लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व जनतेमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी महापंचायतीचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. यामध्ये सातत्य ठेवुन आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आव्हान पेलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केले. घाटंजी पंचायत समितीमध्ये आयोजीत महापंचायतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार होते. विभागीय आयुक्त डि.आर.बनसोड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मोघे म्हणाले की, पंचायतीची परंपरा ब-याच काळापासुन अस्तित्वात आहे. विवीध समस्यांसाठी नागरिकांना भटकावे लागु नये यासाठी हा उपक्रम चांगला आहे असे ते म्हणाले. अधिकाधीक लोकांपर्यंत हा विषय जावा यासाठी जनजाग्रृतीची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. शेतक-यांनी जोडधंदे केल्यास शेतीसाठी ते पुरक ठरेल. शेळीपालन, दुग्धव्यवसाय यासह अनेक व्यवसायांची कास शेतक-यांना धरता येईल. आपल्या भागातील नागरिक सक्षम व्हावे याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पदाधिका-यांची असल्याचे ते म्हणाले. येत्या सहा महिन्यात मतदार संघातील डोळ्यांच्या विकाराने पीडीत असलेल्या रूग्णांवर उपचार व चष्मे वितरीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांची समायोचीत भाषणे झालीत. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पथनाट्य सादर करण्यात आले. या महापंचायतीत काही नागरीकांच्या तक्रारींचे प्रातिनिधीक स्वरूपात वाचन करण्यात आले. आपली तक्रार सोडविली जाणार या अपेक्षेने अनेक नागरिकांनी तक्रार अर्ज भरून दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तहसिलदार प्रकाश राऊत, गटविकास अधिकारी अजय राठोड यांच्या मार्गदर्शनात कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment