Pages

Friday, 23 March 2012

ग्रामसेवकाचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू

घातपाताची दाट शक्यता
पोलीसांनी दाखल केला मर्ग

तालुक्यातील मांडवा येथे कार्यरत असलेले अमोल रामभाऊ चांदेकर (वय २९) या ग्रामसेवकाचा काल (दि.२१) ला विहिरीत पडून अकस्मात मृत्यू झाला. घटनास्थळावरील परिस्थितीवरून हा अपघात नसुन घातपात असल्याचा दाट संशय व्यक्त केल्या जात असल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दि. २१ मार्चला दुपारच्या सुमारास मांडवा शिवारात संजय पाचपोर यांच्या शेतात असलेल्या अधिग्रहीत विहिरीचे मोजमाप करण्यासाठी अमोल चांदेकर गेले होते. त्यांची दुचाकी ग्रा.पं.कार्यालयाबाहेर ठेवलेली होती. रात्री उशिरा पर्यंत ते न परतल्याने गावक-यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांचा मृतदेहच विहिरीत आढळला.  या घटनेची माहिती होताच रात्री तालुक्यातील समस्त ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. 
सकाळी पाच वाजताच्या सुमारास मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. हा मृत्यू अपघाती आहे अथवा यामागे काही घातपात आहे याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. उत्तरीय तपासणी दरम्यान मृतकाच्या गळ्यावर जखमा व लाल व्रण असल्याचे आढळुन आले. मृत्यू मात्र फुफ्फुसात पाणी गेल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामसेवक अमोल चांदेकर हे अधिग्रहीत विहिरीचे मोजमाप करण्यासाठी एकटेच गेले होते. त्यांच्या डायरी मध्ये विहिरीच्या मोजमापाच्या नोंदी सुद्धा आहेत. मात्र विहिरीची मोजणी एकटा व्यक्ती करू शकत नाही. पोलीसांनी पंचनामा करतांना विहिरीची मोजणी करून डायरीतील नोंदींशी पडताळणी केली असता नोंदी तंतोतंत जुळल्या. विहिरीची खोली एकटा व्यक्ती मोजू शकतो. मात्र लांबी, रूंदी व व्यास मोजण्यासाठी मदतनिसाची गरज असते. 
मात्र घटनेच्या दिवशी गावातील सरपंच, ग्रा.पं.चा शिपाई एका प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. चांदेकर यांनी गावातीलच एका मुलाला विहिर नेमकी कुठे आहे हे विचारण्याच्या हेतूने सोबत नेले होते. मात्र त्यांनी त्या मुलाला अध्र्यावरच परत पाठविले. एवंâदरीतच घटनास्थळावरील परिस्थिती व साहित्यावरून हा अपघात अथवा आत्महत्या नसुन घातपातच असल्याचा आरोप मृतकाचे वडील रामभाऊ चांदेकर यांनी केला आहे. घाटंजी पोलीसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण तपासात ठेवले आहे. पोलीसांचा तपास हत्येच्या दिशेने नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे घाटंजी पोलीस या प्रकरणात गांभिर्याने तपास करणार का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामसेवक संघटनांनी या प्रकरणी आक्रमक भुमिका घेतली असुन सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. मृतक अमोल चांदेकर यांचे वडील अकोला येथे तहसिलदार पदावर कार्यरत आहेत. ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्युची ही जिल्ह्यातील दुसरी घटना असल्याने ग्रामसेवकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
साभार :- देशोन्नती 



No comments:

Post a Comment