साकारले सायकलवर स्वयंचलित फवारणी यंत्र
स्थानिक शि.प्र.मं. माध्यमिक कन्या शाळेतील विज्ञान प्रतिकृतीची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरीता निवड करण्यात आली आहे. सायकलवर स्वयंचलित फवारणी यंत्र हि प्रतिकृती राष्ट्रीय विजान प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. येत्या १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान लेझर व्हॅली गार्डन चंदीगड येथे हे प्रदर्शन होणार असुन भारतातील सर्वोत्कृष्ट वैजानिक प्रयोग येथे सादर होणार आहेत. घाटंजी तालुक्यातील शाळेला प्रथमच राज्य स्तरावर द्वितीय पारितोषीक व राष्ट्रीय पातळीवर निवड होण्याचा बहुमान मिळाला आहे.
शि.प्र.मं.कन्या शाळेतील १० व्या वर्गाची विद्यार्थीनी अंजली संजय गोडे हिने शिक्षक अतुल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात हा प्रयोग साकारला आहे. जानेवारी महिन्यात धामणगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत स्वयंचलीत फवारणी यंत्राला माध्यमिक गटातून द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला होता. या प्रयोगासाठी शाळेचे पर्यवेक्षक बी.व्ही. घागरे, यांचेसह सर्व विजान शिक्षक व शिक्षीकांचे मार्गदर्शन लाभले. हा प्रयोग साकारणारी विद्यार्थीनी अंजली गोडे हिचे वडील उपक्रमशील शेतकरी आहेत. त्यांना जिल्हा परिषदेकडून सन्मानीत सुद्धा करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीत निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव अनिरूद्ध लोणकर, संचालक आर.यु.गिरी, आलिया शहजाद, गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए. शहजाद, शि.प्र.मं.कन्या शाळेच्या मुख्याध्यापक के.पी.महाकाळकर व सर्व शिक्षक तसेच कर्मचारी वुंदाने कौतुक केले आहे.
स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी वरदान
सायकलवर चालणारे हे स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अवघ्या अडीच ते ३ हजार रूपयात हे यंत्र तयार होते. शिवाय र्इंधन विरहित असल्याने पैश्याच्या बचतीसोबतच पर्यावरणासाठीही हानीकारक नाही. सायकलच्या पॅडल द्वारे दाब निर्माण करून वेगवेगळ्या १० नोझल्स द्वारे फवारणी करता येऊ शकते. विषेश म्हणजे सायकलची गती कमी असली तरी फवारणी होऊ शकते. केवळ एक व्यक्तीच सायकल चालवुन फवारणी करू शकत असल्यामुळे मजुराची गरज नाही. तसेच फवारणी मागील बाजुस होत असल्यामुळे रासायनिक द्रव्य अंगावर पडण्याचा धोका कमी आहे. फवारणीसाठी शेतक-यांना ईलेक्ट्रीक फवारणी यंत्राचे भाडे, र्इंधन व मजुरी असा खर्च लागतो. मात्र या अत्यल्प खर्चातील स्वयंचलीत यंत्राने शेतक-यांना किफायतशीर दरात फवारणी करता येऊ शकते.
No comments:
Post a Comment