सभापती अभिषेक ठाकरे यांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे
कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी अंतर्गत केंद्र शासनाच्या हमी भावानुसार सी.सी.आय. ची खरेदी सुरू करावी अशी मागणी बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा या भागाचे खासदार हंसराज अहिर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
बाजार समितीच्या काही संचालकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी नुकतीच ना.अहिर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या मागणीचे निवेदन त्यांना दिले. दरवर्षी घाटंजी येथे सी.सी.आय.चे खरेदी केंद्र सुरू असते. मात्र यावर्षी अद्याप पर्यंत खरेदी सुरू करण्यात आली नाही. बाजार समितीने या संदर्भात सी.सी.आय.च्या अकोला विभागीय कार्यालयाशी लेखी व दुरध्वनी द्वारे वेळोवेळी पाठपुरावा देखील केला.
मात्र सदर कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. सी.सी.आय.ची खरेदी सुरू न झाल्याने शेतक-यांना कवडीमोल भावात कापुस विकण्याची पाळी येत आहे. शेतक-यांची ही अडचण लक्षात घेऊन माजी आमदार व पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर यांच्या माध्यमातून सभापती अभिषेक ठाकरे यांनी ना.अहिर यांची भेट घेऊन सदर समस्या त्यांच्या निदर्शनास आणुन दिली.
वारंवार दुष्काळाचे फटके झेलत असलेल्या शेतक-याच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा अशी घाटंजी बाजार समितीची आग्रही भुमिका असुन सी.सी.आय.ची खरेदी सुरू झाल्यास तालुक्यासह परिसरातील शेतक-यांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे ना.अहिर यांनी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी सभापती अभिषेक ठाकरे यांनी केली. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे, माजी नगराध्यक्ष राम खांडरे, सचिन पारवेकर, विवेक भोयर, अशोक यमसनवार, यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment