Pages

Friday 4 November 2011

घाटंजी नगर परिषदेत अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची ‘केविलवानी’ धडपड

अखेर बहुप्रतिक्षीत नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले. येत्या ८ डिसेंबरला नागरीक आपले शहर कोणाच्या हातात द्यायचे याचा निर्णय घेणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले असुन आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. गेली अडीच वर्षे सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेने न.प.निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अत्यंत केविलवानी धडपड सुरू केल्याचे निदर्शनास येत आहे. घाटंजी शहरासाठी व येथिल नागरीकांसाठी गेली दोन अडीच वर्षे जे केले नाही ते अवघ्या एका महिन्यात करण्याचा खटाटोप नगर परिषदेतील शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. आचार संहिता लागण्याच्या महिनाभर आधी शहरातील विवीध भागात रस्ते व नाल्यांची कामे एवढ्या वेगाने सुरू करण्यात आली की, मतदान करायला नागरीक त्या रस्त्यावरूनच जाईल की काय अशी परिस्थिती आहे. या धडपडीत बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचा दर्जा काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. निवडणुक तोंडावर आल्यामुळे गेल्या काही दिवसात शिवसेनेने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्याची वर्तमानपत्रातुन प्रसिद्धी करण्याचा सपाटाच लावला आहे. जनतेच्या मनात खदखदत असलेल्या या संतापाला प्रसिद्धीची पुंâकर घालण्याचा खटाटोप सध्या सुरू आहे. या नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवारांचीही कमतरता आहे. मागील महिन्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेल्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आमदार संजय राठोड यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ही निवडणुक शिवसेना भाजपासोबत लढणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात घाटंजीकरांनी आजवरचे सर्वात निष्क्रीय पदाधिकारी पाहिले. जनतेचे प्रश्न, शहरातील विवीध समस्या व विकास याचेशी काहीही देणेघेणे न ठेवता एकमेकांचे पाय ओढुन आपल्या पदरात मिळेल ते पाडुन घेण्यातच या पदाधिका-यांनी पाच वर्षे घालवली. आता जनतेच्या समोर जाण्याची वेळ आल्याने या ‘आणीबाणीच्या’ विकासकामांचा बेगड लावुन जनतेची दिशाभुल करण्याच्या या प्रयत्नाला मतदार कितपत भिक घालतात हे लवकरच स्पष्ट होईल.
साभार :- देशोन्नती

No comments:

Post a Comment