Pages

Tuesday 9 August 2011

चंदन चोरट्यांपुढे वनविभागाने टाकली नांगी

घटनेची अद्याप तक्रार नाही


वनविभागाच्या नाकावर टिच्चुन गेल्या दोन महिन्यात वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदन चोरट्यांच्या टोळीने बहुमोल किमतीची चंदनाची झाडे तोडून नेली. या टोळीला जेरबंद करण्याऐवजी वनविभागाने त्यांच्या पुढे शरणागती पत्करल्याचे चित्र आहे. 
दि. ५ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी चंदनाचे एक झाड तोडून नेले होते. तसेच कार्यालय उघडण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र या घटनेची गेल्या दोन दिवसांपासुन साधी पोलीस तक्रार करण्याचे सोपस्कारही वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांनी केलेले नाहित. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे सांगीतले. याची शहानिशा करण्याकरीता पोलीस स्टेशनला चौकशी केली असता, आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत वनविभागाकडून लेखी अथवा तोंडी स्वरूपात कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलीसांनी सांगीतले. कार्यालय परिसरात झालेली चंदनचोरी क्षुल्लक स्वरूपाची असुन चंदनाचे ते झाड जलतनाच्याच कामाचे होते असा अजब निर्वाळा राठोड यांनी दिला.
दहा बारा चोरट्यांची सशस्त्र टोळी नियमितपणे कार्यालय परिसरात आपला डाव साधुन जाते व परिक्षेत्रातील वनसंरक्षणाची जबाबदारी असलेले अधिकारी असे बेजबाबदार वक्तव्य करतात हे निश्चितच संशयाला बळ देणारे आहे. या भागातील रहिवाश्यांच्या सांगण्यानुसार काही वर्षापुर्वी या परिसरात चंदनाची शेकडो झाडे होती. मात्र आज केवळ बोटावर मोजण्याईतकी झाडे शिल्लक राहिली आहेत. उल्लेखनिय म्हणजे कार्यालय परिसरात असलेल्या झाडांचे कोणतेही रेकॉर्ड वनविभागाजवळ नाही असे कार्यालयातुन सांगण्यात आले. अनेकदा चोरी होऊनही त्याची तक्रारच देण्यात आली नाही. एवढ्या वर्षापासुन एकही चंदन चोरटा वनविभाग अथवा पोलीसांच्या हाती लागु नये हा या विभागांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे. 
५ ऑगस्टच्या चोरीनंतरही हे प्रकरण दडपण्याच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी आटोकाट प्रयत्न केले. वरिष्ठांकडून याबाबत चौकशी होऊ नये यासाठी राठोड यांनी चांगलीच फिल्डींग लावली असल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. या प्रकरणाबाबत कर्मचा-यांना  गप्प राहण्याचे सक्त आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. 
यवतमाळ व घाटंजीचा प्रभार स्वत:कडे ठेवण्यासाठी त्यांनी बरीच रक्कम मोजल्याचीही माहिती आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिका-यांनी सुद्धा राठोड यांच्या प्रमाणे या घटनेला फारसे गांभिर्याने घेतले नसल्याचे लक्षात येत आहे. मागील दोन प्रकरणात चौकशी होऊन सुद्धा कुणावरही अद्याप कार्यवाही झाली नाही. वनपरिक्षेत्र अधिका-याची या सर्व प्रकरणात संशयास्पद भुमिका असल्याचे लक्षात येते. ते घाटंजी येथे आल्यापासुन सुमारे दहा वेळा चोरीच्या घटना झाल्या आहेत. एकंदरीतच याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशी झाल्यास नेमके गौडबंगाल पुढे येऊ शकते.

No comments:

Post a Comment