संशोधनातील निष्कर्ष देणार युनो व मानवाधिकार आयोगाकडे
शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.प्रदीप रामकृष्ण राऊत यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतेच आचार्य पदवीने सन्मानीत केले आहे. मराठी विषयाकरिता प्रदान करण्यात आलेल्या त्यांच्या पदवी प्रबंधनाचा विषय ‘साठोत्तर मराठी कादंबरीतील ठळक व्यक्तीरेखांच्या मनोवृत्ती व भुमिकांचा चिकित्सक अभ्यास' हा आहे. १ हजार ७७३ पानांचा हा द्विखंडातील संशोधन प्रबंध महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रबंध ठरला आहे हे विषेश. यासाठी त्यांना कला वाणिज्य महाविद्यालय यवतमाळचे प्राचार्य डॉ.रा.गो.चवरे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्रातील सामाजीक वास्तवाचे भीषण रूप दर्शविणा-या सामाजीक, दलित, ग्रामीण, प्रादेशीक, राजकीय व मार्क्सवादी अशा ७५ कादंब-या व १५० संदर्भ ग्रंथांच्या चिकित्सक अभ्यासाने सुमारे साडेपाच वर्षानंतर हा प्रबंध पुर्णत्वाकडे गेला. सदर प्रबंधात २५० पेक्षा अधिक निष्कर्ष काढले असुन पुस्तिकेच्या स्वरूपात ते महाराष्ट्र शासन, नियोजन आयोग, स्वयंसेवी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठविण्याचा आपला मानस प्रा.राऊत यांनी व्यक्त केला. प्रा.राऊत यांचे याच विषयानुषंगाने आजवर ४ रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले असुन गॅट व डंकेल कराराची अंमलबजावणी व त्याच्या भयावह परिणामानंतर मराठी कादंबरीच्या माध्यमातुन मांडण्यात आलेले त्याचे भिषण परिणाम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी नुकताच त्यांनी 'जागतिकीकरणाने प्रभावित मराठी कादंबरीतील पात्रमुखी विचारधारा' या विषयावरील मेजर रिसर्च प्रोजेक्ट विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ६ लाख रूपयांच्या संशोधन अनुदानाकरीता पाठविला आहे. या संशोधनामुळे राज्याच्या हितासाठी विद्यापीठामार्फत संयुक्त राष्ट्रसंघ व जागतीक बँकेकडे अनेक शिफारसी करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा.राऊत यांचे ‘गर्भार लोकशाही’ व ‘स्वातंत्र्याच्या शोधात’ हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांच्या या संशोधनातील यशासाठी संस्थेचे अध्यक्ष सदरूद्दीन गिलानी, उपाध्यक्ष संजय गढीया, सचिव अनिरूद्ध लोणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहजाद, माजी प्राचार्य के.एम.वाघ यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कर्मचा-यांनी कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment