Pages

Tuesday 2 August 2011

नगर परिषद आमचा आणखी किती अंत पाहणार ?

घाटंजीकरांची संतप्त भावना
न.प.वर नियंत्रण कुणाचे?

जीवघेणे रस्ते, कच-याने तुंबलेल्या नाल्या, महत्वाच्या रस्त्यांवर नसलेली पथदिव्यांची व्यवस्था अशा स्थितीत गेल्या काही वर्षापासुन दिवस काढणा-या घाटंजीकरांमध्ये आता असंतोष खदखदत आहे. 
मोठ्या अपेक्षेने सत्तापालट करून नव्या चेह-याना संधी देणा-या घाटंजीवासीयांचा भ्रमनिरासच झाला आहे. विकास तर सोडाच पण नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुर्तताही या काळात नगर परिषदेला करता आली नाही. स्वयंस्पुâर्तीने न.प. ने काम केलेले नाहीच परंतु नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घ्यायलाही पदाधीकारी व प्रशासन यांना वेळ नाही. सध्या पावसाळी दिवसांमध्ये शहरातील अनेक भागात कच्च्या रस्त्यांवर चालणेही दुरापास्त झाले आहे. डबक्यांमध्ये पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. अशा परिस्थितीत रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसंत नगर, गुरूदेव वार्ड, नेहरु नगर, ईस्तारी नगर, जेसिस कॉलनी, अंबा नगरी, बाबासाहेब देशमुख कॉलनी यासह अनेक भागातील अंतर्गत रस्ते चिखल व खड्ड्यांनी व्यापले आहेत. त्यावरून वाहने चालविणे तर दुरच पण चालणेही कठीण झाले आहे. या भागात नाल्या नसल्याने सांडपाणी पावसाच्या पाण्यासोबत घरात शिरते. वसंत नगराकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर पथदिवे नाहित त्यामुळे रात्री शिकवणी वर्गाला जाणा-या विद्यार्थ्यांना  जीव मुठीत घेऊनच येथुन जावे लागते.

 यामुळे संतप्त झालेल्या वसंत नगरातील महिलांनी प्रभारी मुख्याधीकारी व तहसिलदार संतोष शिंदे तसेच न.प. अध्यक्ष वच्छला धुर्वे यांना भेटुन समस्यांचा पाढा वाचला होता. समस्यांचे निराकरण तातडीने न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा ईशारा तारा टाले, मिनाक्षी जकाते, श्रीमती खिरटकर, लता नखाते, मिना घुगरे, लिला विरदंडे, ललिता लिंगरवार, मंगला खरतडे, सुनिता पडलवार, अंजली तांबारे, सुलोचना नामपेल्लीवार, मयुरी डफळे, श्रीमती लाकडे, उज्वला मुनेश्वर, श्रीमती चोपडे, मंजुळा पेंदाम, श्रीमती दातारकर, सुशिला मनवर, श्रीमती भेंडे, ललिता खरतडे, श्रीमती चिलकावार, सुवर्णा कोल्हे, पुष्पा वराटकर, श्रीमती राठोड, दिपाली गवार्ले, संध्या आस्वले, श्रीमती भुरे, सुमन मंगाम, श्रीमती संगनवार, वंदना गंधारे, श्रीमती पुसनाके, मंदा बिसन, अनिता गायकवाड, श्रीमती धोबे, श्रीमती पाटील यांनी दिला होता. सात दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर काही ठीकाणी मुरूम टाकण्यात आला. मात्र रस्त्यावरील मुरूम पसरवायचा असतो हा निकष कदाचीत घाटंजी न.प.ला लागु नसल्याने मुरूमाचे ढिग तसेच रस्त्याशी एकरूप झाले आहेत.
गुरूदेव वार्ड व बाबासाहेब देशमुख कॉलनीत हिच परिस्थिती आहे. नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अधिकच धोकादायक झाले आहेत. वसंत नगरात किशोर धोबे यांच्या धराजवळ दगडासारख्या मुरूमाचे ढिग टाकल्याने चालणे दुरापास्त झाले आहे. गुरूदेव नगरातील रहिवाशांनी या भागातील नगरसेवक व न.प. उपाध्यक्ष सुरेश कुडेगावे यांचेकडे रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत कैफियत  मांडली असता माझ्या हातात काहीच नाही मी काय करू शकतो? असे बेजबाबदारपणे बोलुन जबाबदारी झटकल्याची माहिती आहे. तर मुख्याधिकारी शिंदेनी कर्मचा-यांना सुचना देऊनही त्यांना कुणीच महत्व दिले नाही. त्यामुळे नगर परिषदेवर आता नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निर्ढावलेले नगरसेवक, वचक नसलेले प्रशासन आणी यावर वरिष्ठ यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे नागरीकांचे मात्र हाल होत आहे. नगर परिषद आमचा आणखी किती अंत पाहणार असा संतप्त सवाल घाटंजीकर करीत आहेत.

No comments:

Post a Comment