमुळे हे काम रखडले. राजकीय दबावातून चुकीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम झाले असते तर ईलेक्ट्रॉनिक काट्यांच्या सहाय्याने कापुस मोजूनच थेट जिनिंगमध्ये पाठविता आला असता. एकीकडे मनसेचे कार्यकर्ते जिनिंगचे वजनकाटे सदोष असल्याच्या तक्रारी करतात. तर दुसरीकडे बाजार समिती मार्केट यार्डमध्ये उभारत असलेल्या ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांसह ईतर विकासकामांच्या तक्रारी करतात. त्यामुळे त्यांना नेमके काय अपेक्षीत आहे? याबाबत मनसेने आपली भुमिका स्पष्ट करावी असे ते म्हणाले. न.प.ने आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मग यावर आता तक्रारकर्त्यांनी माघार का घेऊ नये? या तक्रारींमुळे विधी विषयक कामांमध्ये बाजार समितीचा व्यर्थ खर्च होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर्षी शेतमाल तारण योजनेला शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रकल्पातील गोदाम पुर्णत्वास आले असते तर तिप्पट शेतक-यांना त्याचा फायदा झाला असता. व्यापा-यांकडून शेतक-यांचे शोषण होऊ नये म्हणुन सर्वत्र माहिती फलक लावण्यात आले आहेत. वजनकाट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी निरिक्षक नेमण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 
बाजार समितीच्या होत असलेल्या तक्रारी केवळ राजकीय हेतूने प्रेरीत व स्वत:च्या फायद्यासाठी असुन त्यामुळे शेतक-यांचे नुकसानच होत असल्याने शेतक-यांनीच याचा विचार करावा असेही ठाकरे म्हणाले. यावेळी उपसभापती प्रकाश डंभारे, सचिव कपिल चन्नावार उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती 


Saturday, 13 October 2012

शेतक-यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यास वचनबद्ध - सभापती अभिषेक ठाकरे


बाजार समितीच्या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ करून शेतक-यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यास वचनबद्ध असल्याचे बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी समितीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलतांना सांगितले. या सभेला प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, विशेष अतिथी म्हणुन भुविकास बँकेचे माजी अध्यक्ष शंकर ठाकरे, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच घाटंजी न.प.चे उपाध्यक्ष अकबर तंव्वर, सभापती राम खांडरे, संजय इंगळे, माणिक मेश्राम, श्याम बेलोरकर, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सभापती ठाकरे पुढे म्हणाले की, बाजार समितीला जास्तीत जास्त प्रमाणात  शेतकरीभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी गुरांच्या बाजाराचा लिलाव पद्धतीने  कंत्राट देऊन समितीच्या उत्पन्नात तिपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात महापुराने तालुक्यात झालेल्या नुकसानानंतर कोळी, कवठा, कोपरी या गावात सर्वप्रथम मदतीचा हात देण्यात घाटंजी बाजार समिती पुढे होती असे ते म्हणाले. शेतक-यांना दिलेल्या आश्वासनानुसार बाजार समितीचे संगणकीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असुन शासनाच्या मंजुराती नंतर लवकरच समितीचे कार्यालय संगणकीकृत होईल अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासुन तालुक्यातील शेतक-यांसाठी बाजार समितीत योग्य सोयी उपलब्ध नाहीत. अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळातच शेतक-यांच्या सुविधेसाठी कोट्यवधी रूपयांची बांधकामे सुरू झाल्याचे पाहुन पोटशुळ उठलेल्या विरोधकांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून ही कामे बंद पाडण्याचे उद्योग सुरू केले आहेत. अशावेळी शेतक-यांनी संघटीत होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे भावनिक आवाहन बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे यांनी केले.
वार्षीक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन व आभार प्रदर्शन समितीचे सचिव कपील चन्नावार यांनी केले. सभेचे संचालन र.मा.देशमुख यांनी केले. या सभेला तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, त्यांचे प्रतिनिधी, विवीध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष तथा शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती  

Wednesday, 15 August 2012

सोसायटीचे नाव बदलण्यावरून आमसभेत गोंधळ


स्थानिक घाटी घाटंजी विवीध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आमसभेत आज संस्थेचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीतच सभा तहकुब करावी लागली. काही सदस्यांनी दप्तर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने अखेर पोलीसांना पाचारण करण्यात आले.
घाटी घाटंजी सहकारी सोसायटीची आमसभा येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली होती. या संस्थेचे नाव बदलुन सहकार महर्षी बाळासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्था म.घाटंजी असे करण्यासंबंधीचा आमसभेतील विषय पत्रिकेवरील ठराव क्रमांक सात सचिव शेंडे यांनी वाचुन दाखविला. यावरून आमसभेत गोंधळाला सुरूवात झाली. नाव बदलण्याला विरोध दर्शविण्यात आला. नाव बदलण्याची गरजच काय आहे? जे आहे तेच नाव कायम ठेवण्यात यावे अशी मागणी अनेक सदस्यांनी केली. सभेत गोंधळ व तणाव वढत असल्याचे निदर्शनास येताच अध्यक्ष पुंडलीक वघरे यांनी आमसभा तहकुब केली. 
या गोंधळामध्येच आमसभेत उपस्थित असलेले आमदार निलेश पारवेकर, जि.प.सदस्य योगेश पारवेकर सभागृहातून बाहेर पडले. या दरम्यान सदस्यांनी दप्तर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने संस्थेचे सचिव व कर्मचारी गर्दीच्या गराड्यात सापडले. वातावरण संतप्त होत असल्याने तातडीने पोलीसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी आपल्या ताफ्यासह सभास्थळी येऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सदर संस्थेची स्थापना गोविंदराव चंपत ठाकरे यांनी १९६० साली केली. या संस्थेचा विस्तार तब्बल ३२ गावात असुन ६ हजार ७५० सभासद आहेत.
साभार :- देशोन्नती  

Saturday, 21 July 2012

घाटंजी बाजार समितीच्या गोदामावर व्यापा-यांचा कब्जा

मनसेच्या धडकेत पितळ उघडे



शेतक-यांचे धान्य साठविण्यासाठी असलेल्या गोदामात फक्त व्यापा-यांचीच धान्य पोती ठेवून असल्याचे सत्य मनसेने धान्य यार्डावर दिलेल्या धडकेत समोर आले.
काही शेतक-यांच्या तक्रारीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी कार्यकत्र्यांसह धान्य यार्डावर जाऊन पाहणी केली असता शेतमाल तारण योजनेचे धान्य ठेवण्यासाठी असलेल्या गोदामात नामदेव आडे व अविनाश भुरे या व्यापा-यांच्या मालकीचे सुमारे ७५० धान्याची पोती या गोदामात असल्याचे आढळले. तसेच इतरही गोदामात फक्त व्यापा-यांचाच माल ठेवून असल्याचे निदर्शनास आले. उल्लेखनिय म्हणजे नामदेव आडे हे घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. ते स्वत:च बाजार समितीच्या गोदामावर कब्जा करीत असतील तर शेतक-यांनी आपले धान्य कुठे ठेवायचे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. 
जे गोदाम शेतक-यांनी आणलेले धान्य ठेवण्यासाठी वापरल्या जाणे अभिप्रेत आहे तिथे व्यापारीवर्ग जागा काबिज करून ठेवत असल्याने शेतक-यांची प्रचंड हेळसांड होते. बाजार समिती प्रशासनही व्यापारी व त्यांना संरक्षण देणारे राजकीय नेते यांच्या दबावाखाली राहुन व्यापा-यांना खुली सुट देत असल्याचे दिसुन येत आहे.
शेतक-यांच्या गोदामावर मालकी हक्क समजणारे बाजार समितीचे संचालक नामदेव आडे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून कोणतेही भाडे न देता गोदाम वापरल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रशांत धांदे यांनी यावेळी केली.
यासंदर्भात बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांना विचारणा केली असता शेतक-यांचा माल सध्या उपलब्ध नसल्याने काही व्यापा-यांना दोन महिन्यांसाठी या गोदामात धान्य ठेवण्याची मुभा देण्यात आल्याची बाब त्यांनी कबुल केली.
मात्र शेतक-यांची तक्रार असेल तर तिन चार दिवसात गोदाम रिकामे करून घेतल्या जाईल असे त्यांनी सांगितले. घाटंजी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांची प्रतिक्रीया घेतली असता ते म्हणाले की, व्यापा-यांमध्ये स्पर्धा टिकवून ठेवण्याकरीता समितीला अनेकदा परिस्थितीनुरूप लवचिक धोरण अवलंबावे लागते. मात्र हे करतांना शेतकरी डावलल्या जातात हा आरोप साफ चुकीचा आहे. व्यापारी असतील तरच शेतक-यांचा माल योग्य दरात विकल्या जाईल. व्यापा-यांना झिडकारून चालणार नाही असे ते म्हणाले. शेतक-यांच्या मालाची आवक नसल्याने व व्यापा-यांनी विनंती केल्याने काही कालावधीसाठी गोदाम देण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 7 March 2012

