पोलीस दहशतीत टॉवरचे काम
शेतक-यांमध्ये प्रचंड असंतोष
कापुस व सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतांना घाटंजी तालुक्यात शेतक-यांच्या पिकांवर विज पारेषण कंपनीची करडी नजर पडली आहे. शेतात पिके उभी आहेत. मात्र अशा अवस्थेतही विज पारेषण कंपनीने मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा बोलावुन दहशतीच्या वातावरणात शेतामध्ये टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
चोरांबा भागात मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या टॉवर उभारणीला शेतक-यांचा विरोध आहे. पारेषण कंपनीचे कर्मचारी शेतामध्ये घुसून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी देतात अशा आशयाची तक्रारही सुनिल पांढरमिसे, लियाकत तंव्वर, राजेश जाधव, पवन गोडे या शेतक-यांनी घाटंजी पोलीस स्टेशनला केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर या शेतक-यांनी शेतकरी नेते तथा देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या मार्गदर्शनानुसार या टॉवर उभारणी विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दि. ५ मे २०११ रोजी रिट पीटीशन याचीका (क्र.२१०७) दाखल केली आहे. सदर खटला अद्याप सुरू आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत टॉवर उभारणी करू नये अशी या भागातील शेतक-यांची मागणी आहे. मात्र विज पारेषण कंपनी व कंत्राटदाराने पोलीसांशी हातमिळवणी करून मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज शेतपिके पायदळी तुडवित टॉवर उभारणीच्या कामाला सुरूवात केली. या प्रकाराला विरोध केल्यास गंभिर गुन्हे दाखल करण्यात येतिल अशी धमकी पोलीसांकडुन देण्यात येत असल्याची शेतक-यांची तक्रार आहे. शेतक-यांवर दडपण आणण्यासाठी राखीव पोलीस दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.
विज पारेषणचे अधिकारी व पोलीसांच्या या दडपशाही विरोधात सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांचेसह स्थानिक नेते व कार्यकर्ते सुद्धा हस्तक्षेप करीत नसल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. हे काम त्वरीत न थांबविल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा शेतक-यांनी दिला आहे.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment