कृऊबास सभापती अभिषेक ठाकरे यांचा आरोप
दोन वर्षांपुर्वी मनसे कार्यकर्त्यांनी बाजार समिती मार्केट यार्ड व कार्यालयात केलेल्या तोडफोडप्रकरणी न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घ्यावा यासाठीच मनसे तक्रारींच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करीत असल्याचा आरोप कृ.ऊ.बा.स.सभापती अभिषेक ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला. आधारहीन तक्रारींमुळे केवळ कामात अडथळे निर्माण होत असुन त्यामुळे शेतक-यांचेच नुकसान होत आहे. घाटंजी बाजार समिती शेतक-यांच्या फायद्याचे उपक्रम राबवित आहे. अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय राहावा कोणत्याही घटकाचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समिती प्रयत्नशिल आहे. व्यापा-यांवर आमचे पुर्ण नियंत्रण आहे. शेतक-यांवर कुठेही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही दक्ष आहोत. खासगी बाजार समित्यांमुळे बाजारात स्पर्धा वाढल्याने व्यापा-यांप्रती टोकाच्या सक्तीचे धोरण अवलंबिता येत नाही. कारण व्यापारीच नसतील तर माल खरेदी कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तब्बल दोन कोटी रूपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प बाजार समितीने सुरू केला आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास आल्यावर शेतक-यांना सर्व सुविधा प्राप्त होतील. मात्र मनसेचे पदाधिकारी तसेच काही शेतकरी विरोधकांनी केलेल्या अर्थहीन तक्रारींमुळे हे काम रखडले. राजकीय दबावातून चुकीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम झाले असते तर ईलेक्ट्रॉनिक काट्यांच्या सहाय्याने कापुस मोजूनच थेट जिनिंगमध्ये पाठविता आला असता. एकीकडे मनसेचे कार्यकर्ते जिनिंगचे वजनकाटे सदोष असल्याच्या तक्रारी करतात. तर दुसरीकडे बाजार समिती मार्केट यार्डमध्ये उभारत असलेल्या ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांसह ईतर विकासकामांच्या तक्रारी करतात. त्यामुळे त्यांना नेमके काय अपेक्षीत आहे? याबाबत मनसेने आपली भुमिका स्पष्ट करावी असे ते म्हणाले. न.प.ने आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मग यावर आता तक्रारकर्त्यांनी माघार का घेऊ नये? या तक्रारींमुळे विधी विषयक कामांमध्ये बाजार समितीचा व्यर्थ खर्च होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर्षी शेतमाल तारण योजनेला शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रकल्पातील गोदाम पुर्णत्वास आले असते तर तिप्पट शेतक-यांना त्याचा फायदा झाला असता. व्यापा-यांकडून शेतक-यांचे शोषण होऊ नये म्हणुन सर्वत्र माहिती फलक लावण्यात आले आहेत. वजनकाट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी निरिक्षक नेमण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
बाजार समितीच्या होत असलेल्या तक्रारी केवळ राजकीय हेतूने प्रेरीत व स्वत:च्या फायद्यासाठी असुन त्यामुळे शेतक-यांचे नुकसानच होत असल्याने शेतक-यांनीच याचा विचार करावा असेही ठाकरे म्हणाले. यावेळी उपसभापती प्रकाश डंभारे, सचिव कपिल चन्नावार उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment