तंटामुक्त ग्राम समितीचा आंदोलनाचा ईशारा
तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत घोटी व परिसरात अवैध व्यावसायीकांनी चांगलेच पाय पसरले असुन त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना जगणे कठीण झाले आहे. यावर नियंत्रण आणावे अशा मागणीचे निवेदन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, घोटी व ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन पारवा यांना दिले आहे. मात्र पोलीसांनी अद्याप यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार गेल्या काही वर्षांपासुन घोटी परिसरात गावठी दारू, जुगार, वरली मटका, कोंबडबाजार तसेच अवैध शिकार याला जोर चढला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा मात्र या अवैध व्यावसायीकांच्या अधिन असल्याचेच निदर्शनास येत आहे. अवैध व्यावसायीकांविरोधातील तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये ऐकल्याच जात नाहीत. घोटी येथे प्रेमनगर व रामनगर भागात रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी दारू विकल्या जाते. रस्त्यावर दारूड्यांची रेलचेल असल्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला वर्ग व सर्वसामान्यांना येथुन ये-जा करणेही दुरापास्त झाले आहे. काही दारूडे नेहमीच ग्रामसभेत येऊन व्यत्यय आणतात. अशी येथिल नागरिकांची तक्रार आहे.
मटक्याला तर व्यवसायाचा दर्जा दिला अशा तो-यात सुरू आहे. जे सर्वसामान्य नागरीकांना दररोज दिसते ते पोलीसांना का दिसु नये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अवैध व्यवसायीकांविरोधात कडक कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आदेश असले तरी पारवा परिसरावर मात्र या आदेशाचा कोणताही प्रभाव असल्याचे दिसत नाही. पारव्याचे ठाणेदार अवैध व्यावसायीकांना संरक्षण देत असल्याचा आरोप होत असुन वरिष्ठांनी तातडीने यावर नियंत्रण न आणल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरविंद राठोड, भाऊराव पुसनाके, प्रयाग जाधव, सदाशीव राठोड यांचेसह ग्रामस्थांनी दिला आहे.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment