Pages

Showing posts with label कापुस. Show all posts
Showing posts with label कापुस. Show all posts

Wednesday, 5 December 2012

तोडफोडीचा खटला मागे घेण्यासाठी मनसेचे ‘ब्लॅकमेलिंग’

कृऊबास सभापती अभिषेक ठाकरे यांचा आरोप

दोन वर्षांपुर्वी मनसे कार्यकर्त्यांनी बाजार समिती मार्केट यार्ड व कार्यालयात केलेल्या तोडफोडप्रकरणी न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घ्यावा यासाठीच मनसे तक्रारींच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करीत असल्याचा आरोप कृ.ऊ.बा.स.सभापती अभिषेक ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला. आधारहीन तक्रारींमुळे केवळ कामात अडथळे निर्माण होत असुन त्यामुळे शेतक-यांचेच नुकसान होत आहे. घाटंजी बाजार समिती शेतक-यांच्या फायद्याचे उपक्रम राबवित आहे. अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय राहावा कोणत्याही घटकाचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समिती प्रयत्नशिल आहे. व्यापा-यांवर आमचे पुर्ण नियंत्रण आहे. शेतक-यांवर कुठेही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही दक्ष आहोत. खासगी बाजार समित्यांमुळे बाजारात स्पर्धा वाढल्याने व्यापा-यांप्रती टोकाच्या सक्तीचे धोरण अवलंबिता येत नाही. कारण व्यापारीच नसतील तर माल खरेदी कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तब्बल दोन कोटी रूपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प बाजार समितीने सुरू केला आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास आल्यावर शेतक-यांना सर्व सुविधा प्राप्त होतील. मात्र मनसेचे पदाधिकारी तसेच काही शेतकरी विरोधकांनी केलेल्या अर्थहीन तक्रारींमुळे हे काम रखडले. राजकीय दबावातून चुकीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम झाले असते तर ईलेक्ट्रॉनिक काट्यांच्या सहाय्याने कापुस मोजूनच थेट जिनिंगमध्ये पाठविता आला असता. एकीकडे मनसेचे कार्यकर्ते जिनिंगचे वजनकाटे सदोष असल्याच्या तक्रारी करतात. तर दुसरीकडे बाजार समिती मार्केट यार्डमध्ये उभारत असलेल्या ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांसह ईतर विकासकामांच्या तक्रारी करतात. त्यामुळे त्यांना नेमके काय अपेक्षीत आहे? याबाबत मनसेने आपली भुमिका स्पष्ट करावी असे ते म्हणाले. न.प.ने आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मग यावर आता तक्रारकर्त्यांनी माघार का घेऊ नये? या तक्रारींमुळे विधी विषयक कामांमध्ये बाजार समितीचा व्यर्थ खर्च होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर्षी शेतमाल तारण योजनेला शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रकल्पातील गोदाम पुर्णत्वास आले असते तर तिप्पट शेतक-यांना त्याचा फायदा झाला असता. व्यापा-यांकडून शेतक-यांचे शोषण होऊ नये म्हणुन सर्वत्र माहिती फलक लावण्यात आले आहेत. वजनकाट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी निरिक्षक नेमण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 
बाजार समितीच्या होत असलेल्या तक्रारी केवळ राजकीय हेतूने प्रेरीत व स्वत:च्या फायद्यासाठी असुन त्यामुळे शेतक-यांचे नुकसानच होत असल्याने शेतक-यांनीच याचा विचार करावा असेही ठाकरे म्हणाले. यावेळी उपसभापती प्रकाश डंभारे, सचिव कपिल चन्नावार उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती 


Friday, 16 November 2012

घाटंजी बाजार समितीच्या कापुस खरेदीचा शुभारंभ






येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापुस यार्डावर आज कापुस खरेदी तसेच शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचे हस्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. 
या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, शंकर ठाकरे, संजय इंगळे, शाम बेलोरकर, नामदेव आडे, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, न.प.शिक्षण सभापती राम खांडरे, किशोर चवरडोल, विवेक भोयर, चंपत आत्राम, संजय निकडे, रफिक बाबु, वंदना जिभकाटे, लक्ष्मण पोतराजे, श्री.गवळी, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे म्हणाले की, शेतक-यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. मार्केट यार्डावर ईलेक्ट्रॉनिक काट्यांद्वारे मोजमाप पद्धतीचा अवलंब करून शेतक-यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धान्यासाठी नाफेडची खरेदी सुरू करण्यात बाजार समितीने पुढाकार घेतला असुन सि.सि.आय.च्या खरेदीसाठीही बाजार समिती प्रयत्नरत आहे. उल्लेखनिय म्हणजे कापुस व्यापा-यांना ५ लाख रूपये तर अडत्यांसाठी २ लाख रूपये बँक गरंटी करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शेतक-यांच्या सुरक्षिततेकरीता मापा-यांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे. सेसबद्दल सुद्धा व्यापा-यांकडून आलेल्या अर्जावर धोरणात्मक निर्णय घेऊन शेतक-यांना जास्तीत जास्त भाव मिळवुन देण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांनी केले. यावेळी व्यापारी, अडते व शेतक-यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

साभार :- देशोन्नती 


Friday, 23 December 2011

घाटंजीतील राणा जिनींगला भिषण आग





येथिल अकोलाबाजार मार्गावर असलेल्या राणा जिनींगला आज दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सात लाखांचा कापुस जळुन भस्मसात झाल्याचा अंदाज आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास कापुस तोलाई करतांना वाहनाच्या सायलेंसर मधुन निघालेल्या ठिणगीमुळे बाजुलाच असलेल्या कापसाच्या गंजीला आग लागली. त्यात सुमारे दोनशे क्विंटल कापुस जळाला. जिनिंगच्या परिसरात अनेक कापसाच्या गाड्या असल्याने आग लागताच वाहनधारकांची धावपळ उडाली. यावेळी येथे उपस्थित शेतकरी, जिनिंग मधील कामगार व काही व्यापा-यांनी वेळेवर धावपळ करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये कैलास कोरवते, निलेश जुनगरे, शेरू देवतळे, विठ्ठल कडु, सलीम शेख, होनबा डंभारे, अविनाश भुरे, संजय वातीले, गोविंद परचाके, अभय कटकमवार यांचेसह जिनिंगच्या कामगारांचा समावेश आहे. नगर परिषदेचा पाण्याचा टँकर व एका खासगी टँकरने आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. यवतमाळ व वणी येथुन अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र यवतमाळ येथुन अग्निशमन यंत्रणेचे वाहन येण्यास सुमारे दोन तास तर वणी येथिल वाहनाला तिन तासांचा अवधी लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आग विझविण्यासाठी पावले उचलल्याने पेटलेल्या कापसाच्या गंजीलाच लागुन असलेल्या मोठ्या गंजी पर्यंत आग पसरली नाही. घटनेची माहिती मिळताच नायब तहसिलदार एस.व्ही.भरडे, सुरेश जयस्वाल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार, सहसचिव डी.डी.हिवरकर हे घटनास्थळी दाखल झाले. जिनिंग लगतच पेट्रोलपंप असल्याने तातडीने ते बंद करण्यात आले. विशेष उल्लेखनिय म्हणजे सदर जिनिंग मध्ये आग विझविण्यासाठी अथवा आगीपासुन बचाव व्हावा यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने यंत्रणेला धावपळ करावी लागली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी घटनास्थळी भेट दिली.


न.प. अध्यक्षपदासाठी ३ नामांकने

नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज ३ नामांकने दाखल करण्यात आले. कॉंग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी व किशोर दावडा तर शिवसेनेकडून शर्मिला उदार यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असल्याने संख्याबळानुसार कॉंग्रेसकडे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे.
साभार:- देशोन्नती