Pages

Friday 23 December 2011

घाटंजीतील राणा जिनींगला भिषण आग





येथिल अकोलाबाजार मार्गावर असलेल्या राणा जिनींगला आज दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सात लाखांचा कापुस जळुन भस्मसात झाल्याचा अंदाज आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास कापुस तोलाई करतांना वाहनाच्या सायलेंसर मधुन निघालेल्या ठिणगीमुळे बाजुलाच असलेल्या कापसाच्या गंजीला आग लागली. त्यात सुमारे दोनशे क्विंटल कापुस जळाला. जिनिंगच्या परिसरात अनेक कापसाच्या गाड्या असल्याने आग लागताच वाहनधारकांची धावपळ उडाली. यावेळी येथे उपस्थित शेतकरी, जिनिंग मधील कामगार व काही व्यापा-यांनी वेळेवर धावपळ करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये कैलास कोरवते, निलेश जुनगरे, शेरू देवतळे, विठ्ठल कडु, सलीम शेख, होनबा डंभारे, अविनाश भुरे, संजय वातीले, गोविंद परचाके, अभय कटकमवार यांचेसह जिनिंगच्या कामगारांचा समावेश आहे. नगर परिषदेचा पाण्याचा टँकर व एका खासगी टँकरने आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. यवतमाळ व वणी येथुन अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र यवतमाळ येथुन अग्निशमन यंत्रणेचे वाहन येण्यास सुमारे दोन तास तर वणी येथिल वाहनाला तिन तासांचा अवधी लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आग विझविण्यासाठी पावले उचलल्याने पेटलेल्या कापसाच्या गंजीलाच लागुन असलेल्या मोठ्या गंजी पर्यंत आग पसरली नाही. घटनेची माहिती मिळताच नायब तहसिलदार एस.व्ही.भरडे, सुरेश जयस्वाल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार, सहसचिव डी.डी.हिवरकर हे घटनास्थळी दाखल झाले. जिनिंग लगतच पेट्रोलपंप असल्याने तातडीने ते बंद करण्यात आले. विशेष उल्लेखनिय म्हणजे सदर जिनिंग मध्ये आग विझविण्यासाठी अथवा आगीपासुन बचाव व्हावा यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने यंत्रणेला धावपळ करावी लागली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी घटनास्थळी भेट दिली.


न.प. अध्यक्षपदासाठी ३ नामांकने

नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज ३ नामांकने दाखल करण्यात आले. कॉंग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी व किशोर दावडा तर शिवसेनेकडून शर्मिला उदार यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असल्याने संख्याबळानुसार कॉंग्रेसकडे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे.
साभार:- देशोन्नती

No comments:

Post a Comment