Pages

Showing posts with label समाजकल्याण. Show all posts
Showing posts with label समाजकल्याण. Show all posts

Friday, 21 December 2012

सांगितली तेवढी कामे करा किंवा घरचा रस्ता धरा !

स्व.गणपतराव कांडूरवार अपंग विद्यालयातील मनमानीपणा
कर्मचा-यांची तक्रार वरिष्ठांकडूनही बेदखल

नेमणुक शिपाई पदासाठी पण काम मात्र हातात पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे. कारण शिक्षकांच्या पदावर संस्थाचालकाचेच कुटूंबीय. अशीच परिस्थिती सफाईगार, स्वयंपाकी व पहारेकरी असलेल्या कर्मचा-यांची. ज्या पदासाठी नेमणुक आहे त्या कामासोबतच नेहमीसाठी अतिरिक्त कामाचा बोजा टाकुन कर्मचा-यांचे शोषण करण्याचा मनमानीपणा येथिल स्व.गणपतराव कांडूरवार निवासी अपंग विद्यालयात सुरू आहे. या प्रकाराचा अतिरेक सहन न झालेल्या कर्मचा-यानी जेव्हा याबाबत संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडे लेखी स्वरूपात आपले गा-हाणे मांडले तेव्हा त्यांना ‘जेवढी कामे दिल्या जातात तेवढी करावीच लागतील. जर हे मान्य नसेल तर तुमच्यासाठी घरचा रस्ता मोकळा आहे’ असे उत्तर मिळाले. त्यानंतर गिरीधर वाटगुरे, राजेंद्र महाजन, किशोर नगराळे, सुनयना खेकारे, बेबी खंडारे या कर्मचा-यांनी वरिष्ठांकडेही दाद मागितली मात्र अद्याप त्यांना कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. कर्मचा-यांच्या या पवित्र्यामुळे चिडलेल्या संस्थाचालकाने त्यांना विद्यालयात प्रवेशच नाकारला आहे. दि.७ डिसेंबर पासुन हे पाच कर्मचारी दररोज विद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर ठाण मांडून असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.यवतमाळ, समाजकल्याण अधिकारी तसेच समाजकल्याण सभापतींना जि.प.सदस्य मिलिंद धुर्वे यांचे मार्फत भेटून या कर्मचा-यांनी आपली कैफियत मांडली. मात्र यावर अद्याप कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. ऊलट संस्थाचालकाने या कर्मचा-यांना कामावरूनच काढुन टाकण्याचे कारस्थान सुरू केल्याची माहिती आहे. 
कर्मचा-यांना शाळेच्या आवारात प्रवेश द्यायचा नाही व त्यानंतर कामावर गैरहजर असल्याबाबत नोटीस देऊन कर्मचा-यांवरच दबाव टाकण्याचा संस्थाचालकाचा प्रयत्न आहे. आधीच अल्पवेतनावर काम करीत असलेल्या या कर्मचा-यांना दिवसातून चौदा तास राबविल्या जात असल्याची त्यांची तक्रार आहे. वरिष्ठांनीही अद्याप या गंभिर प्रकाराची दखल न घेतल्याने आता दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न या कर्मचा-यांपुढे निर्माण झाला आहे. 
साभार :- देशोन्नती 

Thursday, 29 March 2012

निकृष्ट अंथरूण पुरविल्याच्या निषेधार्थ समाजकल्याण कार्यालयात मनसेचे संतप्त आंदोलन




जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी साहित्याची तोडफोड केली. या विभागांतर्गत मागासवर्र्गीय विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थेमार्फत वसतिगृह चालविले जातात. तेथील विद्यार्थ्यांना नुकतेच गाद्या व इतर साहित्य पुरविण्यात आले. हे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे सहकार्‍यांसह समाजकल्याण विभागात आले. यावेळी त्यांनी समाजकल्याण अधिकारी कुठे आहे, अशी विचारणा केली. तेथील कर्मचार्‍यांनी साहेब बैठकीला गेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खूच्र्यांची व टेबलाची तोडफोड सुरू केली. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या गाद्या फाडून त्यातील रुई भिरकावली. त्यानंतर कार्यालयाबाहेर जाऊन सोबत आणलेल्या साहित्याला आग लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या आकस्मिक हल्ल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व इतर काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचे कार्यालय गाठले. साहेब आहेत का अशी विचारणा करुन कार्यालयातील साहित्याची तोडफोड सुरू केली. यात समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांच्या कक्षातील खूच्र्या, टेबल तोडले. कक्षातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले. त्यानंतर कर्मचार्‍यांचे टेबल व खूच्र्यांची फेकफाक करण्यात आली. एवढेच नाही तर सोबत आणलेल्या गाद्या फाडून त्यातील रुई कार्यालयात भिरकावली. यानंतर कार्यालयातून बाहेर पडून पटांगणात गाद्या जाळल्या. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा धुडगूस सुरू होता.
या प्रकाराची माहिती समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांना कळताच त्यांनी तातडीने कार्यालयात धाव घेतली. मात्र तोपर्यंत मनसेचे कार्यकर्ते निघून गेले होते. घटनेची माहिती पोलिसांना व वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दीपक केदार यांनी घटनास्थळाला भेट दिली. वडगाव रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सज्रेराव गायकवाड यांनीही पोलीस कुमकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

शासन जबाबदार नाही - ना. शिवाजीराव मोघे 
समाज कल्याण विभागांतर्गत खासगी संस्थेमार्फत वसतिगृह चालविल्या जाते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनातर्फे संस्थांना अनुदान दिल्या जाते. साहित्य खरेदी आणि निविदा या प्रक्रियेला शासन जबाबदार नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.

हल्ले सहन करणार नाही - सीईओ राम
न्याय मागण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असताना त्याचा वापर न करता गुंडागर्दी करुन अधिकारी व कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही. एकदाही तक्रार किंवा माहिती न देता थेट तोडफोड करण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया सीईओ नवलकिशोर राम यांनी दिली.

खरेदी राज्यस्तरावरून - अविनाश देवसटवार
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या गाद्यांचे कंत्राट राज्यस्तरावरुन देण्यात आले आहे. यात जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांनी दिली.

साभार :- लोकमत


Wednesday, 28 March 2012

वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे ‘अंथरूण’

समाजकल्याण विभागातर्फे कच-याच्या गाद्या
त्वचारोग व श्वसनाचे विकार बळावणार






समाजकल्याण विभागांतर्गत येणा-या वसतिगृहांसाठी अत्यंत सुमार दर्जाच्या गाद्या पुरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. घाटंजी तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतेक सर्व वसतिगृहांमध्ये नुकतेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी गादी व उशी असे साहित्य पाठविण्यात आले आहे.
या अंथरूणाच्या साहित्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा कापुस वापरण्यात आला आहे. शिवाय भुसा, कचरा, गुटख्याच्या पुड्यांचे तुकडे हे सुद्धा कापसासोबत मिसळण्यात आले आहे. अतिशय जाड्यभरड्या कापडाचा वापर करून या गाद्या व उशा शिवण्यात आल्या आहेत. शिलाई तर एवढी कामचलाऊ आहे की, हाताने अलगद काढता येईल. कापड जाडाभरडा असल्याने आतील कचरा व धुळ बाहेर येते. ही गादी थोडी झटकली तरी ओंजळभर धुळ जमा होते. हे सत्र संपत असल्याने वसतिगृह व्यवस्थापनांनी या गाद्या अद्याप विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी दिलेल्या नाहीत. या साहित्याचा उग्र दर्प येत असल्याने ज्या खोलीत या गाद्या साठवुन ठेवण्यात आल्या आहेत तिथे जाताच शिंका यायला लागतात. एका वसतिगृहातील कर्मचा-याने एक दिवस ही गादी वापरल्याने त्याच्या अंगाला खाज सुटून त्वचेवर चट्टे निघाल्याचे त्याने सांगीतले. गादी जमिनीवर अंथरताच धुळयुक्त कापसाचे कण वातावरणात पसरतात. यामुळे त्वचाविकारांसोबतच श्वसनाचे रोग उद्भवुन जीवीतालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत या गाद्यांवर माणसेच काय पण जनावरे सुद्धा झोपु शकणार नाहीत.
उल्लेखनिय म्हणजे दोन तिन वर्षांपुर्वीच वसतिगृहांना गाद्या पुरविण्यात आल्या होत्या. त्या गाद्यांना प्लास्टीकचे आवरण असलेला कापड वापरण्यात आल्याने अजुनही त्या गाद्या सुस्थितीत आहेत. त्यामुळे गरज नसतांना या जीवघेण्या अंथरूणाचा पुरवठा कशासाठी केला जात आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यातील अनेक वसतिगृह संचालक हे अंथरूणाचे साहित्य परत पाठविणार असल्याची माहिती आहे.
हे साहित्य समाजकल्याण विभागातर्फे पुरविण्यात येत असल्याने यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातही अशाच प्रकारच्या गाद्यांचा पुरवठा करण्यात आला असावा अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात पुरविण्यात आलेल्या गाद्या यवतमाळ येथेच तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक अधिका-यांनी या गाद्या वसतिगृहात पाठविण्यापुर्वी त्याचा दर्जा तपासला असणारच. मग आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकणा-या या गंभिर प्रकाराला मान्यता कशी मिळाली हा प्रश्न चर्चिल्या जात आहे. गाद्यांच्या या ‘धुळी’ मध्ये नेमके कोणाकोणाचे हात माखलेले आहेत याची चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती