Pages

Showing posts with label भाजप. Show all posts
Showing posts with label भाजप. Show all posts

Tuesday, 14 January 2014

जातीधर्मापेक्षा देश महत्वाचा - रामदास आठवले

आवाहन : देशहितासाठी महायुतीला सत्ता द्या !
कोणत्याही जातीधर्मापेक्षा देश महत्वाचा असतो. कॉंग्रेसने गेल्या सहा दशकात देशाचे वाटोळे केले आहे. दीन दलित, शेतकरी व शोषीतांच्या नावावर सत्ता उपभोगुन त्यांचेसाठी काहीही केले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिपाई-भाजप-शिवसेना व स्वाभिमानी संघटनेच्या महायुतीला सत्ता द्या असे आवाहन रिपाईचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी केले. घाटंजी येथे आयोजीत महायुतीच्या मेळाव्यात ते उद्घाटक म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हंसराज अहिर होते. रिपाई (आ)चे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे, रिपाईचे सुधाकर तायडे, मोहन भोयर, बाबासाहेब गाडे, सेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर, विजय कोटेचा, उद्धव येरमे यांचेसह भाजप, रिपाई व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आठवले यांनी आपल्या खसखस पिकविणा-या भाषणातून कॉंग्रेसप्रणीत वेंâद्र व राज्य सरकारचा खरपुस समाचार घेतला. भगवा आणी निळा एकत्र आल्याने कॉंग्रेसच्या पोटात गोळा आल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाला केवळ विशिष्ट समाजापुरता मर्यादीत न ठेवता सर्वांपर्यंत नेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकत्र्यांना केले. काहीही झाले तरी हातातला निळा झेंडा व जयभिमचा विचार सोडणार नाही. कॉंग्रेसने दलितांना केवळ सत्तेसाठी वापरले. सन्मान दिला नाही. त्यामुळेच भाजप सेनेशी सन्मानाची महायुती केल्याचे त्यांनी सांगितले. सिंचनासाठी पाणी अडविण्यापेक्षा आघाडी सरकारने पैसा अडवा पैसा जिरवा हाच उपक्रम राबविल्याची टिका त्यांनी केली. 
खासदार हंसराज अहिर यांनी अध्यक्षीय भाषणातून कॉंग्रेसच्या धोरणांचा समाचार घेतला. आघाडी सरकारवर लोकांचा विश्वास नाही, कॉंग्रेसने लोकांना कधीच आपलं मानलं नाही. केवळ महात्मा गांधीच्या नावाने मतांची लुट केली. हि लुट थांबविण्यासाठीच महायुती अस्तित्वात आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. राज्याला विमानतळांपेक्षा धरणांची जास्त गरज आहे. विदर्भापेक्षा लहान असलेल्या पंजाब हरियाणामध्ये ९६ टक्के सिंचन होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यात सिंचन परिषदेत येऊन पर्यटनासाठी १० कोटींचा निधी जाहिर करतात. शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर सोयाबिन पेâकतो तरी या सरकारला शेतक-यांचे दु:ख कळत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आधी कोळसा घोटाळा झालाच नसल्याचा कांगावा करणा-या सरकारने अखेर सर्वोच्च न्यायालयात गैरव्यवहाराची कबुली दिल्याने पंतप्रधानांसह या विरोधात बोलणा-या मंत्र्यांचा खोटारडेपणा जनतेपुढे आल्याचे ते म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून आघाडी सरकारच्या धोरणांवर टिका करून महायुतीला सत्तेत आणण्याचे आवाहन केले. दरम्यान, रामदास आठवले यांची व्यासपीठावर लाडूतुला करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे यांनी केले. संचालन सुरेश जाधव तर आभार प्रदर्शन संतोष जिवने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे जेष्ठ नेते मधुसूदन चोपडे, तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर, शहराध्यक्ष विष्णु नामपेल्लीवार, सरचिटणीस देवानंद काळे, गिरीधर राठोड, तालुका कोषाध्यक्ष राजु सुचक, भाजयुमो तालुकाध्यक्ष गुड्डू शुक्ला, यांचेसह रिपाई (आ), भाजपा, शिवसेना व स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.
साभार : सकाळ 

Wednesday, 12 December 2012

गुप्तधन व नरबळी प्रकरणी हयगय करणा-यांची ‘वाट’ लावू - निता केळकर

पोलीस तपासाबाबत व्यक्त केले आश्चर्य

गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न व सपना पळसकर या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणी तपासात हयगय करणा-या पोलीस अधिका-यांची वाट लावू अशा संतप्त शब्दात भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निता केळकर यांनी तपासाबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणात कार्यवाहीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चोरांबा येथे पळसकर कुटूंबीयांना दिलेल्या भेटीच्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हे प्रकरण अतिशय गंभिर असुन पोलीसांनी अद्याप या प्रकरणी केलेला तपास प्रथमदर्शनी संशयास्पद दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या नकारात्मक भुमिकेबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा सर्व प्रकार गृहमंत्र्यांच्या कानावर घालणार असुन भाजपाच्यावतीने अधिवेशनात हा मुद्दा उचलण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेच्या तपासात जाणीवपुर्वक विलंब करणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पळसकर यांचे घरी जाऊन त्यांची विचारपुस केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांचेसोबत भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस उमा खापरे, माधवी नाईक, देवयानी फरोडे, वनीता कानडे, शैला सामंत, मंजु वैष्णव, शिल्पा गणपते, शैला साळवी, रेखा कोठेकर यांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 2 February 2012

पारवा जि.प.गटात कॉंग्रेस भाजपा मध्ये खरी लढत


गेल्या महिन्याभरापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता ख-या अर्थाने औपचारीक प्रचाराला सुरूवात झाली आहे. विवीध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी नुकतीच नारळ फोडून प्रचाराची सुरूवात केली. पारवा जिल्हा परिषद गटात सध्या कॉंग्रेस व भाजप या दोन पक्षांमध्ये लढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी मात्र प्रचारात कमी पडत असल्याचे दिसत आहे. या गटात एकुण पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये कॉंग्रेसकडून आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर, भाजपाकडून रमेश यमसनवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस सुहास पारवेकर, सेनेचे शे.आसिफ शे.चांद व अपक्ष उमेदवार अविनाश ठाकरे यांचा समावेश आहे. देशमुख - पारवेकर घराण्यातील दोन उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र सुहास पारवेकर यांची राजकारणातील ही पहिलीच ईनिंग असल्याने त्यांना जेष्ठ नेत्यांच्या भरवशावरच अवलंबुन राहावे लागत आहे. योगेश पारवेकरांना आमदार निलेश पारवेकरांचे भक्कम पाठबळ आहे. मागील निवडणुकीत बंडखोर अपक्ष उमेदवार स्वामी काटपेल्लीवार यांना सहकार्य करणारे ना.मोघे हे सुद्धा यावेळी योगेश पारवेकरांच्या बाजुने आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा गड मजबुत आहे. मात्र दोन पारवेकरांच्या लढाईत भाजपाचे रमेश यमसनवार हे सुद्धा तगडे आव्हान देत आहेत. यमसनवार हे एकेकाळी ना.मोघेंचे खंदे समर्थक होते. कॉंग्रेस व मोघे समर्थीत उमेदवाराच्या प्रचाराची धुरा त्यांच्याच खांद्यावर राहात होती. यावेळी उमेदवारी मिळणार अशी आशा त्यांना होती मात्र तसे न झाल्याने त्यांनी भाजपाच्या उमेदवारीवर निवडणुक रिंगणात उडी घेतली. पारवेकरांच्या गडात भाजपाची अनपेक्षीत हवा निर्माण झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.  या गटात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातच लढ़त होणार अशी शक्यता पुर्वी वर्तविण्यात येत होती. मात्र आता ही लढत कॉंग्रेस-भाजप अशी झाली आहे. भाजपासोबत असलेला हा ‘माहौल’ मतदानात परिवर्तीत होणार का ?  याबाबत तर्कवितर्क केल्या जात आहेत. 
प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असुन प्रचार कार्यात फिरणा-यांची बडदास्त ठेवून त्यांची ‘सोय’ लावतांना उमेदवारांच्या नाकी नऊ येत आहे. 
साभार :- देशोन्नती

Tuesday, 31 January 2012

कॉंग्रेस राष्ट्रवादीला घराणेशाहीचीच परंपरा-भाजप

रमेश यमसनवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ








कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना घराणेशाहीची परंपरा असुन सर्वसामान्यांचा त्या पक्षात विचार केला जात नाही असे एकमुखी वक्तव्य भाजपाच्या नेत्यांनी पारवा येथे केले. पारवा गटातील भाजपाचे उमेदवार रमेश यमसनवार यांचेसह पारवा गणाच्या अरूणा महल्ले व कुर्ली गणाचे गजानन गाऊत्रे या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ येथिल गणपती मंदिरात फोडण्यात आला. 
यावेळी माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा, उद्धव येरमे, मुकुंद कदम, अशोक यमसनवार, वासुदेव महल्ले, दत्ता कोंडेकर, देवानंद काळे, संजय सवळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हजारो कार्यकर्त्यांसह प्रचाराला सुरूवात करण्यात आली. जनसामान्यांमध्ये वावरणारे रमेश यमसनवार यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस रा.काँ.ला त्याची मळमळ सुटली असुन हा मालकशाही विरोधातील संघर्ष असल्याची प्रतिक्रीया भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केली. शेतक-यांशी निगडीत व्यवसाय असल्याने शेतकरीवर्गात यमसनवार यांचेविषयी आदर आहे. आजवर शेतक-यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमूळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयात यमसनवार यांची महत्वाची भुमिका होती. यावेळी त्यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे कॉंग्रेस व रा.कॉ. ला चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहे.

Monday, 5 December 2011

घाटंजीत सेना भाजपाचा महायुतीचा "देखावा"

राजकीय पक्ष, नेते व कार्यकर्ते स्वार्थासाठी काहीही करू शकतात हे गेल्या काही काळातील घडामोडींनी जनतेसमोर आलेच आहे. सत्ता काबीज करण्यासाठी प्रसंगी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास राजकारणी मागे पाहत नाहीत. निवडणुकीत ज्यांचेवर तोंडसुख घेतले त्यांचेसोबत सत्तेत भागीदारी करावयाची असल्यास त्याच तोंडाने त्यांचे गोडवेही गाण्यास नेतेमंडळी तयार असतात. हे सर्वकाही फक्त सत्तेसाठी..!
अगदी केंद्र सरकार पासुन ग्रामपंचायत स्तरापर्यंत हीच परिस्थिती आहे. घाटंजी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ही गोष्ट प्रकर्षाने पुढे येत आहे. गेली पाच वर्षे नगर परिषदेच्या राजकारणात शिवसेना व भाजप हे दोन पक्ष एकमेकांविरोधात होते. भाजपाने राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत युती करून सत्ता मिळविली. त्यानंतरच्या अडीच वर्षात शिवसेनेकडे नगराध्यक्षपदाच्या रूपाने आयतीच सत्ता आली. त्याचा त्यांनी चांगलाच ‘वापर’ करून घेतला. त्यावेळी भाजप विरोधी बाकावर होता. यावर्षी निवडणुकीपुर्वी सेना भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र अखेरच्या काळात वरिष्ठांच्या दबावामुळे हे दोन्ही पक्ष युतीच्या बंधनात बांधल्या गेले. शिवसेनेच्या स्थानिक राजकीय धेंडामुळे भाजपामधील एक गट युती करण्यास मुळीच तयार नसल्याने प्रभाग क्र.२ मध्ये शिवसेना व भाजपाचे उमेदवार मैत्रीपुर्ण लढतीच्या गोंडस नावाखाली एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. घाटंजीसह जिल्ह्यात काही ठिकाणी हिच परिस्थिती आहे. युती असलेल्या दोन पक्षांचे उमेदवार एकाच नगर परिषद क्षेत्रात एकमेकांविरोधात असतांना या युतीला महायुती कसे काय म्हणता येईल असा प्रश्न मतदारांना पडला आहे. शिवसेना आपल्या अडीच वर्षातील कमाईचा चांगलाच वापर निवडणुक प्रचारात करीत आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टी व रिपाई (आठवले) या पक्षांची महायुती असल्याने आम्हालाच विजयी करा असे आवाहन प्रचारादरम्यान केल्या जात आहे. मात्र या कथित महायुती मधील पोकळीमुळे मतदार संभ्रमात पडला आहे. दैवयोगाने या अर्धयुतीला चुकून  बहुमत मिळालेच तर एकमेकांवर कुरघोडी करण्यात पाच वर्षे घालवुन घाटंजी शहराला अव्यवस्थेच्या गर्तेत लोटणारे खरंच सत्तेच्या भागीदारीत गुण्यागोविंदाने राहु शकतील का असा प्रश्न मतदारांना पडला आहे. मात्र स्वत:च्याच तोंडाने स्वत:ची खोटी स्तुती करण्यात धन्यता मानणारे सेनेचे स्थानिक नेते महायुतीचे तुणतुणे वाजवित आहेत.
साभार:- देशोन्नती

Sunday, 20 November 2011

काय करावे कळेना, कुणाचेच कुणाशी जुळेना


सेनेच्या कुटीलतेमुळे भाजप अडचणीत
राष्ट्रवादीला पोखरतोय ‘उंदीर’
कॉंग्रेसमध्ये एकछत्री कारभार
केवळ व्यक्तीगत स्वार्थावर केंद्रित झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असुनही राजकीय पक्षांची रणनिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस  या पक्षांमध्ये होणार असे चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी प्रथमच निवडणुक रिंगणात उतरणार अशी चर्चा असली तरी त्या दृष्टीने तयारी दिसत नाही. शिवसेनेचा स्थानिक नेता कुटील नितीचा अवलंब करून आपले लयास जात गेलेले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे. कॉंग्रेस मध्ये असलेला एक मोठा गट नुकताच राष्ट्रवादी मध्ये आल्याने पक्ष सशक्त झाला आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणुन प्रोजेक्ट करण्याचा पक्षाचा मानस असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रवादीला होऊ शकतो. मात्र बेलोरकरांच्या वर्चस्वाला तिरप्या नजरेने पाहणारा एक गट राष्ट्रवादीत आहे. या गटाला नगराध्यक्षपद आपल्याच खिशात असावे अशी तिव्र ईच्छा आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नियोजनाची सुत्रे याच गटाकडे आहेत. मात्र नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जाणा-या श्याम बेलोरकरांना निर्णय प्रक्रीयेमध्ये फारसे महत्व दिल्या जात नसल्याने राष्ट्रवादी मध्ये दोन गटात कुरबुर सुरू आहे. केवळ जातीच्या राजकारणाचा आधार घेऊन ईकडे तिकडे उड्या मारणारा एक ‘उंदीर’ राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये पोकळी निर्माण करीत आहे. यापुर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नगरसेविकेला नगराध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हेतुने हे सगळे कारस्थान सुरू आहे. याच उठाठेवीचा एक भाग म्हणुन राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवाराला प्रभाग एक मधुन हटवुन शिवसेनेच्या उमेदवारासाठी मैदान मोकळे करण्याचाही घाट रचला जात आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सकारात्मकतेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कॉंग्रेसमध्ये अगदी याऊलट चित्र आहे. नगर परिषदेसाठी निर्णय घेण्याचे सर्वाधीकार माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना आहेत. अन्य कोणाचीही लुडबूड ऐकल्या जाणार नाही असा अलिखित करारच झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकछत्री असला तरी त्याचा फायदाच कॉंग्रेसला होणार आहे.
भाजप व शिवसेनेची युती व्हावी असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी शिवसेनेने कुटील डाव खेळुन सर्व महत्वाच्या जागा आपल्याकडे ठेवुन घेतल्या. दबावात येऊन सेनेशी सलगी करणारा भाजप मधला एक गट सोडला तर उर्वरीत भाजप कार्यकत्र्यांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे झुकण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुक लढविणे श्रेयस्कर असल्याची अनेक कार्यकत्र्यांची भावना आहे. एकंदरीतच युती झाली तरी मनोमिलन मात्र होणार नाही हेच वर्तमान परिस्थितीवरून दिसते.
गेली पाच वर्षे एकमेकांचे पाय ओढुन घाटंजी शहराला एखाद्या खेड्यापेक्षाही दयनिय केलेल्या नगर परिषदेच्या महाभागांमध्ये निवडणुक काळातही समन्वय असल्याचे दिसत नाही. मतदार राजा मात्र या सर्व घडामोडींवर मोठ्या हुशारीने लक्ष ठेऊन ८ डिसेंबरची वाट पहात आहे.
साभार:- देशोन्नती