राजकीय पक्षांना उमेदवारांची टंचाई
येत्या ८ डिसेंबरला होणा-या नगर परिषदेच्या निवडणुकीतून यावेळी तरी घाटंजी शहराला सक्षम नेतृत्व लाभणार का याची उत्सुकता प्रत्येक घाटंजीकराला लागली आहे. मागील निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने सत्ताधा-यांची गुर्मी उतरविल्यानंतर नव्या नेतृत्वाकडून मतदारांना चांगल्या कामांची अपेक्षा होती. मात्र खुर्चीवर बसताच नवख्या नगरसेवकांचा तोरा बदलला. निवडणुकित दिलेल्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला. अन त्यानंतर निगरगट्ट कारभाराच्या एका नव्याच पर्वाची सुरूवात झाली. अडीच वर्ष भाजप-रा.कॉ.च्या अभद्र युतीकडे नगराध्यक्ष पद होते. त्यांच्या मनमानी कारभारानंतर आरक्षणामुळे शिवसेनेकडे आयतीच सत्ता आली. बहुमत नसतानांही मिळालेल्या नगराध्यक्षपदाचा शक्य तितका फायदा सेनेने घेतला. अडीच वर्ष प्रशासनाला बोटावर नाचवुन ‘हम करे सो कायदा’ याच तत्वाने त्यांचे काम चालले.या निवडणुकीत प्रभाग पद्धत आल्यामुळे राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची कसोटीच लागणार आहे. एकुण १७ वार्ड पाच प्रभागात विभागल्या गेल्याने निवडणुक प्रचारात उमेदवारांची दमछाक होणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची केंद्र व राज्यात आघाडी असली तरी नगर परिषद निवडणुकीत मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहे. घाटंजी तालुक्यात निवडणुकीपुर्वी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांच्या सोबत एक मोठा गट रा.कॉ.मध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याने या दोन मुख्य पक्षामधील दरी आणखीच वाढली आहे. घाटंजीत मुख्य लढत या दोन पक्षांमध्येच होणार असा प्राथमिक अंदाज आहे. महिलांना मिळालेले पन्नास टक्के आरक्षण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती यामुळे राजकीय पक्षांना योग्य उमेदवारांची टंचाई भासत आहे.
तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी मात्र अनेक उमेदवार आपली दावेदारी सांगत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे दिर्घ प्रतिक्षेनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने बहुतांश उमेदवार नगराध्यक्षपदाकडे नजर ठेऊनच निवडणुकीचा विचार करीत आहे.
जात पडताळणीसाठी १५ नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवा
तहसिलदार संतोष शिंदे यांचे आवाहन
जानेवारी ते मार्च महिन्यात होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना जात पडताळणीचे प्रस्ताव १५ नोव्हेंबर पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करावे लागणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विषेश सहाय्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरीता राखीव प्रभागातुन निवडणुक लढविणा-या ईच्छुक उमेदवारांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तहसिल कार्यालयात सादर करावे असे आवाहन घाटंजीचे तहसिलदार संतोष शिंदे यांनी केले आहे.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment