Pages

Friday 21 December 2012

सांगितली तेवढी कामे करा किंवा घरचा रस्ता धरा !

स्व.गणपतराव कांडूरवार अपंग विद्यालयातील मनमानीपणा
कर्मचा-यांची तक्रार वरिष्ठांकडूनही बेदखल

नेमणुक शिपाई पदासाठी पण काम मात्र हातात पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे. कारण शिक्षकांच्या पदावर संस्थाचालकाचेच कुटूंबीय. अशीच परिस्थिती सफाईगार, स्वयंपाकी व पहारेकरी असलेल्या कर्मचा-यांची. ज्या पदासाठी नेमणुक आहे त्या कामासोबतच नेहमीसाठी अतिरिक्त कामाचा बोजा टाकुन कर्मचा-यांचे शोषण करण्याचा मनमानीपणा येथिल स्व.गणपतराव कांडूरवार निवासी अपंग विद्यालयात सुरू आहे. या प्रकाराचा अतिरेक सहन न झालेल्या कर्मचा-यानी जेव्हा याबाबत संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडे लेखी स्वरूपात आपले गा-हाणे मांडले तेव्हा त्यांना ‘जेवढी कामे दिल्या जातात तेवढी करावीच लागतील. जर हे मान्य नसेल तर तुमच्यासाठी घरचा रस्ता मोकळा आहे’ असे उत्तर मिळाले. त्यानंतर गिरीधर वाटगुरे, राजेंद्र महाजन, किशोर नगराळे, सुनयना खेकारे, बेबी खंडारे या कर्मचा-यांनी वरिष्ठांकडेही दाद मागितली मात्र अद्याप त्यांना कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. कर्मचा-यांच्या या पवित्र्यामुळे चिडलेल्या संस्थाचालकाने त्यांना विद्यालयात प्रवेशच नाकारला आहे. दि.७ डिसेंबर पासुन हे पाच कर्मचारी दररोज विद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर ठाण मांडून असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.यवतमाळ, समाजकल्याण अधिकारी तसेच समाजकल्याण सभापतींना जि.प.सदस्य मिलिंद धुर्वे यांचे मार्फत भेटून या कर्मचा-यांनी आपली कैफियत मांडली. मात्र यावर अद्याप कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. ऊलट संस्थाचालकाने या कर्मचा-यांना कामावरूनच काढुन टाकण्याचे कारस्थान सुरू केल्याची माहिती आहे. 
कर्मचा-यांना शाळेच्या आवारात प्रवेश द्यायचा नाही व त्यानंतर कामावर गैरहजर असल्याबाबत नोटीस देऊन कर्मचा-यांवरच दबाव टाकण्याचा संस्थाचालकाचा प्रयत्न आहे. आधीच अल्पवेतनावर काम करीत असलेल्या या कर्मचा-यांना दिवसातून चौदा तास राबविल्या जात असल्याची त्यांची तक्रार आहे. वरिष्ठांनीही अद्याप या गंभिर प्रकाराची दखल न घेतल्याने आता दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न या कर्मचा-यांपुढे निर्माण झाला आहे. 
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment