मुख्य कार्यकारी अधिका-यांचे निर्देश
अंजी (नृ.) येथिल गैरप्रकार
तालुक्यातील अंजी (नृ.) येथे भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी सात दिवसात दप्तर तपासणी करून एफ.आय.आर.दाखल करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांनी गटविकास अधिका-यांना दिले आहेत. पाणी पुरवठा समितीने केलेल्या आर्थिक अनियमिततेमुळे योजनेची कामे पुर्णत्वास गेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी कारवाई करावी. तसेच संबंधीतांच्या मालमत्तेतून वसुली पात्र रकमेचा बोजा चढविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश यापुर्वी गटविकास अधिका-यांना देण्यात आले होते. मात्र यावर अद्याप कार्यवाही करून अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे सात दिवसांच्या आत योजनेची दप्तर तपासणी करून एफ.आय.आर.दाखल करण्यात यावा असे आदेशात नमुद करण्यात आल आहे.
अंजी (नृ.) येथे पाणी पुरवठा करण्यासाठी भारत निर्माण योजनेंतर्गत २० लाख ६७ हजार रूपये निधी मंजुर करण्यात आला होता. मात्र पाणी पुरवठा समितीने या निधी मध्ये अफरातफर केली असा आरोप आहे. सरपंच गजानन भोयर यांच्या पत्नी छाया भोयर या समितीच्या अध्यक्ष आहेत. तत्कालीन सचिव ए.के.राजुरकर यांनी दबावातून सरपंचाच्या पत्नीलाच समितीचे अध्यक्ष केले असा ग्रामस्थांचा
आरोप आहे. समितीचे सचिव किसन मडावी, तर सरपंच गजानन भोयर, पं.स.चे माजी सभापती माणिक मेश्राम, वर्षा कांबळे, साहेबराव राऊत, दिलीप जगताप, राहुल अंजीकर, सुनिता जगताप, माया बुर्रेवार, वैशाली बेले, आशा बुरबुरे, सुशिला किनाके, सतिश पडगिलवार हे समिती सदस्य आहेत.
कामात झालेल्या अनियमिततेप्रकरणी एफ.आय.आर.दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांनी १८ नोव्हेंबरला दिले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबर पर्यंत काम पुर्ण करण्याचे हमीपत्र पाणी पुरवठा समितीने दिले होते. मात्र काम अद्यापही जैसे थे च आहे. वरिष्ठांचा आदेश असुनही गटविकास अधिकारी या प्रकरणात कार्यवाही करण्यास हयगय करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाणी पुरवठा योजनेत गैरव्यवहार करणा-यांविरूद्ध कार्यवाही करावी व योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अन्यथा तालाबंद आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment