समाजकल्याण विभागातर्फे कच-याच्या गाद्या
त्वचारोग व श्वसनाचे विकार बळावणार
समाजकल्याण विभागांतर्गत येणा-या वसतिगृहांसाठी अत्यंत सुमार दर्जाच्या गाद्या पुरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. घाटंजी तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतेक सर्व वसतिगृहांमध्ये नुकतेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी गादी व उशी असे साहित्य पाठविण्यात आले आहे.
या अंथरूणाच्या साहित्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा कापुस वापरण्यात आला आहे. शिवाय भुसा, कचरा, गुटख्याच्या पुड्यांचे तुकडे हे सुद्धा कापसासोबत मिसळण्यात आले आहे. अतिशय जाड्यभरड्या कापडाचा वापर करून या गाद्या व उशा शिवण्यात आल्या आहेत. शिलाई तर एवढी कामचलाऊ आहे की, हाताने अलगद काढता येईल. कापड जाडाभरडा असल्याने आतील कचरा व धुळ बाहेर येते. ही गादी थोडी झटकली तरी ओंजळभर धुळ जमा होते. हे सत्र संपत असल्याने वसतिगृह व्यवस्थापनांनी या गाद्या अद्याप विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी दिलेल्या नाहीत. या साहित्याचा उग्र दर्प येत असल्याने ज्या खोलीत या गाद्या साठवुन ठेवण्यात आल्या आहेत तिथे जाताच शिंका यायला लागतात. एका वसतिगृहातील कर्मचा-याने एक दिवस ही गादी वापरल्याने त्याच्या अंगाला खाज सुटून त्वचेवर चट्टे निघाल्याचे त्याने सांगीतले. गादी जमिनीवर अंथरताच धुळयुक्त कापसाचे कण वातावरणात पसरतात. यामुळे त्वचाविकारांसोबतच श्वसनाचे रोग उद्भवुन जीवीतालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत या गाद्यांवर माणसेच काय पण जनावरे सुद्धा झोपु शकणार नाहीत.
उल्लेखनिय म्हणजे दोन तिन वर्षांपुर्वीच वसतिगृहांना गाद्या पुरविण्यात आल्या होत्या. त्या गाद्यांना प्लास्टीकचे आवरण असलेला कापड वापरण्यात आल्याने अजुनही त्या गाद्या सुस्थितीत आहेत. त्यामुळे गरज नसतांना या जीवघेण्या अंथरूणाचा पुरवठा कशासाठी केला जात आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यातील अनेक वसतिगृह संचालक हे अंथरूणाचे साहित्य परत पाठविणार असल्याची माहिती आहे.
हे साहित्य समाजकल्याण विभागातर्फे पुरविण्यात येत असल्याने यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातही अशाच प्रकारच्या गाद्यांचा पुरवठा करण्यात आला असावा अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात पुरविण्यात आलेल्या गाद्या यवतमाळ येथेच तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक अधिका-यांनी या गाद्या वसतिगृहात पाठविण्यापुर्वी त्याचा दर्जा तपासला असणारच. मग आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकणा-या या गंभिर प्रकाराला मान्यता कशी मिळाली हा प्रश्न चर्चिल्या जात आहे. गाद्यांच्या या ‘धुळी’ मध्ये नेमके कोणाकोणाचे हात माखलेले आहेत याची चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment