Pages

Friday 2 December 2011

राष्ट्रीय सुवर्णपदक पटकाविणारा राजू अजूनही झोपडीच्या अंधारातच


सायकलिंग स्पर्धेत दोनवेळा राष्ट्रीय सुवर्णपदक पटकाविणारा राजू मेश्राम अजूनही चंद्रमोळी झोपडी आणि दारिद्रय़ाच्या अंधारातच आहे. यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील ९0४ लोकसंख्या वस्तीच गाव ससानी. गावालगतच कोलाम पोड. याच पोडातील एका १४ वर्षाच्या राजूने राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत दोनवेळा प्रथम क्रमांक घेऊन सुवर्णपदक पटकाविले. मात्र दुर्देव, ही गोष्ट त्या मोडक्या तोडक्या झोपडीबाहेर गेलीच नाही.
त्या कोलाम पोडात ७५ वर्षीय चंपत बापुण्या मेश्राम व त्याची पत्नी रखमाबाई झोपडीचा आश्रय व काठीचा आधार घेत आयुष्य कंठत आहेत. नातवाने शिकावे, नाव कमवावे, आमच्या वाट्याला आले तसे दारिद्रय़ त्याच्या आयुष्यालाही शिवू नये, म्हणून त्राण नसलेल्या शरीराने दोघेही कष्ट उपसतात. त्यांना राजू नावाचा १५ वर्षाचा नातू आहे. तो लहान असतानाच त्याची आई मरण पावली. त्याच्या वडिलाने दुसरे लग्न केले. तेव्हापासून ते सासरवाडीला राहतात. दोन दिवसाच्या सुटीवर आलेल्या गरीबीचे चटके सोसत असलेल्या राजूला बोलते केले तेव्हा खरंच त्याने गाठलेली उंची दिसून आली.
राजू गुलाब मेश्राम हा क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे ६ व्या वर्गापासून शिकतो आहे. यावर्षी तो दहावीत आहे. तो तेथे सराव करून सायकलिंगचे प्रशिक्षण घेतो आहे. त्याने गेल्या चार वर्षात पाच जिल्हास्तरीय, १२ राज्यस्तरीय तर पाचवेळा राष्ट्रीय स्तरावर, अशा सुमारे २२ वेळा सायकलिंग रेस स्पर्धेत भाग घेतला आहे. दोनवेळा तो राष्टीय स्तरावर प्रथम येऊन त्यास सुवर्णपदक सुद्धा मिळाले आहे. ऑक्टोबर २00९ मध्ये कर्नाटकमध्ये जामखंडी येथे झालेल्या १४ व्या राष्ट्रीयस्तरावरील सायकलिंग स्पर्धेत तो प्रथम आला होता. त्याने ५ किलोमीटरचे अंतर ७ मिनिट ५३ सेकंद ६0७ मायक्रो सेकंदात पार केले. तसेच पंजाबमध्ये पटियाळा येथे जानेवारी २00९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतसुद्धा ५00 मीटरचे अंतर केवळ ४४ सेकंद ८३३ मायक्रो सेकंदमध्ये पार करून तेथेही तो १३ वर्षाआतील मुलांसाठी असलेल्या स्पर्धेत प्रथम आला. तसेच डिसेंबर २00७ मध्ये आंध्रप्रदेश, हैद्राबाद, फेब्रुवारी २0११ मध्ये पंजाब (पटियाला), मे २0११ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतसुद्धा त्याने भाग घेतला होता. याशिवाय राज्यस्तरावर जळगाव, लातूर, गडचिरोली, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा ठिकठिकाणी झालेल्या १२ स्पर्धांमध्येसुद्धा सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली. वर्ग ८ मध्ये असताना ४ डिसेंबर २00८ मध्ये पामबीच रोड नेरूळ नवी मुंबई येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेतही तो प्रथम आला होता.
कोलाम या आदिवासी समजातील राजूला त्याचे म्हातारे आजी-आजोबा घरची एक एक बकरी विकून पैसे पुरवितात. त्यास प्रोत्साहन देतात. परंतु समाजातील कोणत्याही घटकाला, शासनाला याची माहिती नाही. खुद्द गावातील लोकांनाही कल्पना नाही. मी देश पातळीवरील स्पर्धेत प्रथम आलो. सुवर्णपदक मिळविले हे सांगूनही कोणी विश्‍वास ठेवत नाही, याची खंत राजूला सतत बोचत असते. त्याची क्रीडा प्रबोधिनी पुणेतर्फे अमरावती येथे २00५-0६ मध्ये निवड झाली. दि. ३0 सप्टेंबर २00५ ला जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत ८00 मीटर रिलेमध्ये प्रथम आला. सायकलिंग स्पर्धेत आवड असल्याने २00६-0७ मध्ये पुणे येथे गेला आणि तो राष्ट्रीय पातळीवरील खेळात पोहोचला. पुणे येथे मीलिंद झोडगे यांनी त्यास मार्गदर्शन केले. जरुर येथे असताना के.आर. राऊत या शिक्षकाने त्यास प्रोत्साहित केले. तर ससानीचे शिक्षक गुलाब सिसले आजही एकाकी असलेल्या राजुच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवितात. अडीअडचणीला मदत करतात. दारिद्रय़ाच्या खाणीतील या रत्नाला कुणीतरी घडवावे, एवढीच त्याच्या आजी आजोबांची माफक अपेक्षा.

विठ्ठल कांबळे
9421774062
साभार:- लोकमत

No comments:

Post a Comment