नगर परिषद निवडणुकीत संमिश्र निकाल लागल्याने घाटंजीत त्रिशंकु सत्ता स्थापीत होणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचीच पुनरावृत्ती होते की काय अशी भीती घाटंजीकरांमध्ये आहे. केवळ एका विजया अभावी बहुमता पासुन वंचीत राहिलेल्या कॉंग्रेसकडे आठ नगरसेवक आहे. मागील निवडणुकीपेक्षा कांग्रेसने सहा जागांची आघाडी मिळविली आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला अंतर्गत कुरघोडींमुळे केवळ पाच जागांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेला एका जागेची बढत मिळाली असली तरी प्रमुख उमेदवारालाच घाटंजीकरांनी पराभवाची चपराक लगावल्याने चार जागांवरील विजय सेनेच्या जिव्हारी लागला आहे. आजवरच्या नगरपरिषदेतील ढिसाळ कारभारामुळे नागरिक संतप्त आहेत. कुणीही सत्तेत आले तरी सारखेच अशी भावना निर्माण झाली आहे. घाटंजीकरांमध्ये आलेली ही निराशा दुर करायची असल्यास नव्या दमाच्या नगरसेवकांवर न.प.ची धुरा देण्याची गरज व्यक्त होत आहे. मतदारांनीही काही प्रभागात प्रस्थापीतांना नाकारून नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे. यापासुन धडा घेत नेत्यांनीही नगर परिषदेची सत्ता तरूणाईच्या हातात देणे ही शहर विकासासाठी आवश्यक बाब समजल्या जात आहे. गेली काही वर्षे नगराध्यक्षपदी महिला विराजमान होत्या. त्यामुळे त्यांच्या पदाचे सर्व अधिकार नवरोबांच्याच हातात होते. तसेच अनुभवी नगरसेवकांनीही नगराध्यक्षाच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन नगराध्यक्षपदावर सत्ता गाजविली. या विचित्रपणाला जनता कंटाळली असुन निर्णयक्षमता असलेल्या व्यक्तीकडेच पदे असावीत असा मतप्रवाह निर्माण होत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस मधुन संदिप बिबेकार, परेश कारिया, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राम खांडरे व सेनेचे संतोष शेंद्रे या नव्या पिढीला जनतेने निवडुन दिले आहे. यांना पुढे करून जेष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शनाचे कर्तव्य बजावल्यास तो ख-या अर्थाने जनादेशाचा सन्मान होईल. घाटंजी तालुक्यात आजवर नविन नेतृत्व पुढे आल्याचे दिसले नाही. ज्यांना योगायोगाने पदे मिळाली त्यांच्या पदाचा प्रभाव नेत्यांच्या वलयामुळे दिसला नाही. तर कधी नेत्यांनी पद देऊन अधिकार स्वत:कडेच ठेवल्याने नवख्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाली नाही हे घाटंजी तालुक्याचे दुर्दैव आहे. त्यामुळे किमान आता तरी जेष्ठ नेत्यांनी नव्या नगरसेवकांच्या उत्साहाचा वापर शहर विकासासाठी करावा. केवळ नाममात्र पद न सोपवता त्या पदाचे अधिकार सुद्धा खुल्या दिलाने प्रदान करावे अशी घाटंजीकरांची व नव्या पिढीची भावना आहे. नेते जनतेच्या या भावनेचा किती आदर ठेवतात हे लवकरच पुढे येणार आहे.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment