दर आठवड्याला होते चंदनचोरी
परिसरातील रहिवासी धास्तावले
गेल्या दोन महिन्यात घाटंजी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदनचोरीच्या अनेक घटना झाल्याने हे कार्यालय चोरट्यांसाठी खुले तर करण्यात आले नाही ना असा संशय निर्माण झाला आहे.
काल (दि.५) ला रात्री एक वाजताच्या सुमारास चंदन चोरट्यांचा टोळीने पुन्हा एकदा चंदनाचे एक झाड तोडुन नेले. तसेच त्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. दहा ते बाराच्या संख्येत असलेल्या चोरट्यांनी कर्मचा-याना शस्त्राचा धाक दाखवुन नेहमीप्रमाणे आपला डाव साधला. वनपरिक्षेत्र कार्यालय परिसराला लागुन असलेल्या काकडे यांच्या घराजवळील चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडुन नेले. येथिल वनविभागाच्या कर्मचा-यांनी रात्रीच ही सुचना वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड.राठोड यांना दिली. मात्र त्यांनी पोलीस तक्रार देण्याऐवजी घटनेची कोणाकडेही वाच्यता करू नये अशी सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे. त्यामुळे वारंवार होणा-या चोरीच्या घटनांमुळे वनपरिक्षेत्र कार्यालय संशयाच्या भोव-यात सापडले आहे.
यापुर्वी दि. २१ जुन व २६ जुनला कार्यालय परिसरातुन चोरट्यांनी चंदनाची झाडे लंपास केली. याचा गवगवा झाल्यामुळे नाईलाजास्तव पोलीसात तक्रार करण्यात आली. पोलीसानांrही औपचारीकता पुर्ण करून प्रकरण थंडबस्त्यात ठेऊन दिले. मात्र परिसरात निर्भिडपणे फिरणा-या टोळीला जेरबंद करण्यासाठी वनविभाग व पोलीस यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. वनखात्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यामुळे मुख्य वनसंरक्षक देवेंद्रकुमार, उपवनसंरक्षक सुधाकर डोळे, यांनी घटनास्थळी भेट देऊन औपचारीक चौकशी केली. मात्र घटनेची तक्रार देण्यास टाळाटाळ करणारे वनपाल न.वि.वानखडे, मुख्यालयी अनुपस्थित असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्याप झाली नाही.त्यानंतर चोरट्यांनी चंदनाच्या तोडलेल्या झाडांची बुडे सुद्धा मुळासकट काढुन नेली. याचीही तक्रार करण्यात आली नाही. या परिसरात चंदन चोरांचा वावर आता नित्याचाच झाला आहे. दहा बारा चोरटे हत्यारासह येतात. रात्रपाळीवर असलेल्या कर्मचा-यांना शस्त्राचा धाक दाखवुन एका जागी बसवुन ठेवतात. तोवर त्यांचे काही साथीदार वनकर्मचा-यांसारखे शिटी वाजवीत परिसरात फिरत असतात. त्यामुळे कुणाला शंका सुद्धा येत नाही. त्या दरम्यान अन्य चोरटे झाड तोडून नेतात. काही वेळा चोरट्यांनी कर्मचा-यांना क्वार्टर मध्ये डांबुन चोरी केल्याचीही माहिती आहे. मात्र वरिष्ठांच्या दबावामुळे कर्मचा-यांनी याची वाच्यता कुणाकडे केली नसल्याचे बोलल्या जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांची नेमणुक झाल्यापासुन केवळ दोन महिन्यातच चंदनचोरीच्या सुमारे दहा घटना झाल्या आहेत मात्र तक्रार केवळ दोन वेळा करण्यात आल्याने राठोड यांचे चोरट्यांशी साटेलोटे तर नाही ना असा संशय निर्माण झाला आहे. ज्या अधिका-यावर संपुर्ण वनपरिक्षेत्रातील जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळील चंदनाचे झाड चोरीस जावे यापेक्षा लाजीरवाणे दुसरे काय असेल?
वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांचेकडे यवतमाळ वनपरिक्षेत्राचाही प्रभार त्यांनी ठेऊन घेतला आहे. गेल्या तिन महिन्यांपासुन ते घाटंजी कार्यालयात आठवड्यातुन एक दोनदा येतात. यवतमाळ वनपरिक्षेत्रात असलेला मलिदा डोळ्यापुढे ठेऊन त्यांनी स्वत:कडे ठेऊन घेतल्याची चर्चा खासगीत होत आहे. वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदनचोरीच्या नित्य घटनांनी या भागात राहणारे नागरीक चांगलेच धास्तावले आहेत. शिवाय वनकर्मचा-यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असुन रात्रपाळीवर सेवा देण्यास कर्मचारी नकार देत आहेत. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र ठराविक कर्मचा-यानांच रात्रपाळीला जुंपत आहेत. वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत एकाही कर्मचा-याला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालुन पहारा देण्याशिवाय त्यांचेकडे पर्याय उरलेला नाही. एकंदरीतच वनविभागाच्या अस्तित्वालाच आव्हान देणा-या या घटनांमुळे हा विभागच संशयाच्या भोव-यात सापडला आहे.
No comments:
Post a Comment