Pages

Showing posts with label शेतकरी. Show all posts
Showing posts with label शेतकरी. Show all posts

Sunday, 28 December 2014

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचे आमदार राजू तोडसाम यांचेकडून सांत्वन


तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची भेट घेऊन आमदार राजू तोडसाम यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच शासन शेतक-यांच्या पाठिशी असुन त्यांनी असा धीर सोडू नये असे आवाहन केले. दरम्यान त्यांनी सायतखर्डा व सायफळ येथिल शेतक-यांना शासनाकडून मिळणा-या मदतीचे धनादेश प्रदान केले. 
घाटंजी तालुका हा आदिवासी शेतकरी बहुल असुन गेल्या तिन चार वर्षापासुन कधी अवर्षण तर कधी महापुर अशा नैसर्गिक संकटांमुळे तालुक्यातील शेतक-यांचे कंबरडे  मोडले आहे. त्यामुळे हतबल झालेला शतकरी प्रसंगी आत्महत्येचा मार्ग अवलंबीत आहे. शेतकरी वर्गाला आधार देऊन शासन त्यांच्या पाठिशी आहे याबाबत खात्री देण्यासाठी आमदार राजु तोडसाम यांनी तालुक्यातील आमडी, सायतखर्डा, सायफळ, घोटी शारी, व अंजी (नु) या गावच्या शेतकरी कुटूंबाच्या घरी जाऊन त्यांचेशी संवाद साधला. 
यावेळी घाटंजी तहसिलचे नायब तहसिलदार विलास बोलपिल्लेवार, मनोज कटनकर, उपसभापती रमेश धुर्वे, स्वप्निल मंगळे, अशोक यमसनवार, राजु शुक्ला, अंकुश हर्षे, सतिश भरडे, प्रणव वाघ, चेतन राठोड, सुरज जाधव, राहुल जांभुळे, किशोर घाटोळ, संजय मंगळे उपस्थित होते.

Sunday, 3 March 2013

राजकीय कुरघोडीत शेतक-यांच्या सुविधा दावणीला


गेल्या अनेक वर्षांपासुन घाटंजी तालुक्याच्या सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाची भुमिका निभावणारी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतक-यांसाठी मात्र असुविधेचीच ठरली आहे. कापुस व धान्याच्या मार्केट  यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने आजवर बाजार समितीची सत्ता काबिज करणा-यांनी काय केले असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. कधी नव्हे तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प शेतक-यांसाठी सुरू झाला होता. शिदोरी मंडपापासुन ते गोदामापर्यंत सर्व सुविधांनी युक्त अशा २ कोटी ८ लाखांच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. 
आजवर तुरळक अपवाद वगळता कोणतेच विकासकाम न झालेल्या बाजार समितीमध्ये शेतक-यांसाठी शिदोरी मंडप, ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गोदाम, स्वच्छतागृह, मुक्कामाची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी यासह विवीध सुविधा एकाच वेळी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू झाले. मात्र तांत्रिक मुद्द्यांवरून या प्रकल्पाच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्पाचे काम खोळंबले. यंदाच्या कापुस हंगामात शेतक-यांना या सुविधांचा लाभ होणार असे चित्र दिसत असतांना या तक्रारींमुळे शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. केवळ काही तांत्रिक मुद्दे सोडले तर तक्रारीत आक्षेप घेण्यासारखे काही नसल्याचे निदर्शनास येते. मात्र हातात सत्ता नसलेल्यांना कदाचित शेतक-यांसाठी होत असलेल्या सुविधा पाहवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या तक्रारी झाल्या. ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्या अभावी व्यापा-यांना वजनात दांडी मारण्याची मिळत असलेली संधी बाजार समिती मार्केट यार्डात होऊ घातलेल्या ४०० मेट्रीक टनाच्या वजनकाट्यामुळे मिळाली नसती. बाजार समितीचे त्यावर नियंत्रण राहिले असते. मात्र या तक्रारींमुळे हंगामाच्या वेळेपर्यंत काटा उभारल्या जाऊ शकला नाही. सध्या बाजार समितीच्या मार्केट यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. टिनाच्या शेडमध्येच समितीचे कर्मचारी बसतात. तशीच स्थिती शिदोरी मंडपाचीही आहे. 
धान्य यार्डावर अनेकदा शेतक-यांचा माल बाहेर तर व्यापा-यांचा माल गोदामात अशी स्थिती असते. यावर्षी बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबविली. गोदामा अभावी अनेक शेतक-यांना या योजनेपासुन वंचीत राहावे लागले. नाफेडची खरेदी तालुक्यात सुरू झाल्याने शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळाला. काही जिनिंग मध्ये वजनकाट्यात तफावत असल्याचे आढळुन आले. बाजार समितीने या तक्रारींची दखल घेऊन काट्यांची तपासणी केली. मात्र बाजार समितीचा वजन काटा उभारल्या गेल्यास भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही असे बाजास समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. शेतक-यांसाठी सुविधा निर्माण करणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडचणी दुर होऊन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वयीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 17 November 2011

"फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे"


कापूस ठरला यातनांचे पीक.........!
कापूस म्हणजे पांढरं सोनं  अन शेतकरी म्हणजे देशाचा कणा. खरं पाहिलं तर अशी वाक्ये निबंधामध्ये अन् भाषणामध्ये बरी वाटतात. वस्तूस्थिती मात्र विचित्र आहे सोन्याचा भाव किती आहे अन्पाठीच्या कण्याची काय अवस्था आहे याचे चिंतन केले तर संवेदनशिल माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. 
जखमेवर बांधल्या जाणार्‍या कापसालाच आज जखम झालीय. शेतकर्‍यांच्या यातनांचं गाठोडं मोठं झालं आहे. आज कापूस उत्पादक शेतकर्‍याच्या शिवारात स्मशान शांतता पसरली आहे. रानातली पक्ष्यांची शिळही आता त्याला नकोशी झालीय. सरकार कर्णबधीर झालयं, नेते एसीत बसून धोरण ठरवताहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात एक राजू शेट्टी तयार झालाय विदर्भात केव्हा होणारं? ही आशा आता शेतकर्‍यांच्या मनांत घर करू लागलीय. मागील वर्षी कापसाला बर्‍यापैकी भाव मिळाला. म्हणूनच यंदा नव्या आशेनं शेतकर्‍यांनी जमिनीतं स्वप्नं पेरलं. कापसासाठी वाट्टेल तो खर्च केला. परंतु आज मात्र कापूस अनिश्‍चिततेच्या सावटात सापडला आहे. नाफेड, सीसीआयची दारं कधी उघडणार याचीच शेतकरी वाट पाहात आहे. सोयाबीनचं पीक पाहिजे तसं झालं नाही. कापूस तरी वाचवेल असं वाटत असताना ऐनवेळी निसर्गानं दगा दिला. एकरी अडीच ते तीन क्विंटलचा अँव्हरेज येतो आहे. एकरी खर्च बारा हजार रुपये व उत्पादन मात्र ११ हजार रुपयाचे अशी एकंदरित स्थिती आहे. कापसाच्या होणार्‍या चोर्‍या, खेडा खरेदीत होणारी लूट, वीज वितरण कंपनीचे सैतानी डावपेच, जागल करताना होणारा साप, विंचू यांचा त्रास व सरकारच्या मनातील कपटी अंदाज यामुळे कापसाचे पीक हे शेतकर्‍यांसाठी यातनांचेच पीक ठरले आहे.
सध्या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांसमोर प्रचंड मोठे संकट उभे ठाकले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून फोटो काढण्यापुरते मार्गदर्शन शेतकर्‍यांना होत आहे. शेती परवडत नाही म्हणून जमिनीचा मालक आता रोजगाराच्या शोधात स्थलांतर करूलागला आहे. येणार्‍या काळात ही वेदना अधिक तीव्र होणार आहे. 
शेतकर्‍यांना आयुष्यभर आसवांच्याच पावसात भिजवित ठेवणार्‍या या व्यवस्थेत शेतकरी मात्र आता निराधार होतोय. विठ्ठल वाघ म्हणतात त्याप्रमाणे 'फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाह्ये, तरी मायमाऊलीची मांडी उघडीचे राहे' अशीच अवस्था कापूस उत्पादक शेतकर्‍यांची झाली आहे. कापसाची ही वेदना संपविण्यासाठी कुणीतरी आता पुढं आलंच पाहिजे.

संतोष अरसोड, नेर मो. 9423434315

साभार :- लोकमत          
                                                                                

Tuesday, 9 August 2011

वयाच्या ८२ व्या वर्षी सायकलने निवडणुक प्रचार

प्रस्थापीतांच्या घोडदौडीमध्ये नारायणरावांचा एकाकी लढा

छेडण्या कडवी शिबंदी पीर वेडे पाहिजे. भेदण्या निष्प्रभ ह्नदया नीर वेडे पाहिजे, छेदण्या पाषाण कट्टर तीर वेडे पाहिजे, गाठण्या अचुक लक्ष्य ‘धेय्यवेडे’ पाहिजे. या ओळींप्रमाणे आपले आयुष्य जगणारे आजच्या काळात अभावानेच मिळतात. निस्वार्थ भावनेने केवळ तत्वासाठी लढा देणा-याला आजच्या काळात कुणीही वेडेच ठरविणार. मात्र कोणाच्याही वल्गनांची पर्वा न करता ‘एकला चलो रे' या भावनेने वाटचाल करणा-यांना आत्मसमाधानाचे सुख नक्कीच मिळते. घाटंजी शहरातही असे एक कलंदर व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे नारायणराव ठाकरे. वयाच्या ८२ व्या वर्षी एखाद्या तरूणालाही लाजवेल अशा सळसळत्या उत्साहाने ते जीवन जगताहेत.
या वयात बहुतांश लोकांना देवाधर्माचे वेध लागतात. नारायणराव मात्र शेतकरी, हमाल मापारी यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत उभे ठाकले आहेत. एकीकडे प्रस्थापीतांच्या गाड्यांची घोडदौड तर दुसरीकडे नारायणरावांचा ‘यशवंती' ने एकाकी प्रचार असे अनोखे चित्र बाजार समिती निवडणुकी दरम्यान दिसुन येत आहे. आपल्या सायकलला ते ‘यशवंती' असे संबोधतात.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ते सहकारी संस्था  गटातुन अपक्ष निवडणुक लढवताहेत. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ते आपला प्रचार करीत आहेत. त्यासाठी दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतराचा प्रवास ते सायकलच्या माध्यमातुन करतात. प्रचारासाठी ७१ ग्रामपंचायती व २६ सहकारी सोसायट्यांना भेट देऊन ते आपला प्रचार करतील. पारंपारिक महाराष्ट्रीयन पेहराव, डोक्यावर गांधी टोपी, प्रवासासाठी सायकल व सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर स्मितहास्य एवढे भांडवल घेऊन ते घराबाहेर पडतात. 
२१ एप्रिल १९३० रोजी जन्मलेल्या नारायणरावांनी आपले अवघे जीवनच संघर्षात घालवले आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी नगर परिषद निवडणुक लढविली. नगरसेवक झाल्यावर जनतेच्या अडचणी घेऊन ते नेहमीच भांडायचे. त्यावेळी नगर परिषदेच्या राजकारणात बहुतांश त्यांचे नातेवाईक होते. मात्र तरी देखिल सत्ताधा-यांच्या असहकार्यामुळे जनतेच्या अडचणी सोडविण्यास अपयशी ठरल्याचे जाणवताच त्यांनी तातडीने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. यापुर्वीही एकदा त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापीतांना कडवी टक्कर दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन तिन मतांनी ते पराभुत झाले होते. सध्या ते घाटी घाटंजी विवीध सहकारी संस्थेचे सदस्य आहेत.
घाटंजीतील राजकीय, सामाजीक व सांस्कृतीक वर्तुळात ठाकरे घराण्याला अत्यंत मानाचे स्थान आहे. नारायणरावांचे चिरंजीव प्रविण ठाकरे तहसिलदार आहेत, मुलगी छाया महाले अधिव्याख्याता तसेच सामाजीक कार्यकर्त्या आहेत. दुसरे चिरंजीव प्रमोद ठाकरे उत्कृष्ठ चित्रकार आहेत. मात्र त्यांचे मन कधीच अशा झगमगाटात रमले नाही.सर्वसामान्यांमध्ये राहुन त्यांच्यासाठी झटणे हे एकच धेय्य त्यांच्या समोर आहे.
आजच्या निराशेने व्यापलेल्या दुनियेत नारायणरावांचे व्यक्तीमत्व एखाद्या दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे.