Pages

Monday 22 August 2011

घाटंजी बाजार समिती निवडणुकीत मोघे-लोणकर गटाची सरशी


कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीच्या निवडणुकीत सत्ताधारी पारवेकर गटाला पराभुत करून मोघे-लोणकर गटाने आपले वर्चस्व पुर्नस्थापीत केले. १८ पैकी १० जागांवर त्यांनी विजय संपादन केला. पारवेकर गटाला ८ जागांवर समाधान मानावे लागले. तर तिस-या आघाडीला खातेही उघडता आले नाही.
या निवडणुकीत सहकारी संस्था गटातुन मोघे लोणकर गटाचे अभिषेक ठाकरे (१४८ मते), गजानन चौधरी (१४५ मते), किशोर चवरडोल (१४३ मते) हे विजयी झाले. तर पारवेकर गटाचे विवेक भोयर (१५६ मते), संजय निकडे (१५५ मते), सचिन देशमुख (१५३ मते) व प्रकाश डंभारे (१४६ मते) हे उमेदवार विजयी झाले. ईतर मागासवर्गीय गटात आशिष लोणकर (१५३ मते) विजयी झाले. सहकारी संस्था (अ.ज.) गटात पारवेकर गटाचे चंपत आत्राम (१६२ मते) विजयी झाले. व्यापारी अडते गटात अकबर तंवर (४३ मते) व नामदेव आडे (४२ मते) या मोघे-लोणकर गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली. हमाल मापारी गटात सै.रफिक सै.महेमुद (१९९ मते) हे पारवेकर गटाचे उमेदवार विजयी झाले. ग्रा.पं.सर्वसाधारण गटामध्ये सचिन ठाकरे (२४६ मते) हे मोघे लोणकर गटाचे व गजानन भोयर (२३६ मते) हे पारवेकर गटाचे उमेदवार निवडुन आले. ग्रा.पं.(अ.जा./ज) गटात नागोराव कुमरे (२२८ मते) हे मोघे-लोणकर गटाचे उमेदवार निवडुन आले. ग्रा.पं. आर्थिक दुर्बल घटक गटामध्ये रमेश आंबेपवार (२६४ मते) हे मोघे-लोणकर गटाचे उमेदवार विजयी झाले. सहकारी संस्था महिला गटातुन मोघे-लोणकर गटाच्या तुरपाबाई पुसनाके व पारवेकर गटाच्या वंदना जिभकाटे (१५७ मते) विजयी झाल्या. बाजार समितीचे विद्यमान उपसभापती बाबाराव देठे व मोघे लोणकर गटाचे एकलाख खान या दिग्गज उमेदवारांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत मोघे-लोणकर गटाची युती असली तरी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी बाजार समितीवर स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने आपलेच उमेदवार लादले होते. मात्र सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव असलेल्या सुरेश लोणकरांपुढे त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. त्यांचा एकही उमेदवार या निवडणुकीत टिकाव धरू शकला नाही हे विषेश.  मतदारांनी दोन्ही गटांना संमिश्र कौल दिल्याने सभापती पदासाठी ऐनवेळी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुरेश लोणकरांचे चिरंजीव आशिष लोणकर यांचेकडे सभापती पदाचे उमेदवार म्हणुन पाहिल्या जात आहे. मात्र त्यासाठी उमेदवारांना आपल्या काबुत ठेवण्याचे आव्हान मोघे-लोणकर गटापुढे आहे.निवडणुक निर्णय अधिकारी अविनाश चवरडोल, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डोंगरसिंग खोब्रागडे, बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार, श्री. हिवरकर यांच्या मार्गदर्शनात सहकार विभागाच्या कर्मचा-यांनी मतमोजणीचे काम पाहिले.

No comments:

Post a Comment