Pages

Tuesday 9 August 2011

वयाच्या ८२ व्या वर्षी सायकलने निवडणुक प्रचार

प्रस्थापीतांच्या घोडदौडीमध्ये नारायणरावांचा एकाकी लढा

छेडण्या कडवी शिबंदी पीर वेडे पाहिजे. भेदण्या निष्प्रभ ह्नदया नीर वेडे पाहिजे, छेदण्या पाषाण कट्टर तीर वेडे पाहिजे, गाठण्या अचुक लक्ष्य ‘धेय्यवेडे’ पाहिजे. या ओळींप्रमाणे आपले आयुष्य जगणारे आजच्या काळात अभावानेच मिळतात. निस्वार्थ भावनेने केवळ तत्वासाठी लढा देणा-याला आजच्या काळात कुणीही वेडेच ठरविणार. मात्र कोणाच्याही वल्गनांची पर्वा न करता ‘एकला चलो रे' या भावनेने वाटचाल करणा-यांना आत्मसमाधानाचे सुख नक्कीच मिळते. घाटंजी शहरातही असे एक कलंदर व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे नारायणराव ठाकरे. वयाच्या ८२ व्या वर्षी एखाद्या तरूणालाही लाजवेल अशा सळसळत्या उत्साहाने ते जीवन जगताहेत.
या वयात बहुतांश लोकांना देवाधर्माचे वेध लागतात. नारायणराव मात्र शेतकरी, हमाल मापारी यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत उभे ठाकले आहेत. एकीकडे प्रस्थापीतांच्या गाड्यांची घोडदौड तर दुसरीकडे नारायणरावांचा ‘यशवंती' ने एकाकी प्रचार असे अनोखे चित्र बाजार समिती निवडणुकी दरम्यान दिसुन येत आहे. आपल्या सायकलला ते ‘यशवंती' असे संबोधतात.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ते सहकारी संस्था  गटातुन अपक्ष निवडणुक लढवताहेत. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ते आपला प्रचार करीत आहेत. त्यासाठी दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतराचा प्रवास ते सायकलच्या माध्यमातुन करतात. प्रचारासाठी ७१ ग्रामपंचायती व २६ सहकारी सोसायट्यांना भेट देऊन ते आपला प्रचार करतील. पारंपारिक महाराष्ट्रीयन पेहराव, डोक्यावर गांधी टोपी, प्रवासासाठी सायकल व सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर स्मितहास्य एवढे भांडवल घेऊन ते घराबाहेर पडतात. 
२१ एप्रिल १९३० रोजी जन्मलेल्या नारायणरावांनी आपले अवघे जीवनच संघर्षात घालवले आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी नगर परिषद निवडणुक लढविली. नगरसेवक झाल्यावर जनतेच्या अडचणी घेऊन ते नेहमीच भांडायचे. त्यावेळी नगर परिषदेच्या राजकारणात बहुतांश त्यांचे नातेवाईक होते. मात्र तरी देखिल सत्ताधा-यांच्या असहकार्यामुळे जनतेच्या अडचणी सोडविण्यास अपयशी ठरल्याचे जाणवताच त्यांनी तातडीने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. यापुर्वीही एकदा त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापीतांना कडवी टक्कर दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन तिन मतांनी ते पराभुत झाले होते. सध्या ते घाटी घाटंजी विवीध सहकारी संस्थेचे सदस्य आहेत.
घाटंजीतील राजकीय, सामाजीक व सांस्कृतीक वर्तुळात ठाकरे घराण्याला अत्यंत मानाचे स्थान आहे. नारायणरावांचे चिरंजीव प्रविण ठाकरे तहसिलदार आहेत, मुलगी छाया महाले अधिव्याख्याता तसेच सामाजीक कार्यकर्त्या आहेत. दुसरे चिरंजीव प्रमोद ठाकरे उत्कृष्ठ चित्रकार आहेत. मात्र त्यांचे मन कधीच अशा झगमगाटात रमले नाही.सर्वसामान्यांमध्ये राहुन त्यांच्यासाठी झटणे हे एकच धेय्य त्यांच्या समोर आहे.
आजच्या निराशेने व्यापलेल्या दुनियेत नारायणरावांचे व्यक्तीमत्व एखाद्या दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे.

1 comment: