Pages

Thursday 10 November 2011

घाटंजीत कॉंग्रेसच्या ‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांचा महामेळावा

११ तारखेच्या मुहूर्तावर होणार निष्ठेची परिक्षा
जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये ‘राष्ट्रवादी’ पक्षांतराचे संक्रमण झपाट्याने पसरत असल्याने कॉंग्रेसवर निष्ठावान कार्यकर्त्यांचा महामेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याची पाळी आली आहे. डोक्यावर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुका व त्यानंतर महिन्याभरातच होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे कॉंग्रेसला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. याचाच एक भाग म्हणुन दि. ११/११/२०११ ला ठिक ११ वाजुन ११ मिनिटांनी घाटंजी येथे कॉंग्रेसच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांचे हस्ते होईल. तर प्रमुख पाहुणे म्हणुन विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, कॉंग्रेसचे यवतमाळ जिल्हा प्रभारी अशोक धवड, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर, उमरखेडचे आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, अ.भा.महिला कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संध्या सव्वालाखे, महिला कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष विजया धोटे, घाटंजी न.प.निवडणुकीचे कॉंग्रेस समन्वयक दिलीप भोजराज यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन घाटंजी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
लवकरच कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मेगा पक्षांतर होणार आहे. त्या पृष्ठभुमीवर कॉंग्रेसचा हा महामेळावा महत्वाचा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment