राजकीय पक्ष, नेते व कार्यकर्ते स्वार्थासाठी काहीही करू शकतात हे गेल्या काही काळातील घडामोडींनी जनतेसमोर आलेच आहे. सत्ता काबीज करण्यासाठी प्रसंगी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास राजकारणी मागे पाहत नाहीत. निवडणुकीत ज्यांचेवर तोंडसुख घेतले त्यांचेसोबत सत्तेत भागीदारी करावयाची असल्यास त्याच तोंडाने त्यांचे गोडवेही गाण्यास नेतेमंडळी तयार असतात. हे सर्वकाही फक्त सत्तेसाठी..!
अगदी केंद्र सरकार पासुन ग्रामपंचायत स्तरापर्यंत हीच परिस्थिती आहे. घाटंजी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ही गोष्ट प्रकर्षाने पुढे येत आहे. गेली पाच वर्षे नगर परिषदेच्या राजकारणात शिवसेना व भाजप हे दोन पक्ष एकमेकांविरोधात होते. भाजपाने राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत युती करून सत्ता मिळविली. त्यानंतरच्या अडीच वर्षात शिवसेनेकडे नगराध्यक्षपदाच्या रूपाने आयतीच सत्ता आली. त्याचा त्यांनी चांगलाच ‘वापर’ करून घेतला. त्यावेळी भाजप विरोधी बाकावर होता. यावर्षी निवडणुकीपुर्वी सेना भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र अखेरच्या काळात वरिष्ठांच्या दबावामुळे हे दोन्ही पक्ष युतीच्या बंधनात बांधल्या गेले. शिवसेनेच्या स्थानिक राजकीय धेंडामुळे भाजपामधील एक गट युती करण्यास मुळीच तयार नसल्याने प्रभाग क्र.२ मध्ये शिवसेना व भाजपाचे उमेदवार मैत्रीपुर्ण लढतीच्या गोंडस नावाखाली एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. घाटंजीसह जिल्ह्यात काही ठिकाणी हिच परिस्थिती आहे. युती असलेल्या दोन पक्षांचे उमेदवार एकाच नगर परिषद क्षेत्रात एकमेकांविरोधात असतांना या युतीला महायुती कसे काय म्हणता येईल असा प्रश्न मतदारांना पडला आहे. शिवसेना आपल्या अडीच वर्षातील कमाईचा चांगलाच वापर निवडणुक प्रचारात करीत आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टी व रिपाई (आठवले) या पक्षांची महायुती असल्याने आम्हालाच विजयी करा असे आवाहन प्रचारादरम्यान केल्या जात आहे. मात्र या कथित महायुती मधील पोकळीमुळे मतदार संभ्रमात पडला आहे. दैवयोगाने या अर्धयुतीला चुकून बहुमत मिळालेच तर एकमेकांवर कुरघोडी करण्यात पाच वर्षे घालवुन घाटंजी शहराला अव्यवस्थेच्या गर्तेत लोटणारे खरंच सत्तेच्या भागीदारीत गुण्यागोविंदाने राहु शकतील का असा प्रश्न मतदारांना पडला आहे. मात्र स्वत:च्याच तोंडाने स्वत:ची खोटी स्तुती करण्यात धन्यता मानणारे सेनेचे स्थानिक नेते महायुतीचे तुणतुणे वाजवित आहेत.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment