आजच्या काळात जगणे देखील शर्यती प्रमाणेच झाले आहे. कुणी यशाच्या मैलाचे दगड पार करीत उंचीवर जाऊन पोहचतात तर कुणाला वाटेतील खाचखळग्यांमुळे मागे रहावे लागते. विजयी झालेल्यांचे गुणगाण केल्या जाते. मात्र काळाच्या ओघात काही कारणांनी मागे पडलेल्यांची दखल मात्र कुणी घेत नाही हीच आपल्या समाजाची शोकांतीका आहे. अनेकांच्या आयुष्याला वेग देता देता नशिबाने केलेल्या चेष्टेमुळे ईतरांपेक्षा मागे पडलेला राजन भुरे आजही आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. घाटंजी पासुन अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिरोली येथिल राजन ओळखला जायचा त्याच्या वेगासाठी. धावणे हा त्याच्या जगण्याचा आधार. शालेय जिवनापासुनच हा छंद त्याच्या अंगवळणी पडला. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगीरी करून कित्येक धावपटुंना राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकविणारा हा यशस्वी धावपटु व प्रशिक्षक आज दुर्लक्षीत आहे. दहावीत असताना नेर येथे झालेल्या २१ कि.मी. मराथॉन स्पर्धेत पहिल्यांदा त्याने सहभाग घेतला. त्यानंतर राजनने कधीच मागे वळुन पाहिले नाही. तब्बल १२ राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगीरी केली. तर एका स्पर्धेत सुवर्ण व दोन स्पर्धांमध्ये रजत पदक मिळविले. कित्येकदा आर्थिक अडचणीमुळे राष्ट्रीय स्पर्धांपासुन त्याला मुकावे लागले. राजन याचे जन्मगाव शिरोली. घरची परिस्थिती बेताचीच. प्राथमिक शिक्षण येथे घेऊन पुढील शिक्षणासाठी त्याने नेर तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय वटफळी येथे प्रवेश घेतला.
पाथ्रड (गोळे) येथुन दररोज शाळेत येण्यासाठी तो सकाळी धावतच सुटायचा. हाच सराव अंगात भिनल्याने शालेय स्पर्धांमध्ये कोणीही त्याच्या पुढे जात नव्हता. शिक्षणात त्याचे मन फार रमले नाही. बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर तो शिरोलीत परतला. येथे धावण्याचा सराव हाच त्याचा दिनक्रम. घाटंजीला यायचे असेल व एस.टी.बस हुकली तर राजन त्याच बसचा पाठलाग करून घाटंजी पर्यंत यायचा. बस सोबतच्या शर्यतीमुळे घाटंजी तालुक्यात सर्वत्र तो ओळखला जाऊ लागला. या दरम्यान शिरोलीसह तालुक्यातील अनेक खेळाडू राजनशी जुळले. आपल्या अनुभवातून आत्मसात केलेल्या गोष्टी त्याने ईतर धावपटूंना शिकवुन स्पर्धेसाठी तयार केले. तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंना मोफत कोचिंग दिली. शुभांगी चौधरी, सरीता राऊत, बंडू आत्राम, राजु मेश्राम यांनी राष्ट्रीय तर गिता मिलमिले, ममता चावके, श्वेता चावके, अमर झाडे, प्रदीप तुमराम, विमल कोरवते, सतिश भुरे, जया काकडे, प्रफुल्ल भुरे, आसावरी बोबडे, माया भुरे, रीया बोबडे, किरण भुरे, मयुर बोबडे, राखी भुरे, राखी भुरे, सचिन मिलमिले, सचिन घोसे, अजय भुरे, सोनु मेश्राम, स्वप्निल चौधरी, उमेश मडावी, रूपेश शिरपुरे, कुणाल जिवने आकाश लोखंडे या धावपटूंनी राज्यस्तरावर मजल मारली.
२००६ मध्ये नियतीच्या प्रहाराने त्याच्या आयुष्यातील वेगच हरवुन गेला. प्रत्येक क्षणाला त्याची सोबत करणारी जीवनसंगिनी फुप्फुसाच्या कर्करोगामुळे त्याला सोडून गेली. वाढदिवसाच्या दिवशी नियतीने केलेल्या या क्रूर चेष्टेमुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला. यामुळे वा-याशी स्पर्धा करणारा राजन भरकटला. काही वर्ष निराशेच्या गर्तेत गेल्यावर आता तो सावरतोय..........
(उर्वरीत भाग वाचा उद्या)
(उर्वरीत भाग वाचा उद्या)
अमोल राऊत
9423640885
साभार:- देशोन्नती
राजन भुरे
भ्रमणध्वनी :- 9527705628
No comments:
Post a Comment