Pages

Showing posts with label नगरपरिषद घाटंजी. Show all posts
Showing posts with label नगरपरिषद घाटंजी. Show all posts

Friday, 2 August 2013

घाटंजी पालिकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे अनुकंपा उमेदवाराची फरफट

जिल्हाधिका-यांचा आदेशही मुख्याधिका-यांसाठी ‘कवडीमोल’
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी शासन निर्णयानुसार पात्र असतांनाही केवळ घाटंजी पालिका मुख्याधिका-यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे विक्की माधव शेंद्रे हा उमेदवार नोकरीपासुन वंचित आहे.
सदर उमेदवाराने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि.१४ जुन २०१३ ला जिल्हाधिकारी कार्यालयाने घाटंजी नगर परिषदेला पत्र पाठवुन शासकीय निकषानुसार अनुकंपा तत्वावरील पद भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी असे सुचित केले होते. तसेच या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात यावा असेही या पत्रात नमुद करण्यात आले होते. मात्र जिल्ह्याधिका-यांनी आदेश देऊनही घाटंजी नगर परिषद प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.
त्यामुळे घाटंजी पालिका आता जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही महत्व देत नसल्याचेच सिद्ध झाले आहे. सुधारीत आकृतीबंधानुसार नगर परिषदेने पदभरती करतांना प्रथम पदोन्नतीची पदे, त्यानंतर अनुकंपा त्वावरील पदे, लाडकमिटीची पदे व शेवटी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सरळ सेवा भरती द्वारे पदे भरण्याचे निकष ठरवुन देण्यात आले आहेत. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदांनी आपल्या आस्थापनेवर कोणतेही पद कंत्राटी, हंगामी, मानधन तत्वावर अथवा प्रतिनियुक्ती द्वारे भरण्यात येऊ नये असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवुन नगर परिषदेचे पदाधिकारी व प्रशासन कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याच्या प्रयत्नात होते. 
नगर परिषदेच्या ग्रंथालयातील पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यास पात्र असलेला उमेदवार विक्की माधव शेंद्रे याने ग्रंथालय शास्त्रातही पदवी संपादन केली आहे. तसेच तो कला शाखेत पदव्युत्तर पदवीधारक आहे. सदर उमेदवाराचे वडील माधव शेंद्रे यांचा २५ जुन २००६ मध्ये कार्यालयीन कामकाजा दरम्यान मृत्यू झाला. ते लिपिक पदावर कार्यरत होते. त्यामुळे समकक्ष पदावर कार्य करण्यास सदर उमेदवार पात्र आहे. शिवाय अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये तो एकमेव उमेदवार आहे. तरी देखिल न.प.प्रशासनाकडून त्याला नियुक्ती देण्यास जाणिवपुर्वक दिरंगाई केल्या जात असल्याची तक्रार त्याने जिल्हाधिका-यांकडे केली होती. मात्र मुख्याधिकारी विपीन बन्नोरे हे जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही जुमानत नसल्याने कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडीलांच्या निधनामुळे कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी सदर उमेदवारावर आहे. अर्धांगवायुने ग्रस्त आई व तिन बहिणींसह कुटूंबाची उपजिवीका तो कशीबशी सांभाळत आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नगर परिषदेला नाही. जिल्हाधिका-यांचा आदेश झुगारणा-या मुख्याधिका-यांवर वरिष्ठांचा अंकुश नाही हे यातुन सिद्ध होत आहे. या प्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सदर उमेदवाराने ‘सकाळ’ शी बोलतांना सांगितले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

Tuesday, 8 January 2013

घाटंजी नगराध्यक्षपदी किशोर दावडा



नगर परिषद अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे किशोर दावडा यांची बिनविरोध निवड झाली. एक वर्ष नगराध्यक्षपद सांभाळुन जगदिश पंजाबी यानी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. घाटंजी नगर परिषदेमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आघाडी आहे. सत्तास्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार जगदिश  पंजाबी एक वर्ष, किशोर दावडा सहा महिने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे एक वर्ष व त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी आरक्षणानुसार नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. घाटंजी नगरपरिषदेमध्ये कॉंग्रेस ८, राष्ट्रवादी ४ तर शिवसेना ५ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. सुरूवातीचे अडीच वर्ष नगराध्यक्षपद खुले आहे. तर त्यानंतर अनुसूचित जाती (महिला) करीता आरक्षण निघाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस रा.कॉं.आघाडीमध्ये एकमेव असलेल्या चंद्ररेखा रामटेके यांचेकडेच नगराध्यक्षपद येणार आहे.
आज झालेल्या निवडणुक प्रक्रीयेत सेनेचे संतोष शेंद्रे यानीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दावडा यानी केलेल्या विनंतीनुसार अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली असे शेंद्रे यानी सांगितले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यानी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 18 September 2012

टाईमपास करणा-या अधिका-यांना धडा शिकविणार

मनसेचा ईशारा

आपले कर्तव्य विसरून तिन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करण्यासाठी टाईमपास म्हणुन टोलवाटोलवी करण्या-या अधिका-यांना मनसे स्टाईलनेच धडा शिकविल्या जाईल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आला. घाटंजी नगर परिषदेत मनसे कार्यकत्र्यांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर येथिल विश्रामगृहात पत्रपरिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बोक्से, प्रशांत धांदे, एस.टी. कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्याम चंदेल, जिल्हाध्यक्ष गाडगे पाटील, मनसेचे यवतमाळ तालुकाध्यक्ष संजय देठे, घाटंजी तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यांचेकडे केलेल्या तक्रारी, त्यावर दिलेली स्मरणपत्रे यावर मुख्याधिका-यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. दरवेळी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे त्यांनी दिली. सर्वसामान्यांनी विनापरवानगी बांधकाम केले तर न.प.त्यांचेवर दंड ठोठावुन कार्यवाही करते. मग विनापरवाना बांधकाम सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ईमारती व समर्थ मुकबधीर विद्यालयाला वेगळा न्याय का? त्यांचेवर कार्यवाही का करण्यात आली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तुंबलेल्या नाल्या, जीवघेणे रस्ते, बंद पडलेले पथदिवे, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा एक ना अनेक समस्या घाटंजी शहरात असतांना सत्ताधारी, विरोधक व मुख्याधीकारी आपापसात संगनमत करून मलिदा लाटण्यात व्यस्त आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. अवैध बांधकामांवर कार्यवाही करण्यात आली नाही तर यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेच ही अवैध बांधकामे पाडतील असा ईशारा प्रशांत धांदे यांनी यावेळी दिला.  केंद्र , राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता, स्थानिक आमदार मंत्री सत्ताधारी पक्षाचे असे असतांना घाटंजी शहराची भयाण अवस्था संतापजनक असुन राज्याचे अनुभवी मंत्री असलेले ना. मोघे यांच्या राजकीय प्रतिष्ठेला न शोभणारी आहे. त्यांनी आपले आर्णी प्रेम बाजुला ठेवुन घाटंजी शहराच्या विदारक परिस्थितीकडे लक्ष द्यावे असे आवाहन संजय बोक्से यांनी यावेळी केले. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढेही लढा देत राहिल. मात्र त्यासाठी जनतेनेही आम्हाला पाठींबा द्यावा असे बोक्से म्हणाले. यानंतर जनतेला सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी नगर परिषदेत लोकांच्या समस्या सोडविण्यास सपशेल अपयशी ठरली असुन ना.शिवाजीराव मोघे यांना घाटंजीच्या विकासाशी देणेघेणे नसल्याचा आरोप मनसेने यावेळी केला. उल्लेखनिय म्हणजे पत्रपरिषदेला उपस्थित असलेल्या एका कॉंग्रेस पदाधिका-यानेही मनसेच्या या आरोपाला दुजोरा दिला.

साभार :- देशोन्नती  


Friday, 13 July 2012

घाटंजी न.प.च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा ‘तो’ ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविला अवैध

सार्वजनिक उपक्रमाची जागा प्रार्थनास्थळाला दिल्याचे प्रकरण
मुख्याधिका-यांच्या भुमिकेवरही ताशेरे

नगर परिषद निवडणुक डोळ्यापुढे ठेवुन ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाची जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला देण्याबाबतचा घाटंजी न.प.चा वादग्रस्त ठराव जिल्हाधिका-यांनी अवैध ठरवुन तहकुब केला.
येथिल दत्ता बापुराव दातारकर व ईतर तिघांनी नगर परिषदेच्या या निर्णयाविरूद्ध जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली होती. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी जलाराम प्रभाग क्रं.१ मधील बापुराव खांडरे यांच्या ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाकरीता असलेली खुली जागा प्रार्थनास्थळाकरीता दिली होती. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अंतर्गत ८ डिसेंबर २०११ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये विषय पटलावर नसतांना अध्यक्षांच्या परवानगीने हा ठराव मांडून पारित करण्यात आला. यानुसार वात्सल्य बहुउद्देशीय विकास संस्थेला प्रार्थनास्थळासाठी ही जागा मंजुर करण्यात आली होती. मात्र परिसरातील मुलांना खेळण्यासाठी अथवा ईतर सार्वजनिक उपक्रमासाठी असलेली जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला दिल्यामुळे या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणुक आयोगाकडे तक्रारी केल्या.
तसेच जिल्हाधिका-यांकडे याप्रकरणी दाद मागण्यात आली. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड कोडापे यांनी सर्वसाधारण सभेतील ठराव क्रं.२ व न.प.मुख्याधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी व कार्यवाही स्थगीत ठेवण्याबाबत युक्तीवाद केला. न.प.ने ही जागा देतांना त्या परिसरातील भुखंडधारकांची संमती घेतली नव्हती. तसेच खुली जागा ज्या कारणासाठी दिली जावी त्यासाठी न देता विशिष्ट समाजाच्या धार्मिक कारणास्तव देण्यात आल्याने बांधकाम उपविधी व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिका-यांनी या आदेशास स्थगिती दिली. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदेने जिल्हाधिका-यांकडे सादर केलेल्या लेखी उत्तरात ले आऊटमधील जागेच्या १० टक्के जागा सार्वजनिक उपक्रमासाठी अनुज्ञेय असुन प्रार्थना स्थळाला देणे अपेक्षीत नाही असे स्पष्ट नमुद केले आहे. तसेच हा ठराव पारित करतांना नियमांचे पालन झाले नसल्याचे कबुल केले आहे.
मुख्याधिका-यांनी सदर आदेश पारित करतांना ठरावातील सर्व बाजु नियमातील तरतुदीस धरून पडताळून पाहिल्या नसल्याने हा आदेश अवैध ठरत असल्याचे जिल्हाधिका-यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे. शिवाय विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळाकरीता सार्वजनिक उपक्रमाची जागा दिल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे. 
घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी केवळ न.प.निवडणुकीत फायदा व्हावा या उद्देशाने हा ठराव घेतला होता. त्यावेळी देशोन्नतीने हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. अशा प्रकारचे अनेक बेकायदेशीर ठराव त्या काळात नगर परिषदेने घेतले असुन त्याची सविस्तर चौकशी झाल्यास अनेक गैरप्रकार पुढे येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 


Tuesday, 29 May 2012

ले-आऊट धारकांनी पाडले न.प.चे सार्वजनिक शौचालय


ले-आऊट मध्ये अडसर ठरत असलेले घाटंजी नगर परिषदेचे सार्वजनिक शौचालयच ले-आऊट धारकांनी पाडण्यास सुरूवात केल्याने न.प.प्रशासनाचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे. काही नागरिकांनी ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी ले-आऊट धारक राजीव राधामोहन बजाज, प्रदिप पुरूषोत्तम लोयलका, वर्षा राजेश ठाकुर यांना थातुर मातूर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 
येथिल शेत सव्र्हे क्रं.५५/२ मध्ये या भागातील रहिवाशांसाठी अनेक वर्षांपुर्वी नगर परिषदेने सार्वजनिक शौचालय बांधलेले आहे. परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्याचा उपयोगही करतात. या शौचालयाच्या मागील बाजुस असलेल्या शेतात ले-आऊट झाले आहे. या सार्वजनिक शौचालयामुळे प्लॉटचे भाव अपेक्षेप्रमाणे मिळणार नाहीत या उद्देशाने सदर ले-आऊटधारकांनी कोणताही विचार न करता शौचालयाचे बांधकाम पाडायला सुरूवात केली. सुमारे १० वर्षांपुर्वी तत्कालीन न.प.पदाधिका-यानी ले-आऊटधारकासोबत हे शौचालय पाडून दुस-या जागेवर दहा शौचालये बांधुन देण्याचा करार केला होता असे ले-आऊटधारकाचे म्हणणे आहे. 
मात्र दहा वर्षांपुर्वी केलेल्या तथाकथित कराराची अंमलबजावणी आजवर का केली नाही? तसेच न.प.ची मालमत्ता असलेल्या बांधकामाला पाडण्याचा अधिकार खासगी व्यक्तीला आहे का? असे प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत.
मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी सदर ले-आऊटधारकांवर फौजदारी अथवा दंडात्मक कार्यवाही न करता थातुर मातूर कारणे दाखवा नोटीस बजावून औपचारीकता पुर्ण केली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एवंâदरीतच नियमबाह्य होत असलेल्या कामांवर नगर परिषद प्रशासनाचे लक्ष नसुन सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतच नियमांवर बोट ठेवुन काम केल्या जात असल्याची ओरड होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Monday, 9 January 2012

नव्या नगरसेवकांपुढे अपेक्षा अन आव्हानांचा डोंगर


नगर परिषदेतील निवडीचे कार्यक्रम एकदाचे संपले. घाटंजीकरांनी निवडून दिलेले नवे नगरसेवक आता काहीसे स्थिरावले आहेत. यावेळी जनतेने नव्या चेह-यांना प्रामुख्याने संधी दिली आहे. १७ पैकी तब्बल १३ नगरसेवक नवखे आहे. त्यांना नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती होण्यास काही कालावधी नक्कीच लागेल. मात्र नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांची हे पद भुषविण्याची दुसरी वेळ आहे. त्यामुळे शहरातील समस्यांशी ते अवगत आहेत. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आल्याने संख्याबळाचीही चिंता नाही. एकंदरीतच या अगोदरच्या सत्ताधा-यांसारखा बहुमत नसल्याचा राग या आघाडीला आळवता येणार नाही.
घाटंजी शहर विकासाच्या बाबतीत कोसो दुर आहे. निवडणुक काळात सर्वांनीच मतदारांना विकासाची स्वप्ने दाखविली. मात्र विकास होईल अशी खोटी आशा देखिल मनात बाळगण्यास घाटंजीकर तयार नाहीत. खरं तर विकासाच्या वाटेवर चालण्यासही अजुन घाटंजी शहराला बराच काळ लागेल. विकास होणे हा लांबचा पल्ला आहे. नागरिकांना सध्या गरज आहे ती रस्ते, नाल्या, पाणी, स्वच्छता व लोकाभिमुख सेवेची. या प्राथमिक गरजा पुरविण्यास जरी सध्याचे नगरसेवक यशस्वी ठरले तरी जनतेच्या दृष्टीने तो विकासच ठरेल. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सत्तेवर असलेल्या निगरगट्ट पदाधिका-यांमुळे घाटंजीकरांचा नगर परिषदेवरील विश्वासच उडाला आहे. निवडणुकीवर डोळा ठेवुन शहरात विवीध विकासकामांची वेगाने सुरूवात करण्यात आली होती. प्रमुख रस्त्यांचे बांधकाम निवडणुक होईस्तोवर झालेही. मात्र ईतर कामे निवडणुक आटोपताच थंड पडली आहेत. त्यामुळे ही कामे केवळ निवडणुक डोळ्यापुढे ठेवुनच एवढ्या तडकाफडकी सुरू करण्यात आली होती ही बाब सिद्ध झाली आहे. निवडणुक काळात प्रचारासाठी लावण्यात आलेल्या मोठमोठ्या होर्डींग्सवरील रोषणाईने शहर न्हाऊन निघाले होते. मात्र आता   रस्त्यांवर अंधार दाटला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील ८० टक्के पथदिवे रात्री बंद असतात. शिवाय या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.  याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या बगिच्यांमध्ये सध्या जनावरे चरायला जातात. तालुक्याचे ठिकाण असलेल्या या शहरात केवळ एक नाममात्र सार्वजनिक मुत्रीघर आहे. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांनी सांडपाणी थेट रस्त्यावर सोडल्याने अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
अशा एकापेक्षा एक समस्यांचे आव्हान नव्या दमाच्या नगरसेवकांपुढे आहे. शिवाय निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांमुळे त्या अपेक्षांचेही ओझे आहे. या अपेक्षांच्या पुर्ततेकरीता नगरसेवक आपली शक्ती पणाला लावतात की, एकमेकांवर कुरघोडी करण्यात शक्ती वाया घालवतात याकडेच घाटंजीकर नजरा लावुन बसले आहेत.
अमोल राऊत

Wednesday, 28 December 2011

घाटंजीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे जगदीश पंजाबी

उपाध्यक्षपदी रा.कॉ.चे अकबर तंव्वर
नगराध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे जगदिश पंजाबी यांचा एकतर्फी विजय झाला. तर न.प.उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर तंव्वर विजयी झाले. नामनिर्देशीत सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे तसेच संजय राऊत यांची वर्णी लागली. नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे जगदिश पंजाबी व सेनेच्या शर्मिला उदार यांनी नामांकन दाखल केले होते. यामध्ये १३ नगरसेवकांनी पंजाबी यांच्या बाजुने तर केवळ ४ नगरसेवकांनी शर्मिला उदार यांच्या बाजुने मतदान केले. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर तंव्वर व सेनेच्या सरोज पडलवार यांनी नामांकन दाखल केले होते. तंव्वर यांना १३ व पडलवार यांना ४ मते पडली. गटनेत्यांच्या निवडीवर शिवसेनेने मोठ्या दिमाखाने आक्षेप घेतला होता. मात्र पीठासीन अधिका-यांनी तो फेटाळला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्याने नगराध्यक्षपदी पंजाबी यांची निवड जवळजवळ निश्चित झाली होती. सकाळी १० वाजता निवडणुक प्रक्रीयेला सुरूवात झाली. दुपारी २ वाजताच्या सुमारास निकाल घोषीत झाला. यावेळी नगर परिषदेच्या परिसरात नागरीकांची प्रचंड गर्दी जमली होती. निकालानंतर शहरातुन विजयी मिरवणुक काढण्यात आली.  पीठासीन अधिकारी म्हणुन उपजिल्हाधिकारी एस.पी.झंझाड होते. मुख्याधिकारी गिरिश बन्नोरे तसेच नगर परिषद कर्मचा-यांनी निवडणुक प्रक्रीया पार पाडली. पोलीस उपनिरिक्षक अरूण कोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Monday, 19 December 2011

घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेस-रा.कॉ. आघाडी


नगर परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडी करून सत्ता स्थापीत करणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
नगर परिषदेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नेमकी कोणत्या दोन पक्षांची युती होणार याकडे घाटंजीकरांचे लक्ष लागले होते. आज सायंकाळी दोन्ही पक्षांच्या झालेल्या बैठकीत याबाबत एकमत झाल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. संख्याबळानुसार कॉंग्रेसकडे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला जाईल. निवडणुक निकालात कॉंग्रेसला सर्वाधीक ८ जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ५ तर सेनेकडे ४ नगरसेवक आहेत. निकालानंतर रा.कॉ.-सेना युती होणार असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र शिवसेनेशी वैचारीक सामंजस्य होण्याची शक्यता नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कॉंग्रेस सोबतच हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यातच जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांचेसह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे या दोन पक्षात पराकोटीचे वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर मनोमिलन होणार की नाही याबाबत सर्वच साशंक होते. मात्र केंद्र व राज्यात असलेल्या आघाडीचा आधार घेऊन व शहर विकासाच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी एक चांगला निर्णय घेतल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
साभार:- देशोन्नती

Thursday, 15 December 2011

घाटंजी नगर परिषदेची धुरा तरूणाईच्या खांद्यावर द्यावी

नगर परिषद निवडणुकीत संमिश्र निकाल लागल्याने घाटंजीत त्रिशंकु सत्ता स्थापीत होणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचीच पुनरावृत्ती होते की काय अशी भीती घाटंजीकरांमध्ये आहे. केवळ एका विजया अभावी बहुमता पासुन वंचीत राहिलेल्या कॉंग्रेसकडे आठ नगरसेवक आहे. मागील निवडणुकीपेक्षा कांग्रेसने सहा जागांची आघाडी मिळविली आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला अंतर्गत कुरघोडींमुळे केवळ पाच जागांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेला एका जागेची बढत मिळाली असली तरी प्रमुख उमेदवारालाच घाटंजीकरांनी पराभवाची चपराक लगावल्याने चार जागांवरील विजय सेनेच्या जिव्हारी लागला आहे. आजवरच्या नगरपरिषदेतील ढिसाळ कारभारामुळे नागरिक संतप्त आहेत. कुणीही सत्तेत आले तरी सारखेच अशी भावना निर्माण झाली आहे. घाटंजीकरांमध्ये आलेली ही निराशा दुर करायची असल्यास नव्या दमाच्या नगरसेवकांवर न.प.ची धुरा देण्याची गरज व्यक्त होत आहे. मतदारांनीही काही प्रभागात प्रस्थापीतांना नाकारून नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे. यापासुन धडा घेत नेत्यांनीही नगर परिषदेची सत्ता तरूणाईच्या हातात देणे ही शहर विकासासाठी आवश्यक बाब समजल्या जात आहे. गेली काही वर्षे नगराध्यक्षपदी महिला विराजमान होत्या. त्यामुळे त्यांच्या पदाचे सर्व अधिकार नवरोबांच्याच हातात होते. तसेच अनुभवी नगरसेवकांनीही नगराध्यक्षाच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन नगराध्यक्षपदावर सत्ता गाजविली. या विचित्रपणाला जनता कंटाळली असुन निर्णयक्षमता असलेल्या व्यक्तीकडेच पदे असावीत असा मतप्रवाह निर्माण होत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस मधुन संदिप बिबेकार, परेश कारिया, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राम खांडरे व सेनेचे संतोष शेंद्रे या नव्या पिढीला जनतेने निवडुन दिले आहे. यांना पुढे करून जेष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शनाचे कर्तव्य बजावल्यास तो ख-या अर्थाने जनादेशाचा सन्मान होईल. घाटंजी तालुक्यात आजवर नविन नेतृत्व पुढे आल्याचे दिसले नाही. ज्यांना योगायोगाने पदे मिळाली त्यांच्या पदाचा प्रभाव नेत्यांच्या वलयामुळे दिसला नाही. तर कधी नेत्यांनी पद देऊन अधिकार स्वत:कडेच ठेवल्याने नवख्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाली नाही हे घाटंजी तालुक्याचे दुर्दैव आहे. त्यामुळे किमान आता तरी जेष्ठ नेत्यांनी नव्या नगरसेवकांच्या उत्साहाचा वापर शहर विकासासाठी करावा. केवळ नाममात्र पद न सोपवता त्या पदाचे अधिकार सुद्धा खुल्या दिलाने प्रदान करावे अशी घाटंजीकरांची व नव्या पिढीची भावना आहे. नेते जनतेच्या या भावनेचा किती आदर ठेवतात हे लवकरच पुढे येणार आहे.
साभार:- देशोन्नती

Thursday, 8 December 2011

नागरीकाचा ‘संताप’ पाहुन वाढला सेना नगरसेवकाचा ‘रक्तदाब’

वर्तमान नगरसेवकांना आपल्या पाच वर्षातील उठाठेवींमुळे ही निवडणुक चांगलीच जड जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. याबाबत देशोन्नतीने ‘घाटंजीत वर्तमान नगरसेवकांसाठी दरवाजे बंद’ या मथळ्याखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते. आतापर्यंत केवळ दरवाजे बंद करणारे नागरीक उघडपणे या नगरसेवकांना जाब विचारायला लागले असुन त्यातुनच काही ठिकाणी संघर्षही निर्माण झाल्याचे चित्र आहे. केवळ दडपशाहीच्या आधारावरच राजकारणात आपले अस्तित्व टिकवणारा एक नगरसेवक व त्याचे कार्यकर्ते प्रचारादरम्यानही मतदारांशी चढ्या आवाजातच बोलत असल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सुर आहे.
अडीच वर्षे नगराध्यक्षपद हातात असतांना बहुमत नसल्याचे कारण सांगुन आपली अकार्यक्षमता व मनमानी कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणा-या सेनेच्या नगरसेवकावर सर्वसामान्य नागरीक प्रचंड नाराज असल्याचे दिसुन येत आहे. यापुर्वी घाटी प्रभागातील एका वार्डातुन निवडुन आलेल्या या नगरसेवकाने गत निवडणुकीत दिलेली आश्वासने पुर्ण न झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये संताप आहे. मात्र आतापर्यंत कुणीही ऐकण्यास नसल्याने निवडणुकीच्या निमित्याने प्रचारादरम्यान नागरिक या नगरसेवकाची चांगलीच ‘झडती’ घेत आहेत. कालपरवा प्रचारादरम्यान एका नागरिकाने सदर नगरसेवकाला खडसावुन जाब विचारला. ‘‘चांगली कामे तर केलीच नाहीत पण आमच्या पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकविले अन आता पुन्हा आमच्याकडेच मते मागायला आलात?’’ असा सवाल त्याने करताच ‘भाऊंच्या’ कार्यकर्त्यांचे पित्त खवळले. त्यांनी त्या नागरीकाला दम दिला व नगरसेवकाला, ‘जाऊ द्या भाऊ तो शहाणाच आहे, नंतर पाहु त्याला...’ असे म्हणुन तिथुन सटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नागरिकानेही कार्यकर्त्यांच्या दमदाटीला तेवढ्याच खंबिरपणे उत्तर दिले. त्यावेळी या परिसरात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घडामोडींमुळे या नगरसेवकाचा अचानक रक्तदाब वाढला व त्यांना ऑटो मध्ये बसवुन तातडीने तिथुन हलविण्यात आले. कार्यकर्त्यांनी नागरिकास केलेल्या दमदाटीची पोलीस तक्रार होईल या भितीने प्रचारात असलेल्या सर्वांनीच काढता पाय घेतला. असे या भागातील नागरीकांनी सांगितले.
त्याच प्रमाणे शासकीय विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतही या नगरसेवकाला असाच अनुभव आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नाल्यांचा होत नसलेला उपसा, रस्त्यांची दुरावस्था व अनेक अडचणींनी व्यापलेल्या भागात या नगरसेवकाने आजवर फिरकुनही पाहिले नसल्याने एक महिला त्यांचेवर चांगलीच बिथरली. आता इकडे पाय सुद्धा ठेऊ देणार नाही असे खडसावुन त्या महिलेने चक्क त्या नगरसेवकावर पायताण उगारली. महिलेचा संताप पाहुन नगरसेवकाचे कार्यकर्ते अवाक झाले. त्यानंतर सर्वच तिथुन खाली मान घालुन निघुन गेले असे सांगण्यात येत आहे. सेनेच्या नगरसेवकाला नागरिकांनी  धुडकाविल्याची खमंग चर्चा घाटंजी शहरात सुरू असुन येत्या दोन तिन दिवसात सेनेच्या या नगरसेवकाला आणखी किती ‘झडती’ द्यावी लागणार याकडे घाटंजीकरांचे लक्ष लागले आहे.
साभार:- देशोन्नती

Friday, 25 November 2011

घाटंजीत विकासाची गोळाबेरीज शून्य

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शहरामध्ये घाटंजीचा समावेश होतो. येथे निर्सगाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. मात्र या आडवळणावरच्या शहराला सौंदर्यांची विकासात्मक झालर लावणे गेल्या १५ वर्षात नगरपरिषदेतील सत्ताधार्‍यांना जमलेच नाही. चार प्रभाग असलेल्या छोट्याश्या शहरात समस्यांचे अनेक डोंगर आहेत. नगरपरिषद असून अनेक ठिकाणी प्राथमिक मुलभूत सुविधा पोहचल्या नाहीत. नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि हौसेगवसे नवसे यांची लगीनघाई सुरू झाली. नमस्कार चमत्काराला वेग आला. यात काही नवीन चेहरे आहेत तर काही जुने चेहरेही आहेत. अशांनी नगर विकासासाठी काय दिवे लावले आहे याची जंत्रीच मतदारांजवळ आहे. 
शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी प्रभाग एक ते चार मध्ये फेरफटका मारला असता तेथे विविध समस्यांचा दिसून आल्यात. प्रभाग एक मधील नेहरूनगर परिसरात अंतर्गत पक्के रोड नाही. नालीतील घाण पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे. घन कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग लागले आहेत. स्वच्छतेसाठी कोणतीची यंत्रणा कार्यतरत नसल्याचे स्पष्ष्टपणे जाणवते. साचलेला कचरा जागेवरच कुजून त्यांची दुर्गंधी सुटली आहे.पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी आहे. नळांची जोडणी ही जुनी असल्याने पाणी पूरवठा बरोबर होत नाही तर काही भागात नळच नाही. वसहतीपासून वाहणार्‍या नदीवर संरक्षण भिंत नसल्याने दरवर्षी पुराचे पाणी अनेकांच्या घरात घुसते. दुर्गामाता वॉर्डातील रस्त्यावर अनेकवर्षांपासून डांबरीकरणच झाले नाही. मात्र परिसरातील एका पदाधिकार्‍याने स्वत:सह नातेवाईकांच्या घरापर्यंत डांबरीकरण करून घेतले आहे. हा अन्याय उघड्या डोळ्य़ांनी नागरिकांनी पाहिला आहे.सांडपाण्याच्या नाल्यासुध्दा अर्धवट असल्याने सांडपाणी रस्त्यावरच साचत आहे.डबके साचले असून त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. अर्धवट नाल्याच्या सफाईची तसदीही घेतली जात नाही. त्याची सफाई नागरिकानाच करावी लागते. दुर्गा माता वॉर्डपरिसरातील नाल्यावरची संरक्षण भिंतसुध्दा अर्धवटच आहे. पावसाळ्य़ात याही भागाला पूराच्या पाण्याचा तडाखा बसतो.

धर्मशाळा वॉर्डमध्येही अर्धवट कच्च्या नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून गटारे तयार झाली आहे. येथील एका सार्वजनिक शौचालयास आडवे टीनपत्रे लावून केला. त्यामुळे हागणदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेसीस कॉलनीमध्येही अंतर्गत रस्त्याची समस्या आहे. नाल्या व सांडपाण्याची व्यवस्था नाही. अंबादेवी वॉर्डात तर अंतर्गत रस्ते नाही आणि वीजही नाही. कसेबसे येथील १0 लोकांनी मिळून पैसे भरून घरी वीज घेतली आहे. येथे आता एक रोड होत आहे पण तोही नागरिकांच्या पाठपुराव्यानेच होत आहे. आंबेडकर वॉर्ड प्रभाग चारमध्ये येत असून तो नदीकाठी आहे. तेथे संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे. आनंदनगरमध्ये चालता येण्याजोगे रस्ते नाही, नाल्या नाही, सांडपाणी रस्त्यावरून वाहते, काही ठिकाणी ही घरात शिरते, परिसराची साफसफाई नागरिकच करतात. येथील पथदिवे तक्रार दिल्यानंतर १५ दिवस बंद राहतात. अनेकदा चालूच होत नाही. येथे डुकरांचा मुक्तसंचार आहे. डूकरांच्या हल्ल्यात अनेक लहान मुले जखमी झाली आहेत.डुकरांच्या भितीने मुलांना अपल्या खेळास मुकावे लागत आहे. अशाही स्थिती नगरपरिषद प्रशासनाने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीच मोहिम हाती घेतली नाही.


 शहरातील वसंतनगरमध्येही रोड नाही, नाल्या नाही, वीजही नाही. त्यामुळे येथील ५0-६0 महिलांनी तहसील व नगरपरिषदेवर तीन-चारवेळा मोर्चा नेला. पण समस्या सुटल्या नाहीत. प्रभाग दोनमध्ये येणार्‍या घाटी भागात हागणदारीची मोठी समस्या आहे. हागणदारी मुक्तीसाठी शासनाने अनेक कार्यक्रम राबविले, पथनाट्ये, नाटके केली पण परिणाम शून्यच राहिला. नागरिकांनीही बोध घेतला नाही. लहान पूल ते पारवा रोडवर लोकांनी उघड्यावर बसू नये म्हणून एक मोठी भिंत बांधून आडोसा केला आहे. या आडोशामागे हागणदारी होत आहे. त्या भिंतीऐवजी तिथेच दोन-चार शौचालय बांधले असते तर ते कमी खर्चाचे झाले असते., शिवाय हागदारीचा प्रश्नही निकाली निघाला असता.परंतु सम्येचे कायमस्वरूपी निराकरण करायचेचं नाही, असा प्रघात आहे. स्मशानभूमीवर शेड असून उत्तरक्रियेसाठी कोणतीच व्यवस्था नाही.
कधी थांबणार पुराचे पाणी?
समस्यांचा खच असल्याने महत्वाची कोणती असा भेद करता येत नाही. आजही पावसाळ्य़ात लगतच्या नदीनाल्यांचे पाणी वसाहतीत शिरते त्यासोबतच घाणही वाहून येते. अर्धवट नाल्या व पूरसंरक्षक भिंती, कच्चे रस्ते, रस्त्यावर काळोख, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नगरपरिषद असूनसुध्दा अंत्यविधीसाठी सुव्यवस्थित स्मशानभूमी नाही. साधे दहनशेड उभारणेही आजपर्यंत जमलेच नाही.
शौचालयाची दुरवस्था
दुर्गामाता वॉर्डातील सार्वजनिक शौचालयाची स्थिती अतिशय बिकट आहे.शौचालयाला दारेच नसल्याने तिथे डुकरांनी डेरा घातला आहे. नागरी वसहातीत बंद पडलेल्या शौचालयाच्या घाणीची दुर्गंधी पसरली आहे. त्यातील घाण तीनही बाजूंनी असलेल्या नालीत साचली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना घरात राहणेही नकोशे झाले आहे. नगरपरिषदेला याचे काही देणे-घेणे नाही. पावसाळ्यात तर येथील स्थिती अतिशय भयावह होते. तसेच हागणदरीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे.

सौंदर्यीकरणाचा विसर
केवळ राजकारण आणि राजकारण यातच गुरफटून असलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वच नगरसेवकांना शहराच्या सौंदर्यीकरणाचा विसर पडला आहे. शहर हिरवेगार दिसावे, सुंदर असावे हे त्यांना कळलेच नाही. एक बगीचा होता तो नगरपरिषदेने खासगी संस्थेला देऊन उजाड केला. दुसरे उद्यान दुर्लक्षित आहे. तर घाटी रोडवर लोकसहभागातून काही युवकांनी लावलेल्या झाडांना पाणी टाकणेही नगरपरिषदेला जमले नाही. मुलांना बागडण्यासाठी शहरात एकही बगीचा नाही.
 
उघड्यावर कचर्‍याचे ढिग
शहरातील कचरा वसंतनगरकडे येणार्‍या मुख्य रस्त्याच्याकडेला आणून टाकला जात आहे. पालिकेने वसंतनगर परिसरात अनधिकृत कचरा डेपोच उघडला असल्याचे यावरून दिसते. नगरपरिषदेच्या कामात भर टाकण्याचे काम डुकरांकडून केले जाते. हा कचरा इतरत्र पसरवितात. शिवाय हवेबरोबर हा कचरा रस्त्यावर येऊन घाणीचे कण ये-जा करणार्‍याच्या अंगावर उडतात. यामुळे रस्त्यावरून पायदळ जाणेही दुष्कर झाले असल्याचे दिसून येते.
साभार-लोकमत
विठ्ठल कांबळे
9421774062

Wednesday, 23 November 2011

मध्यरात्री लागलेल्या आगीत दुकान भस्मसात

शहरातील मुख्य बाजारपेठेत नगर परिषद व्यापारी संकुलात असलेल्या अजमेर मार्केटिंग या दुकानाला काल मध्यरात्री भिषण आग लागली. या आगीत संपुर्ण दुकान व साहित्य जळुन खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री १२ वाजताच्या सुमारास येथिल व्यापारपेठ बंद असल्यामुळे सगळीकडे सामसुम होती. काही नागरीक या भागातील चौकात बसुन होते. त्यांना दुकानातुन धुर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधीतांना कळविले तसेच या भागातील नागरीकांना गोळा केले. पोलीस विभागाला सुचना देण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक कोंडे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. यवतमाळ येथिल अग्निशमन यंत्रणेला बोलविण्यात आले. मात्र तोवर आग विझविण्यासाठी घाटंजी नगर परिषदेकडे असलेला पाण्याचा टँकर आणण्यासाठी सुचना देण्यात आली. मात्र सदर टँकर रिकामा असल्याने तो भरण्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागला. विषेश म्हणजे यावेळी कर्तव्यावर असलेल्या टॅ्रक्टर चालकाकडे चावीच नव्हती. शिवाय या टँकरचा पाईप सुद्धा फुटलेला होता. योग्य वेळी हा टँकर न पोहचल्याने सदर दुकान भस्मसात झाले. नागरीकांनी परिसरातुन पाण्याची व्यवस्था करून आग पसरू दिली नाही. यवतमाळ येथुन अग्निशमनाची गाडी आल्यावर आग आटोक्यात आली. मात्र सिराज अजानी यांच्या मालकीचे अजमेर मार्केटिंग हे दुकान संपुर्णपणे आगीच्या तडाख्यात खाक झाले. आग शॉर्ट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
न.प.चे ‘अग्निशमन’ थंडबस्त्यात
काही महिन्यांपुर्वी राज्य शासनाकडून नगर परिषदेला अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. न.प.ला आपला सहभाग नोंदवायचा होता. मात्र नगर परिषदेकडे पैसाच नसल्याचे कारण पुढे करून विद्यमान पदाधिका-यांनी अग्निशमन यंत्रणा उभारण्यास नकार दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे सोंग उभे करणा-या न.प.पदाधिका-यांना नागरिकांच्या जिवीताशी संबंधीत सुविधेबद्दल किती आस्था आहे हेच यावरून स्पष्ट होते. नागरिकांनीही न.प.निवडणुकीच्या निमित्ताने यावर वर्तमान
पदाधिका-यांना जाब विचारण्याची गरज आहे.

Tuesday, 22 November 2011

नगर परिषद निवडणुकीसाठी प्रतिक्रीया पाठवा


घाटंजी न्युजच्या सर्व वाचकांसाठी सुचना
येत्या ८ डिसेंबरला घाटंजी नगर परिषदेची निवडणुक होऊ घातली आहे. घाटंजी शहराची वर्तमान स्थिती आपल्या नजरेसमोर आहेच. त्यामुळे या निवडणुकीत निवडुन येणा-यांकडुन आपणास काय अपेक्षा आहेत? तुम्हाला आजवर नगर परिषदेत कोणत्या समस्याना सामोरे जावे लागले? न.प.च्या गत पाच वर्षांच्या कार्यकाळाबाबत तुमचे प्रांजळ मत काय? तसेच निवडणुकी संदर्भातील कविता, चुटकुले, वात्रटीका आमचेकडे तुमच्या छायाचित्रासह पाठवा. तुमच्या प्रतिक्रीयाना अवश्य प्रसिद्धी दिली जाईल. मात्र प्रतिक्रिया वैय्यक्तीक द्वेष, आकस अथवा सुडबुद्धीने लिहीलेली नसावी. कोणावरही
 वैय्यक्तीक टिका असलेली प्रतिक्रीया
 प्रसिद्ध केल्या जाणार नाही.
आपली प्रतिक्रीया खालील ई मेल वर पाठवावी. 
तसेच शक्यतो मराठीत असावी. 

E-Mail-   ghatanjinews@gmail.com

Monday, 21 November 2011

कुणी काढणार ‘काटा’ तर कुणी घालेल ‘टोपी’

अपक्षांसाठी ४९ मनोरंजक निवडणुक चिन्हे
आता त्याचा ‘काटा’ काढायचाच,अरे हा आता कुणालातरी ‘टोपी’ घालणार अशी वाक्य या निवडणुकीत ऐकायला येणार आहेत. कारण निवडणुक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी एकापेक्षा एक मनोरंजक चिन्हे दिल्याने निवडणुकीच्या गरमागरमीत खुसखुशीत चर्चेची भर पडणार आहे.
अपक्ष उमेदवार जरी फारसे चर्चेत येत नसले तरी त्यांना देण्यात येणारी चिन्हे मात्र निवडणुक काळात चांगलेच मनोरंजन करतात. नगर परिषदेसाठी नामांकन दाखल करण्याला  आता केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दिवशीच नामांकन अर्ज दाखल करतील. पक्षीय उमेदवारांसोबतच न.प. निवडणुकीत अपक्षांचाही भरणा असतो. अपक्षांना देण्यात येणारी निवडणुक चिन्हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यावर्षी निवडणुक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी ४९ मुक्तचिन्हे निश्चित केली आहेत. तसेच राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्षांची यादीही निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये बहुजन समाज पार्टी (हत्ती), भारतीय जनता पार्टी (कमळ), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (कणिस आणी विळा), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्र्ससिस्ट) (हातोडा विळा आणी तारा), इंडियन नॅशनल कॉंग्रेस (हात-पंजा), नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी (घड्याळ), राज्यस्तरीय पक्षांमध्ये शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) याशिवाय २३५ नोंदणीकृत राजकीय पक्षांची यादीही आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
तर अपक्षांसाठी ४९ मुक्त चिन्हे ठरविण्यात आली आहेत. त्यामध्ये कपाट, फुगा, टोपली, बॅट, फलंदाज, बॅटरी टॉर्च, फळा, पाव, ब्रिफकेस, ब्रश, केक, कॅमेरा, मेणबत्त्या, छताचा पंखा, कोट, नारळ, कंगवा, कपबशी, डिझेल पंप, विजेचा खांब, काटा, कढई, गॅस सिलेंडर, काचेचा पेला, हारमोनियम, हॅट, आईस्क्रिम, इस्त्री, जग, किटली, पतंग, पत्रपेटी, मका, नगारा, अंगठी, रोडरोलर, करवत, कात्री, शिवणयंत्र, शटल, पाटी, स्टुल, टेबल, टेबल लॅम्प, दुरदर्शन, तंबू, व्हायोलीन, चालण्याची काठी, शिटी ही चिन्हे आहेत. यावेळी एका प्रभागात एकच मुक्त चिन्ह अपक्षांसाठी राहणार अशी चर्चा आहे. त्यामुळे पॅनल लढविणा-यांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र
चिन्ह वाटपाबाबत अजुन आयोगाकडुन स्पष्ट निर्देश प्राप्त व्हायचे आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार संतोष शिंदे यांनी देशोन्नतीशी बोलतांना दिली.
साभार:- देशोन्नती 

Sunday, 20 November 2011

काय करावे कळेना, कुणाचेच कुणाशी जुळेना


सेनेच्या कुटीलतेमुळे भाजप अडचणीत
राष्ट्रवादीला पोखरतोय ‘उंदीर’
कॉंग्रेसमध्ये एकछत्री कारभार
केवळ व्यक्तीगत स्वार्थावर केंद्रित झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असुनही राजकीय पक्षांची रणनिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस  या पक्षांमध्ये होणार असे चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी प्रथमच निवडणुक रिंगणात उतरणार अशी चर्चा असली तरी त्या दृष्टीने तयारी दिसत नाही. शिवसेनेचा स्थानिक नेता कुटील नितीचा अवलंब करून आपले लयास जात गेलेले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे. कॉंग्रेस मध्ये असलेला एक मोठा गट नुकताच राष्ट्रवादी मध्ये आल्याने पक्ष सशक्त झाला आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणुन प्रोजेक्ट करण्याचा पक्षाचा मानस असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रवादीला होऊ शकतो. मात्र बेलोरकरांच्या वर्चस्वाला तिरप्या नजरेने पाहणारा एक गट राष्ट्रवादीत आहे. या गटाला नगराध्यक्षपद आपल्याच खिशात असावे अशी तिव्र ईच्छा आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नियोजनाची सुत्रे याच गटाकडे आहेत. मात्र नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जाणा-या श्याम बेलोरकरांना निर्णय प्रक्रीयेमध्ये फारसे महत्व दिल्या जात नसल्याने राष्ट्रवादी मध्ये दोन गटात कुरबुर सुरू आहे. केवळ जातीच्या राजकारणाचा आधार घेऊन ईकडे तिकडे उड्या मारणारा एक ‘उंदीर’ राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये पोकळी निर्माण करीत आहे. यापुर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नगरसेविकेला नगराध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हेतुने हे सगळे कारस्थान सुरू आहे. याच उठाठेवीचा एक भाग म्हणुन राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवाराला प्रभाग एक मधुन हटवुन शिवसेनेच्या उमेदवारासाठी मैदान मोकळे करण्याचाही घाट रचला जात आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सकारात्मकतेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कॉंग्रेसमध्ये अगदी याऊलट चित्र आहे. नगर परिषदेसाठी निर्णय घेण्याचे सर्वाधीकार माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना आहेत. अन्य कोणाचीही लुडबूड ऐकल्या जाणार नाही असा अलिखित करारच झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकछत्री असला तरी त्याचा फायदाच कॉंग्रेसला होणार आहे.
भाजप व शिवसेनेची युती व्हावी असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी शिवसेनेने कुटील डाव खेळुन सर्व महत्वाच्या जागा आपल्याकडे ठेवुन घेतल्या. दबावात येऊन सेनेशी सलगी करणारा भाजप मधला एक गट सोडला तर उर्वरीत भाजप कार्यकत्र्यांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे झुकण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुक लढविणे श्रेयस्कर असल्याची अनेक कार्यकत्र्यांची भावना आहे. एकंदरीतच युती झाली तरी मनोमिलन मात्र होणार नाही हेच वर्तमान परिस्थितीवरून दिसते.
गेली पाच वर्षे एकमेकांचे पाय ओढुन घाटंजी शहराला एखाद्या खेड्यापेक्षाही दयनिय केलेल्या नगर परिषदेच्या महाभागांमध्ये निवडणुक काळातही समन्वय असल्याचे दिसत नाही. मतदार राजा मात्र या सर्व घडामोडींवर मोठ्या हुशारीने लक्ष ठेऊन ८ डिसेंबरची वाट पहात आहे.
साभार:- देशोन्नती 

Friday, 18 November 2011

घाटंजीत १४ हजार २५८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नगर परिषदेच्या ८ डिसेंबरला होणा-या निवडणुकीत यावेळी घाटंजीत मतदारांच्या संख्येत वाढ झाली असुन १४ हजार २५८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. चार प्रभागातुन १७ नगरसेवकांची निवड होणार आहे. प्रभाग पद्धतीमुळे उमेदवारांना चौपट श्रम करावे लागणार आहे. प्रभाग क्र.१ मध्ये ३ हजार ६५१ मतदार असुन १ हजार ८६२ पुरूष मतदार तर १ हजार ७८९ महिला मतदार आहेत.
सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्र.२ मध्ये एकुण ४ हजार ४३ मतदार आहेत. यात २ हजार ९८ पुरूष तर १ हजार ९४५ महिला आहेत. प्रभाग क्र. ३ मध्ये ३ हजार २९७ मतदार संख्या असुन १ हजार ७०७ पुरूष व १ हजार ५९० महिला मतदार आहेत. प्रभाग क्र. ४ मध्ये एकुण ३ हजार २६७ मतदार आहेत यामध्ये १ हजार ६९९ पुरूष असुन १ हजार ५६८ महिला मतदार आहेत.
यावर्षी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले असले तरी मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ असल्याची बाब आता निदर्शनास येत आहे. काही मतदारांची दोन एका पेक्षा अधिक वेळा नोंद असुन अनेकांचे घर क्रमांक चुकीचे टाकण्यात आले आहेत. प्रत्येक मतदाराचे छायाचित्र मतदार यादीत असावे यासाठी घरोघरी जाऊन छायाचित्र गोळा करण्यात आले होते. तरी देखिल बहुतांश मतदारांची छायाचित्रे झळकलीच नाहीत. शिवाय काही मतदारांची छायाचित्रे चुकीची लागल्याने मतदानाच्या वेळी त्यांना चांगलाच मनस्ताप होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीमुळे मतदार मतदानापासुन वंचित राहु नये यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.

Thursday, 10 November 2011

घाटंजी नगर परिषद ‘सक्षम’ नेतृत्वाच्या प्रतिक्षेत


राजकीय पक्षांना उमेदवारांची टंचाई
येत्या ८ डिसेंबरला होणा-या नगर परिषदेच्या निवडणुकीतून यावेळी तरी घाटंजी शहराला सक्षम नेतृत्व लाभणार का याची उत्सुकता प्रत्येक घाटंजीकराला लागली आहे. मागील निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने सत्ताधा-यांची गुर्मी उतरविल्यानंतर नव्या नेतृत्वाकडून मतदारांना चांगल्या कामांची अपेक्षा होती. मात्र खुर्चीवर बसताच नवख्या नगरसेवकांचा तोरा बदलला. निवडणुकित दिलेल्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला. अन त्यानंतर निगरगट्ट कारभाराच्या एका नव्याच पर्वाची सुरूवात झाली. अडीच वर्ष भाजप-रा.कॉ.च्या अभद्र युतीकडे नगराध्यक्ष पद होते. त्यांच्या मनमानी कारभारानंतर आरक्षणामुळे शिवसेनेकडे आयतीच सत्ता आली. बहुमत नसतानांही मिळालेल्या नगराध्यक्षपदाचा शक्य तितका फायदा सेनेने घेतला. अडीच वर्ष प्रशासनाला बोटावर नाचवुन ‘हम करे सो कायदा’ याच तत्वाने त्यांचे काम चालले.
या निवडणुकीत प्रभाग पद्धत आल्यामुळे राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची कसोटीच लागणार आहे. एकुण १७ वार्ड पाच प्रभागात विभागल्या गेल्याने निवडणुक प्रचारात उमेदवारांची दमछाक होणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची केंद्र व राज्यात आघाडी असली तरी नगर परिषद निवडणुकीत मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहे. घाटंजी तालुक्यात निवडणुकीपुर्वी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांच्या सोबत एक मोठा गट रा.कॉ.मध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याने या दोन मुख्य पक्षामधील दरी आणखीच वाढली आहे. घाटंजीत मुख्य लढत या दोन पक्षांमध्येच होणार असा प्राथमिक अंदाज आहे. महिलांना मिळालेले पन्नास टक्के आरक्षण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती यामुळे राजकीय पक्षांना योग्य उमेदवारांची टंचाई भासत आहे.
तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी मात्र अनेक उमेदवार आपली दावेदारी सांगत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे दिर्घ प्रतिक्षेनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने बहुतांश उमेदवार नगराध्यक्षपदाकडे नजर ठेऊनच निवडणुकीचा विचार करीत आहे.


जात पडताळणीसाठी १५ नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवा
तहसिलदार संतोष शिंदे यांचे आवाहन
जानेवारी  ते मार्च महिन्यात होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना जात पडताळणीचे प्रस्ताव १५ नोव्हेंबर पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करावे लागणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विषेश सहाय्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरीता राखीव प्रभागातुन निवडणुक लढविणा-या ईच्छुक उमेदवारांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तहसिल कार्यालयात सादर करावे असे आवाहन घाटंजीचे तहसिलदार संतोष शिंदे यांनी केले आहे.

साभार:- देशोन्नती

Monday, 7 November 2011

घाटंजीतील पक्षांतराच्या पार्श्‍वभूमीने निवडणुकीची उत्सुकता शिगेला

नगरपरिषद निवडणुकीची चाहुल लागताच शहरात पक्षांतराच्या फैरी सुरू झाल्या. ही पार्श्‍वभूमी निवडणुकीपूर्वी तयार झाल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशा स्थितीत उमेदवार शोधताना नेत्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.
नगरपरिषदेत १७ सदस्यांसाठी निवडणूक होत असून अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने अध्यक्षपदावर दावेदारी करणार्‍यांमध्ये घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सध्या पालिकेत काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादी सहा, भाजप सहा व शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची युती होऊन अडीच वर्ष भाजपने वर्चस्व गाजविले. नंतरचे अडीच वर्ष राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असेल असे युतीत ठरले होते. परंतु अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले आणि शिवसेनेच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील वच्छलाबाई धुर्वे यांना संधी मिळाली. भाजपा व राकाँ युती केवळ आकड्यांपुरतीच र्मयादित राहिली. सदस्यांचे मनोमिलन न झाल्यामुळे या काळात विकासाला प्रचंड खिळ बसला. यापूर्वी घाटंजी पालिका ही काँग्रेस आणि उदयास आलेल्या विविध आघाड्यांच्या ताब्यात होती. परंतु मागच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली. तसेच राष्ट्रवादीनेही संख्याबळ वाढवून दिले. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. ना. शिवाजीराव मोघे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश लोणकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्यामुळे वेळेवर तयार होणार्‍या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या संगीता भुरे व भाजपच्या माजी नगराध्यक्ष शांताबाई खांडरे यांचाही राष्ट्रवादी प्रवेश होणार अशी चिन्हे दिसू लागली आहे. नव्या समीकरणात तालुक्यातील दोन दिग्गज नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर व सुरेश लोणकर एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसची कमान जगदीश पंजाबी व सुभाष गोडे तर राष्ट्रवादीमधून जितेंद्र ठाकरे, अरविंद भुरे यांच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्य शैलेश ठाकूर यांनी उचलला आहे. तसेच भाजपची धुरा राजू सुचक, मधुसुदन चोपडे सांभाळीत आहेत. काही दिवसांपूर्वी घाटंजी येथे भाजपा खासदार हंसराज अहीर यांनी पालिका निवडणूक भाजप-सेना युती लढवेल असे सांगितले. त्यासंदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर व आमदार दिवाकर रावते यांच्या बैठकी झाल्या. सध्या राष्ट्रवादीतून श्याम बेलोरकर, शांताबाई खांडरे, भाजपमधून दुर्गा साखरकर, काँग्रेसमधून माया मंगाम, सुभाष गोडे व जगदीश पंजाबी, अर्चना गोडे, मधुकर पेटेवार, दादा चिव्हाणे, चंदू तुराळे, शिवसेनेतून वच्छलाबाई धुर्वे आदी माजी नगराध्यक्ष उतरणार असल्याचे दिसून येते. तसेच काँग्रेसतर्फे किशोर दावडा, परेश कारिया, संदीप बिबेकार, शोभा ठाकरे, मो. मोफीन, नंदू धनरे, राष्ट्रवादीकडून संगीता भुरे, प्रकाश भोरे, महेश गुप्ता, बेबी तलमले, चंद्रकांत ढवळे, अजय पालतेवार, राम खांडरे, ओम बाजपेयी, विठ्ठल बिजेवार, ताई भोंग, ताई धांदे, अकबर तंवर, ताई खोब्रागडे, ताई परतेकी, शर्मीला उदार, सिंधु सिरपुरे, ताई ठाकरे, आनंद मडावी, संतोष गेडाम, सेनेकडून शैलेश ठाकूर, सरोज पडलवार, संदीप बुल्ले, स्वरूप नव्हाते, ताई रामटेके, ताई कोडापे, सैयद फिरोज, ताई गिनगोले, संतोष शेंदरे, दिनेश उईके यांची नावे चर्चेत आहेत. असे असले तरी अनेक प्रभागांमध्ये राजकीय नेत्यांना अपेक्षित उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे शोध मोहीम जोमाने सुरू असल्याचे पहावयास मिळते.
विठ्ठल कांबळे 
साभार:- दै.लोकमत