शेतक-यांच्या पायाभूत सुविधांसाठी दोन कोटींचा निधी

बाजार समितीला प्रगतीपथावर नेऊ- अभिषेक ठाकरे 
घाटंजी बाजार समिती यार्डावर उद्या विकासकामांचे भुमिपूजन

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्प योजनेंतर्गत घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीला पहिल्या टप्प्यात दोन कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून येथिल मार्केट यार्डामध्ये शेतक-यांसाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. दि. ९ मार्चला सकाळी ८.३० वाजता या विकासकामांचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन लोकनेते सुरेश लोणकर, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे यांचेसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 
या निधीतून मार्केट यार्डाला संरक्षक भिंत, २ गोडाऊन, हर्रास शेड, पाण्याची टाकी, धान्य चाळणी यंत्र, ५० टन वजन काटा, प्रसाधनगृह यासह यार्डाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तर दुस-या टप्प्यात ऑनलाईन संगणकीकृत लिलाव सुविधा सुरू करण्यात येणार असुन निवडणुकीच्या वेळी शेतक-यांना दिलेल्या प्रत्येक आश्वासनांची पुर्तता करणार असल्याचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगीतले.  या कार्यक्रमाला शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
साभार :- देशोन्नती 

कापसाचे भाव पडल्याने शेतक-यांचे अवसान गळाले

घाटंजीत शेकडो वाहने यार्डातून परतली



केंद्र शासनाने कापुस निर्यातबंदी केल्याने कापसाच्या भावात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे मार्केट यार्डामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असल्यामुळे शेतक-यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षेने 
आजवर संग्रहीत ठेवलेला कापुस विक्रीस काढला होता. आज सुमारे ३०० ते ४०० कापसाची वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात लागलेली होती. मात्र आज कापुस खरेदी करणारे व्यापारीच यार्डात आले नसल्याने पेच निर्माण झाला होता. बाजार समिती कर्मचा-यांनी परिस्थिती शेतक-यांसमोर सांगताच काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. गतवर्षी यार्डामध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे तातडीने पोलीसांना पाचारण करण्यात आले. महसुल विभागाच्या अधिका-यांनी यार्डावर येऊन शासनाच्या निर्णयामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगीतल्यावर तणाव निवळला. त्यानंतर मोठ्या अपेक्षेने शेतक-यांनी विक्रीस आणलेला कापुस घरी परत नेला. कर्जफेडीच्या महिन्यातच शेतक-यांवर कोसळलेल्या या संकटामुळे शेतक-यांचे अवसान गळाले असुन कापुस परत न्यावा लागल्याने गाडी भाड्याचा आर्थिक भुदंड शेतक-यांना नाहक सहन करावा लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.
साभार :- देशोन्नती  

Monday, 12 September 2011

घाटंजी बाजार समिती सभापतीपदी अभिषेक ठाकरे उपसभापतीपदी प्रकाश डंभारे

ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडी नंतर घाटंजी बाजार समिती सभापती पदाची माळ अखेर आमडीचे सरपंच अभिषेक ठाकरे यांच्या गळ्यात पडली. तर उपसभापतीपदी प्रकाश डंभारे यांची निवड झाली. सभापती-उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटांना सारखीच मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. बाजार समिती निवडणुकीत मोघे-लोणकर व अण्णासाहेब-निलेश पारवेकर या दोन मुख्य गटात निवडणुक झाली. त्यात मोघे-लोणकर गटाचे बहुमत आले. मात्र आज ना.मोघेंचे समर्थक देवानंद पवार यांनी वेगळी चुल मांडल्याने या गटात फुट पडली. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत सत्तास्थापनेचा दांडगा अनुभव असलेल्या सुरेश लोणकरांनी पारवेकर गटाला हाताशी घेऊन बाजार समितीवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यामुळे देवानंद पवार तोंडघशी पडले आहेत. नवनियुक्त सभापती अभिषेक ठाकरे हे लोणकरांचे समर्थक आहेत तर उपसभापती प्रकाश डंभारे हे पारवेकरांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आज झालेल्या निवडणुकीत लोणकर पारवेकर गटाकडून सभापतीपदासाठी अभिषेक ठाकरे तर उपसभापती पदासाठी प्रकाश डंभारे यांनी नामांकन दाखल केले होते. तर मोघे-पवार गटाकडून रमेश आंबेपवार व सचिन ठाकरे यांचे नामांकन होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणल्या गेल्याने दोन्ही गटांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. निवडणुकीनंतर विजयी मिरवणुक काढण्यात आली. त्यामध्ये जि.प.सदस्य सुरेश लोणकर, राष्ट्रवादीचे सहकोषाध्यक्ष सतिष भोयर, माजी सभापती सचिन पारवेकर यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Monday, 22 August 2011

घाटंजी बाजार समिती निवडणुकीत मोघे-लोणकर गटाची सरशी


कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीच्या निवडणुकीत सत्ताधारी पारवेकर गटाला पराभुत करून मोघे-लोणकर गटाने आपले वर्चस्व पुर्नस्थापीत केले. १८ पैकी १० जागांवर त्यांनी विजय संपादन केला. पारवेकर गटाला ८ जागांवर समाधान मानावे लागले. तर तिस-या आघाडीला खातेही उघडता आले नाही.
या निवडणुकीत सहकारी संस्था गटातुन मोघे लोणकर गटाचे अभिषेक ठाकरे (१४८ मते), गजानन चौधरी (१४५ मते), किशोर चवरडोल (१४३ मते) हे विजयी झाले. तर पारवेकर गटाचे विवेक भोयर (१५६ मते), संजय निकडे (१५५ मते), सचिन देशमुख (१५३ मते) व प्रकाश डंभारे (१४६ मते) हे उमेदवार विजयी झाले. ईतर मागासवर्गीय गटात आशिष लोणकर (१५३ मते) विजयी झाले. सहकारी संस्था (अ.ज.) गटात पारवेकर गटाचे चंपत आत्राम (१६२ मते) विजयी झाले. व्यापारी अडते गटात अकबर तंवर (४३ मते) व नामदेव आडे (४२ मते) या मोघे-लोणकर गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली. हमाल मापारी गटात सै.रफिक सै.महेमुद (१९९ मते) हे पारवेकर गटाचे उमेदवार विजयी झाले. ग्रा.पं.सर्वसाधारण गटामध्ये सचिन ठाकरे (२४६ मते) हे मोघे लोणकर गटाचे व गजानन भोयर (२३६ मते) हे पारवेकर गटाचे उमेदवार निवडुन आले. ग्रा.पं.(अ.जा./ज) गटात नागोराव कुमरे (२२८ मते) हे मोघे-लोणकर गटाचे उमेदवार निवडुन आले. ग्रा.पं. आर्थिक दुर्बल घटक गटामध्ये रमेश आंबेपवार (२६४ मते) हे मोघे-लोणकर गटाचे उमेदवार विजयी झाले. सहकारी संस्था महिला गटातुन मोघे-लोणकर गटाच्या तुरपाबाई पुसनाके व पारवेकर गटाच्या वंदना जिभकाटे (१५७ मते) विजयी झाल्या. बाजार समितीचे विद्यमान उपसभापती बाबाराव देठे व मोघे लोणकर गटाचे एकलाख खान या दिग्गज उमेदवारांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत मोघे-लोणकर गटाची युती असली तरी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी बाजार समितीवर स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने आपलेच उमेदवार लादले होते. मात्र सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव असलेल्या सुरेश लोणकरांपुढे त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. त्यांचा एकही उमेदवार या निवडणुकीत टिकाव धरू शकला नाही हे विषेश.  मतदारांनी दोन्ही गटांना संमिश्र कौल दिल्याने सभापती पदासाठी ऐनवेळी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुरेश लोणकरांचे चिरंजीव आशिष लोणकर यांचेकडे सभापती पदाचे उमेदवार म्हणुन पाहिल्या जात आहे. मात्र त्यासाठी उमेदवारांना आपल्या काबुत ठेवण्याचे आव्हान मोघे-लोणकर गटापुढे आहे.निवडणुक निर्णय अधिकारी अविनाश चवरडोल, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डोंगरसिंग खोब्रागडे, बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार, श्री. हिवरकर यांच्या मार्गदर्शनात सहकार विभागाच्या कर्मचा-यांनी मतमोजणीचे काम पाहिले.

Tuesday, 9 August 2011

वयाच्या ८२ व्या वर्षी सायकलने निवडणुक प्रचार

प्रस्थापीतांच्या घोडदौडीमध्ये नारायणरावांचा एकाकी लढा

छेडण्या कडवी शिबंदी पीर वेडे पाहिजे. भेदण्या निष्प्रभ ह्नदया नीर वेडे पाहिजे, छेदण्या पाषाण कट्टर तीर वेडे पाहिजे, गाठण्या अचुक लक्ष्य ‘धेय्यवेडे’ पाहिजे. या ओळींप्रमाणे आपले आयुष्य जगणारे आजच्या काळात अभावानेच मिळतात. निस्वार्थ भावनेने केवळ तत्वासाठी लढा देणा-याला आजच्या काळात कुणीही वेडेच ठरविणार. मात्र कोणाच्याही वल्गनांची पर्वा न करता ‘एकला चलो रे' या भावनेने वाटचाल करणा-यांना आत्मसमाधानाचे सुख नक्कीच मिळते. घाटंजी शहरातही असे एक कलंदर व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे नारायणराव ठाकरे. वयाच्या ८२ व्या वर्षी एखाद्या तरूणालाही लाजवेल अशा सळसळत्या उत्साहाने ते जीवन जगताहेत.
या वयात बहुतांश लोकांना देवाधर्माचे वेध लागतात. नारायणराव मात्र शेतकरी, हमाल मापारी यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत उभे ठाकले आहेत. एकीकडे प्रस्थापीतांच्या गाड्यांची घोडदौड तर दुसरीकडे नारायणरावांचा ‘यशवंती' ने एकाकी प्रचार असे अनोखे चित्र बाजार समिती निवडणुकी दरम्यान दिसुन येत आहे. आपल्या सायकलला ते ‘यशवंती' असे संबोधतात.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ते सहकारी संस्था  गटातुन अपक्ष निवडणुक लढवताहेत. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ते आपला प्रचार करीत आहेत. त्यासाठी दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतराचा प्रवास ते सायकलच्या माध्यमातुन करतात. प्रचारासाठी ७१ ग्रामपंचायती व २६ सहकारी सोसायट्यांना भेट देऊन ते आपला प्रचार करतील. पारंपारिक महाराष्ट्रीयन पेहराव, डोक्यावर गांधी टोपी, प्रवासासाठी सायकल व सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर स्मितहास्य एवढे भांडवल घेऊन ते घराबाहेर पडतात. 
२१ एप्रिल १९३० रोजी जन्मलेल्या नारायणरावांनी आपले अवघे जीवनच संघर्षात घालवले आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी नगर परिषद निवडणुक लढविली. नगरसेवक झाल्यावर जनतेच्या अडचणी घेऊन ते नेहमीच भांडायचे. त्यावेळी नगर परिषदेच्या राजकारणात बहुतांश त्यांचे नातेवाईक होते. मात्र तरी देखिल सत्ताधा-यांच्या असहकार्यामुळे जनतेच्या अडचणी सोडविण्यास अपयशी ठरल्याचे जाणवताच त्यांनी तातडीने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. यापुर्वीही एकदा त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापीतांना कडवी टक्कर दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन तिन मतांनी ते पराभुत झाले होते. सध्या ते घाटी घाटंजी विवीध सहकारी संस्थेचे सदस्य आहेत.
घाटंजीतील राजकीय, सामाजीक व सांस्कृतीक वर्तुळात ठाकरे घराण्याला अत्यंत मानाचे स्थान आहे. नारायणरावांचे चिरंजीव प्रविण ठाकरे तहसिलदार आहेत, मुलगी छाया महाले अधिव्याख्याता तसेच सामाजीक कार्यकर्त्या आहेत. दुसरे चिरंजीव प्रमोद ठाकरे उत्कृष्ठ चित्रकार आहेत. मात्र त्यांचे मन कधीच अशा झगमगाटात रमले नाही.सर्वसामान्यांमध्ये राहुन त्यांच्यासाठी झटणे हे एकच धेय्य त्यांच्या समोर आहे.
आजच्या निराशेने व्यापलेल्या दुनियेत नारायणरावांचे व्यक्तीमत्व एखाद्या दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे.

Monday, 18 July 2011

बाजार समिती निवडणुकीत दिग्गजांची नामांकने रद्द

बाजार समिती निवडणुकीत दिग्गजांची नामांकने रद्द

कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीच्या निवडणूक नामांकन अर्ज छाननीत सत्ताधारी पारवेकर गट व प्रस्थापीत मोघे लोणकर गटाच्या सुमारे आठ उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले. विवीध कारणांवर तिसNया आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपात तथ्य आढळल्याने निवडणुक निर्णय अधिकाNयांनी सुमारे आठ दिग्गजांसह १७ उमेदवारांचे नामांकन रद्द केले. राष्ट्रवादी कांँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश डंभारे, विद्यमान संचालक सुरेश भोयर, प्रकाश खरतडे, संजय डंभारे, सुरेश लोणकर यांचे सुपूत्र आशीष लोणकर, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक एकलाख खान पटेल, रामु पवार, माया पवार या चर्चेतल्या उमेदवारांचा समावेश आहे. एकमेकांविरोधात आक्षेप घ्यायचे नाही असा तोंडी करार पारवेकर गट व
मोघे-लोणकर गटादरम्यान झाला होता. याची कुणकुण तिसNया आघाडीतील नेत्यांना लागल्याने त्यांनी तांत्रीक मुद्यांवर आक्षेप घेतले. नियमानुसार ते आक्षेप योग्य असल्याने नामांकने रद्द करण्यात आली. आता १८ जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात आहेत. महत्वाचे उमेदवार बाद झाल्याने दोन्ही मुख्य गटांना चांगलाच फटका बसला आहे. छाननीअंती व्यापारी गटात ९, हमाल मापारी गटात ४, ग्रामपंचायत गटात ४, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात १३, सहकारी मतदार संघ ६, सहकारी संस्था (ई.मा.व.) ५, सहकारी संस्था (अ.जा.) ६ व सर्वसाधारण गटातुन २८ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.