अवघ्या दहा बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीसाठी धावपळ सुरू असली तरी यावेळी मतदार व उमेदवारांमध्ये हवा तेवढा उत्साह दिसत नाही. गेल्या पाच वर्षातील कार्यकाळात नगर परिषदेच्या अक्षम्य ढिसाळपणामुळे नागरिकांमध्ये निवडणुक व उमेदवारांविषयी आपुलकीच उरली नाही.
ब-याच प्रतिक्षेनंतर घाटंजी न.प.नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाले आहे. त्यामुळे या खुर्चीवर बसण्याची अनेकांची सुप्त ईच्छा जागृत झाली असुन नगराध्यक्षपदासाठीच काही उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. गेल्या पाच वर्षात घाटंजीच्या नगराध्यक्षपदावर महिलाराज होते. याचा चांगलाच फायदा काही नगरसेवकांनी घेतला. या अडीच वर्षात तर नगर परिषदेत ‘ठाकुरकी’ने एवढा कहर केला की, लोकांचा नगर सेवकांवरील विश्वासच उडुन गेला आहे.यावेळी सुमारे चार माजी नगराध्यक्ष निवडणुक रिंगणात आहेत. प्रभाग क्र.१ मधुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवडणुक लढवित असलेले श्याम बेलोरकर यांनी १९९१ ते १९९६ पर्यंत नगराध्यक्षपद भुषविले. त्यानंतर १९९६ ते १९९८ पर्यंत जगदिश पंजाबी हे या पदावर विराजमान होते. सध्या त्यांनी प्रभाग क्र.३ मधुन कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे.१९९८ ते २००१ या काळात नगराध्यक्षपदी असलेल्या माया मंगाम यावेळी प्रभाग क्र.२ मधुन अपक्ष उमेदवार आहेत. तर २००६ ते २००८ मध्ये नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गा साखरकर प्रभाग २ मधुन भाजपाच्या उमेदवार आहेत.
या निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यास नगराध्यक्षपदी जगदिश पंजाबी यांनाच सधी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र राष्ट्रवादीला बहुमताचा कौल मिळाल्यास नगराध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच होणार असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कडुन श्याम बेलोरकर हे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. परंतु त्यांच्या दावेदारीला रा.कॉ.मधील दुस-या गटाकडुन आव्हान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर काही पक्षांनी महत्वाच्या उमेदवारांना नगराध्यक्षपदाचे चॉकलेट दाखवुन निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यास प्रवृत्त केले आहे. मात्र निवडणुक निकालानंतर नेमके काय चित्र पुढे येणार याकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment