निवडणुक नि:पक्ष व्हावी याकरीता निवडणुक आयोग आचारसंहिता दिवसेंदिवस कठोर करीत आहे. मात्र नियम असले तरी त्याची अमंलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम नसल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन कागदोपत्रीच होत असल्याची बाब पुढे येत आहे. आचारसंहितेच्या काळात उमेदवार, राजकीय नेते यांच्याकडुन मतदारांना कोणतीही आमिषे देण्यात येऊ नये असा नियम आहे. मात्र घाटंजी शहरात या नियमाचे खुले आम उल्लंघन होत असुन प्रशासकीय यंत्रणेला याचा मागमुसही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
घाटंजी शहरात सध्या न.प.निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला असुन प्रत्येक उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहे. मात्र आपल्या कोरड्या आश्वासनांना मतदार आता भाव देणार नाही म्हणुन काही विद्यमान नगरसेवक व उमेदवारांनी आचारसंहितेच्या काळातच ठिकठिकाणी कामे करून देण्याचा सपाटा लावला आहे. विशिष्ट समाजाच्या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांनी धार्मिक भावनेचा आधार घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणुन शहरातील काही भागात विशिष्ट धर्मियांसाठी सभामंडप बांधण्याच्या कामाला ऐन आचारसंहितेच्या काळातच सुरूवात करण्यात आली आहे. ले आऊट मधिल ओपन स्पेस देऊन त्याठिकाणी तातडीने कम्पाउंड व तात्पुरते शेड सुद्धा उभे करण्यात आले आहेत. येथिल नृसिंह वार्डात खांडरे ले आऊट मध्ये अशाच प्रकारचे शेड उभे केल्यामुळे तेथिल नागरीकांनी यासंबंधी तक्रारही संबंधीतांकडे केली आहे. मात्र त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. स्मशानभुमीकडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला मुलींच्या वसतीगृहासमोर लोखंडी अँगलचा वापर करून टिनाचे शेड बांधणे सुरू आहे. एक नगरसेवक यासाठी स्वत: पैसे खर्च करीत असल्याची या भागात चर्चा आहे. असाच प्रकार आनंद नगर, घाटी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड या भागातही सुरू आहे. पंचायत समितीला लागुन असलेल्या मंदिरा समोर सुद्धा शेड उभारणीचे काम सुरू आहे. काही भागात नागरीकांनी विरोध दर्शविल्याने काम तात्पुरते बंद करण्यात आले आहे. संत मारोती महाराज वार्डात गेल्या आठ दहा दिवसांच्या काळात तिन हातपंप बांधल्या गेले आहेत. वसंतनगरात विज नसलेल्या भागामध्ये एक दोन दिवसात विजेचे खांब लावण्यात येणार असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली.
धार्मिक स्थळांना जागा देण्यात भावनेचे राजकारण करून त्यावर आपली पोळी शेकणारा उमेदवार आघाडीवर आहे. ले आऊट मधिल खुल्या जागेवर बगिचा अथवा तत्सम उपयोगाकरीता देण्याऐवजी वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावावर सभामंडप वाटण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. आचार संहितेच्या काळात अशा प्रकारे आमिषे देण्याचा प्रकार सुरू असुनही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असलेली यंत्रणा मात्र निद्रिस्त आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात आचारसंहितेचे किती पालन केल्या जाईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकंदरीतच ले आऊट मधील जागा वाटप, हातपंप व शेड उभारण्याच्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज असुन हा प्रकार नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला? नगर परिषदेने यासंबंधी आधीच ठराव घेतले आहेत का? याबाबत वरिष्ठांनीच चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment