जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार
घरात अवैध दारू विक्री केल्या जात असल्याचा संशय घेऊन घाटंजी पोलीसांनी भांबोरा येथे साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असतांना घरझडती घेतली. तसेच कुटूंबीयांना धाकदपट व मारहाण केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १४ डिसेंबर रोजी भांबोरा येथिल प्रेमसिंग चव्हाण यांचे घरी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम होता. यादरम्यान अचानक घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, बिट जमादार गुल्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल बोकडे तिथे आले. ‘तुम्ही दारूचा व्यवसाय करता, त्यामुळे तुमच्या घराची झडती घ्यायची आहे’ असे सांगुन पोलीस घरात घुसले. झडती दरम्यान घरातील सामानाची फेकाफेक केली. यावेळी साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी चव्हाण यांचे घरी पाहुणे सुद्धा आलेले होते. पोलीसांनी संपुर्ण घराची झडती घेतली. प्रेमसिंग चव्हाण यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तडकाफडकी उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकाराने घाबरलेले पोलीस तेथुन निघुन गेले. असे यशोदा प्रेमसिंग चव्हाण यांनी तक्रारीत नमुद केले आहे. उल्लेखनिय म्हणजे घरझडती मध्ये पोलीसांना काहीही गैर आढळले नसल्याची माहिती आहे. शिवाय ज्यांच्या घराची झडती घेण्यात आली त्यांच्यावर यापुर्वी अशा प्रकारच्या व्यवसायात लिप्त असल्याबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. मग पोलीसांनी अचानक अशी झडती घेण्याचे कारण काय? संपुर्ण तालुक्यात अवैध व्यवसायाचे नेटवर्क व्यवस्थित सुरू आहे. अशा व्यवसायांची झडती पोलीसांनी अद्याप का घेतली नाही. पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर चालणारे मटका अड्डे पोलीसांना का दिसत नाहीत असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे. अवैध व्यावसायीकांना पोलीसांचा धाक वाटत नसला तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र आता पोलीसांचीच भिती वाटायला लागली आहे. यावर प्रतिक्रीया घेण्यासाठी ठाणेदार अंबाडकर यांचेशी संपर्वâ होऊ शकला नाही.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment