कापूस ठरला यातनांचे पीक.........!
कापूस म्हणजे पांढरं सोनं अन शेतकरी म्हणजे देशाचा कणा. खरं पाहिलं तर अशी वाक्ये निबंधामध्ये अन् भाषणामध्ये बरी वाटतात. वस्तूस्थिती मात्र विचित्र आहे सोन्याचा भाव किती आहे अन्पाठीच्या कण्याची काय अवस्था आहे याचे चिंतन केले तर संवेदनशिल माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. जखमेवर बांधल्या जाणार्या कापसालाच आज जखम झालीय. शेतकर्यांच्या यातनांचं गाठोडं मोठं झालं आहे. आज कापूस उत्पादक शेतकर्याच्या शिवारात स्मशान शांतता पसरली आहे. रानातली पक्ष्यांची शिळही आता त्याला नकोशी झालीय. सरकार कर्णबधीर झालयं, नेते एसीत बसून धोरण ठरवताहेत. पश्चिम महाराष्ट्रात एक राजू शेट्टी तयार झालाय विदर्भात केव्हा होणारं? ही आशा आता शेतकर्यांच्या मनांत घर करू लागलीय. मागील वर्षी कापसाला बर्यापैकी भाव मिळाला. म्हणूनच यंदा नव्या आशेनं शेतकर्यांनी जमिनीतं स्वप्नं पेरलं. कापसासाठी वाट्टेल तो खर्च केला. परंतु आज मात्र कापूस अनिश्चिततेच्या सावटात सापडला आहे. नाफेड, सीसीआयची दारं कधी उघडणार याचीच शेतकरी वाट पाहात आहे. सोयाबीनचं पीक पाहिजे तसं झालं नाही. कापूस तरी वाचवेल असं वाटत असताना ऐनवेळी निसर्गानं दगा दिला. एकरी अडीच ते तीन क्विंटलचा अँव्हरेज येतो आहे. एकरी खर्च बारा हजार रुपये व उत्पादन मात्र ११ हजार रुपयाचे अशी एकंदरित स्थिती आहे. कापसाच्या होणार्या चोर्या, खेडा खरेदीत होणारी लूट, वीज वितरण कंपनीचे सैतानी डावपेच, जागल करताना होणारा साप, विंचू यांचा त्रास व सरकारच्या मनातील कपटी अंदाज यामुळे कापसाचे पीक हे शेतकर्यांसाठी यातनांचेच पीक ठरले आहे.
सध्या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांसमोर प्रचंड मोठे संकट उभे ठाकले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून फोटो काढण्यापुरते मार्गदर्शन शेतकर्यांना होत आहे. शेती परवडत नाही म्हणून जमिनीचा मालक आता रोजगाराच्या शोधात स्थलांतर करूलागला आहे. येणार्या काळात ही वेदना अधिक तीव्र होणार आहे.
शेतकर्यांना आयुष्यभर आसवांच्याच पावसात भिजवित ठेवणार्या या व्यवस्थेत शेतकरी मात्र आता निराधार होतोय. विठ्ठल वाघ म्हणतात त्याप्रमाणे 'फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाह्ये, तरी मायमाऊलीची मांडी उघडीचे राहे' अशीच अवस्था कापूस उत्पादक शेतकर्यांची झाली आहे. कापसाची ही वेदना संपविण्यासाठी कुणीतरी आता पुढं आलंच पाहिजे.
संतोष अरसोड, नेर मो. 9423434315
साभार :- लोकमत
No comments:
Post a Comment