Pages

Tuesday 9 August 2011

प्रकरण दडपण्यासाठी आर.एफ.ओ. राठोडचा आटापीटा

वरिष्ठही मुग गिळुन गप्प
कर्मचारी दुहेरी तणावाखाली
शस्त्राच्या धाकावर वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचे प्रकरण दडपण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना ब-याच अंशी यश आले असुन घटनेला पाच दिवस होऊनही वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याने नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय या संशयाला पुष्टी मिळाली आहे. घटनेची पोलीस स्टेशनला अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही तरी काल (दि.८) ला रात्री ७.३० दरम्यान आर.एफ.ओ. राठोड आपल्या सहका-यांसमवेत पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांची भेट घेऊन त्यांचेशी खास ‘चर्चा' केल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाच्या वतीने तक्रार देण्यात आलेली नाही.
आपल्याकडे दोन ठिकाणचा प्रभार असल्याचे गोंडस कारण देऊन राठोड आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु यवतमाळचा अतिरिक्त प्रभार स्वत:कडे ठेवण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यांची नियुक्ती घाटंजी येथे झालेली असली तरी काम मात्र ते यवतमाळ येथुनच पाहतात. गेल्या तिन महिन्यात ते एखाद दुसरा अपवाद वगळता मुख्यालयी असल्याचे निदर्शनास आले नाही. या दरम्यान तिन वेळा कार्यालय परिसरात चंदन चोरी झाली. गवगवा न झालेल्या चो-यांचा तर हिशोबच नाही. या प्रकरणांमध्ये वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीही तितकेच दोषी आहेत. चौकशी करूनही त्यातुन काहीच निष्पन्न न झाल्यामुळे चोरट्यांसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कायमस्वरूपी कुरणच झाले आहे. या प्रकारामुळे कनिष्ठ कर्मचारी मात्र दुहेरी तणावाखाली वावरत आहेत. कर्तव्य बजावतांना चोरट्यांची भिती व अशी घटना घडल्यावर वरिष्ठांचा दबाव या संकटात कर्मचारी सापडले आहेत. अशा प्रकरणांमध्ये वरिष्ठ अधिकारी आपल्यावरील सर्व जबाबदारी कनिष्ठ कर्मचा-यांवर लोटून नामनिराळे होतात. वनविभागाच्या या धोरणामुळे शस्त्रसज्ज चोरट्यांकडून गस्त घालणा-या कर्मचा-यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यात झालेल्या चोरीच्या घटनांमुळे वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरासह घाटंजी तालुक्यातील वनसंपदा चोरट्यांसाठीच खुली असल्याचे सिद्ध झाले आहे.

No comments:

Post a Comment