लाखेचे उत्पन्न घेणारे ‘रोलमॉडेल’ गाव
आपल्या नित्यपयोगातील ईलेक्ट्रॉनिक वस्तु, सौंदर्य प्रसाधने व इतरही अनेक कामात वापरल्या जाणारा ‘लाख’ हा पदार्थ कुठून येतो याबाबत अनेकांना कल्पनाही नसते. शासकीय कामकाजात ‘सिल’ लावण्यासाठी प्रामुख्याने उपयोगात येणा-या लाखेची शेती हा प्रयोग विदर्भासाठी नवखाच. मात्र घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी गावाने लाखेची शेती करून वर्षभरातच सुमारे १५ ते २० टन उत्पन्न घेण्यापर्यंतची मजल मारली आहे. वनविभाग व गावक-यांच्या सहभागातुन शासनाचा हा उपक्रम या गावाने सार्थ ठरवुन एक अनुकरणीय पायंडा घातला आहे.लाख शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी वनविभागातर्फे गावपातळीवर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले होते. राजुरवाडी येथे या समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर खंडाळकर यांची निवड करण्यात आली. खंडाळकर यांनी लाख शेतीचे महत्व ओळखुन गावातील बेरोजगार युवक, शेतकरी, शेतमजुर यांना या अभिनव उपक्रमाबद्दल जागृत केले.
लाख शेतीबाबत सविस्तर माहिती तसेच तंत्रजान आत्मसात करण्यासाठी खंडाळकर यांनी रांची (बिहार), कांकेर (छत्तीसगढ), बालाघाट (मध्यप्रदेश) याठिकाणी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गावातील बी.पी.एल.धारक आदिवासी तथा शेतमजुरांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
अन पाहता पाहता अवघ्या एका वर्षातच राजुरवाडी या छोट्याशा गावात लाखेचे सुमारे १५ ते २० टन उत्पन्न घेण्यात आले. अत्यल्प श्रम व खर्चात अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याने ग्रामस्थानांही या शेतीची आवड निर्माण झाली आहे.
लाख ही एकप्रकारची नैसर्गीक राळ आहे. मादा लाख किटकापासुन प्रजनन केल्यानंतर स्त्रावाच्या रूपात तयार होतो. भारतात केरिया लक्का नावाच्या लाख किटकाच्या दोन जाती आढळतात. ज्यांच्यापासुन कुसूमी व रंगीनी ही दोन प्रकारची लाख मिळते. लाखेचे उत्पन्न वर्षातुन दोनदा घेतल्या जाते. पळस, बोर, बाभुळ, खैर, वड, पिंपळ अशा पोषक वृक्षांच्या फांद्यांवर लाखेचे बिज (किटक) सोडल्या जातात. काही काळ लाखेच्या किटकांची शत्रु किटकांपासुन संरक्षण व्हावे यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यानंतर काही महिन्यानी परिपक्व झालेल्या लाखेच्या फांद्यांची छाटणी करतात. यामुळे झाडाचा आणखी विस्तार होतो. तसेच आपोआपच वृक्षतोड नियंत्रीत झाल्याने पर्यावरण संतुलनासही मोलाचा हातभार लागतो.
संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर खंडाळकर व सचिव वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक के.पी.गायकवाड यांनी या शासकीय योजनेला प्रभावीपणे राबविल्यामुळे राजुरवाडी गाव लाख उत्पादनात केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातही लक्षवेधी ठरले आहे. घाटंजीचे वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड.राठोड यांनी वेळोवेळी ग्रामस्थांना साहित्य, बिज तसेच मार्गदर्शन केल्याने ही योजना राबविणे सोपे झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. उपवनसंरक्षक सुधाकर डोळे, मुख्य वनसंरक्षक देवेंद्र कुमार यांनी राजुरवाडीला भेट देऊन लोकसहभाग व समितीच्या कामाची प्रशंसा केली आहे.
आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांसाठी लाख शेती संजीवनी ठरू शकते. त्यामुळे ईतर गावांनी राजुरवाडीपासुन प्रेरणा घेऊन हा प्रकल्प राबवावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुधाकर खंडाळकर तसेच वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक के.पी.गायकवाड यांनी केले आहे.
अमोल राऊत
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment