Pages

Monday 17 December 2012

त्या बालकांचे मृतदेह पाहुन चिताही गहिवरली.....

मानोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार





काळीज चिरत जाणारा आक्रोश... हंबरडे अन आठवणींच्या हुंदक्यांनी व्यापलेले शोकमग्न वातावरण...  अशातच जेव्हा तिरडीवरील ते निरागस बालकांचे मृतदेह भडाग्नी देण्यासाठी चितेवर ठेवण्यात आले तेव्हा कदाचित त्या चितेलाही गहिवरून आले असेल. माणसाच्या देहाची काही क्षणातच राखरांगोळी करणारी ती निष्ठुर चिता देखिल ते निपचीत पडलेले देह पाहुन क्षणभर थांबली असणार. दोन भावांचे पार्थिव असलेली एक तिरडी व दुस-या तिरडीवर आणखी एका बालकाचे पार्थिव ठेवुन अंत्ययात्रा निघाली तेव्हा सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्या मुलांच्या मातापित्यांचा आकांत तर पाहावल्या जात नव्हता. पोटचा गोळा गमावल्याने हतबल झालेल्या त्या दोन्ही मातांची अनेकदा शुद्ध हरपली. काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिघांवर आज मानोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आबालवृद्धांसह मानोली गावातील जवळजवळ प्रत्येक माणूसच यावेळी स्मशानभुमि मध्ये उपस्थित होता. 
आरती व रामदास मोहुर्ले या दाम्पत्याची तुषार व समय ही दोन मुले, तर कुसूम व ज्ञानेश्वर निकोडे यांचा मुलगा शुभम. बालपणाच्या स्वच्छंदीपणातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. मानोली गावात काल रात्रीपासुनच भयाण शांतता होती. ऐकु येत होता तो फक्त रडण्याचा आवाज. मरण म्हणजे काय असते हे कळेल असेही ज्यांचे वय नाही ती गावातील बालके नेमके काय झाले हे न कळाल्याने चिंतातूर चेह-याने ईकडे तिकडे पाहतांना दिसत होती. तर मृतक विद्यार्थ्यांचे अनेक मित्र अक्षरश: ओक्साबोक्सी रडत होते. हे दृष्य पाहुन अनेकांच्या डोळ्यात आपसुकच अश्रु तराळले. 
या अंत्ययात्रेला तालुक्यातून अनेक लोक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, प.स.सभापती शैलेष इंगोले, जि.प.सदस्य पवार, न.प.सदस्य किशोर दावडा, गटविकास अधिकारी अजय राठोड यांचेसह प्रशासकीय कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. आज दिवसभर गावातील शाळा व दुकाने बंद होती. 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

No comments:

Post a Comment