Pages

Showing posts with label अपघात. Show all posts
Showing posts with label अपघात. Show all posts

Tuesday, 14 May 2013

शिवसेना शहर उपप्रमुख राम गहणेवार यांचे अपघाती निधन


येथिल शिवसेनेचे शहर उपप्रमुख राम गहणेवार यांचे दि.१२ ला रात्री ९ च्या सुमारास अपघाती निधन झाले. सायंकाळी पांढरकवडा येथुन दुचाकीने घाटंजीकडे येत असतांना वासरी गावाजवळ विरूद्ध दिशेने येणा-या दुचाकीची परस्परांना जबर धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात गहणेवार यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने त्यांना यवतमाळ, सेवाग्राम व त्यानंतर नागपुरला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र नागपुरकडे जातांना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ३७ वर्षांचे होते. यावेळी दुचाकीवर त्यांचेसमवेत असलेले संतोष मादेशवार व विरूद्ध दिशेने येणा-या दुचाकीवरील दिनेश राठोर व राहुल उपावार दोघेही रा.वणी हे जखमी झाले. राम गहणेवार हे गेल्या अनेक वर्षांपासुन शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या मागे पत्नी, ३ महिन्यांची मुलगी, आई, ४ भाऊ, ४ बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. काल (दि.१३) ला दुपारी त्यांचेवर येथिल मोक्षधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंडीकाची झाडाला धडक : १ ठार
इंडीकाची झाडाला जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात वाहनचालक रमेश नारायण करमनकर (४२) रा.करंजी ता.केळापुर हे जागीच ठार झाले. काल (दि.१३) ला रात्री ६ वाजेदरम्यान नुक्ती गावाजवळ हा अपघात झाला. रमेश करमनकर हे एम.एच.०४ बि.ए.४४५२ या क्रमांकाच्या इंडीका कारने करंजीवरून घाटंजीकडे होते. 

Saturday, 27 April 2013

मृत्यूशी दहा महिन्यांची झुंज संपली !

प्रा.डॉ.कमलेश मुणोत यांचे निधन

अपघातात गंभिर जखमी झाल्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासुन अत्यवस्थ असलेले प्रा.डॉ.कमलेश मुणोत यांचे दि.२५ एप्रील ला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते. दि.१८ जुन २०१२ ला रात्री ८ वाजता नागपुर पांढरकवडा मार्गावर वडकी गावाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात प्रा.मुणोत व त्यांच्या पत्नी गंभिर जखमी तर मुलीला किरकोळ दुखापत झाली होती. तेव्हापासुन ते अत्यवस्थ होते. अखेर काल रात्री त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. एक शिस्तबद्ध प्राध्यापक असा त्यांचा लौकीक होता. ते येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. 
अनेक वर्ष त्यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रातही योगदान दिले. सांस्कृतिक कार्यक्रम, महाविद्यालयाचे विवीध उपक्रम, सहली यासह अनेक क्षेत्रात ते नेहमीच सक्रीय असायचे. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुली व मोठा आप्त परिवार आहे. येथिल मोक्षधामात त्यांचेवर शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठी मुलगी प्रिया हिने चितेला मुखाग्नी दिली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. त्यांच्या दु:खद निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Tuesday, 26 March 2013

एस.टी.- मेटॅडोअरच्या धडकेत १५ जखमी: ३ गंभिर


एस.टी.ने मेटॅडोअरला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले. घाटंजी पांढरकवडा मार्गावर नुक्ती गावाजवळ हा अपघात झाला. बसचालक रामु चौरे याचेसह विठोबा दौलत डंभारे व अरूण सदाशिव सहारे गंभिर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी यवतमाळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात अरूण रंदई (मांडवा), अनिता निखाडे (राजुर), श्रावण कांबळे, लक्ष्मी श्रावण कांबळे, साई श्रावण कांबळे, सुमित श्रावण कांबळे रा.हिंगणघाट, दिपक खंदारे, रेश्मा दिपक खंदारे, करण दिपक खंदारे, सुरज दिपक खंदारे, मुस्कान दिपक खंदारे रा.कुटकी (हिंगणघाट), पुजा भुपेंद्र लोहकरे हे प्रवाशी जखमी झाले. पांढरकवडा आगाराची एस.टी.बस क्रं.एम.एच.४० ८३०० पांढरकवड्याहून घाटंजीकडे येत होती. विरूद्ध दिशेने येत असलेल्या मेटॅडोअर क्र.एम.एच.३७ जी.३०१ ला या एस.टी.ची जबर धडक बसली.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 7 February 2013

घाटंजीतील पाच युवकांचा अपघातात करूण अंत

अंत्यसंस्काराला अवघी घाटंजी लोटली
पंधरवाड्यातील दुस-या दुर्दैवी घटनेने तालुका शोकमग्न





आमदार निलेश पारवेकर यांच्या अकाली निधनाच्या दु:खातून घाटंजी तालुका सावरलाही नसताना पाच जिवलग मित्रांच्या अपघाती मृत्यूची बातमी पहाटेच धडकली अन संपुर्ण शहरात स्मशान शांतता पसरली. सारेच काही सुन्न झाले. राहुल अशोक फ़ुसे (२२), अमोल प्रल्हाद गोडे (२३), सुमित सुरेश कांबळे (२४), अजय गणपत कुमरे (२७), आकाश उर्फ़ गोल्डी विजय गिरी (२२) या पाच मित्रांचा देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील शिरपुर गावाजवळ झालेल्या भिषण अपघातात करूण अंत झाला. सुमारे १५ दिवसांपुर्वी राहुल फ़ुसे याने घेतलेल्या इंडीगो कार क्रं.एम.एच.२९-२१७३ या गाडीने हे सर्व मित्र काल सायंकाळी नागपुर येथे गेले होते. त्यानंतर परत येतांना रात्री २.३० वाजताच्या सुमारास ट्रक क्रं.एम.एच.२६ एच.६१७२ या सोयाबिन नेणा-या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थीव शहरात आणण्यात आले. वसंत नगर, राममंदीर वार्ड, मानोली रोड या परिसरात राहणा-या या पाचही युवकांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. हजारो नागरिक अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. येथिल स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील अमोल प्रल्हाद गोडे हा वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व दोन बहिणी आहेत. तो येथिल पेट्रोलपंपावर काम करतो. सुमित सुरेश कांबळे हा देखिल वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व बहिण आहे. अजय कुमरे हा मानोली रोड भागात राहतो. हा सुद्धा पेट्रोल पंपावर काम करतो. राहुल फ़ुसे हा राममंदिर वार्डात राहत होता. तो हि कार भाड्याने देत होता. 
आकाश गिरी हा राम मंदिर वार्डातील रहिवासी आहे. त्याचे वडील गवंडी काम करतात. हे पाचही अत्यंत जिवलग मित्र होते. मोक्षधामात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. भयाण शांततेत मृतकांच्या नातलगांचा आक्रोश काळीज चिरून टाकत होता. घाटंजी तालुक्याच्या ईतिहासात प्रथमच स्मशानभुमीने एवढी गर्दी अनुभवली. संपुर्ण बाजारपेठ यावेळी बंद करण्यात आली होती. सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचेसह अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने घाटंजीकर नागरीक यावेळी उपस्थित होते. अनेकांनी घराच्या गच्चीवरून, रस्त्याच्या कडेवरून हा दु:खद प्रसंग अनुभवला. 
साभार :- देशोन्नती 

Sunday, 27 January 2013

दु:खद बातमी : आमदार नीलेश पारवेकर यांचे अपघाती निधन




यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश देशमुख पारवेकर (४५) यांचे  कार अपघातात निधन झाले. दारव्हा तालुक्यातील पांढुर्णाजवळ त्यांच्या कारला सायंकाळी ७.३0 च्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांना गंभीर अवस्थेत यवतमाळ येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
दारव्हा तालुक्यातील मोरगव्हाण येथील कार्यक्रम आटोपून महागाव (कसबा) येथे आ. पारवेकर फॉच्र्युनर वाहनाने जात होते. त्यांच्या सोबत जि. प. सदस्य बाळासाहेब मांगुळकर, माजी जि. प. सदस्य पंढरीनाथ गुल्हाने होते. आ. पारवेकर स्वत: वाहन चालवत होते. पांढुर्णा गावाजवळ आडवे आलेल्या जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. त्यांच्या वाहनाने तीन पलट्या घेतल्या. यात वाहनाचा चुराडा झाला. या अपघतात आ. पारवेकर यांचा मृत्यू झाला तर गुल्हाने गंभीर जखमी झाले. तर मांगुळकर यांना किरकोळ मार लागला. 
आज दुपारी चार वाजता त्यांच्या मुळ गावी पारवा येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. घाटंजी तालुक्यातील एक उदयोन्मुख नेतुत्व काळाच्या पडद्या आड गेल्याने अवघा तालुका शोकमग्न आहे. एक मोठ्या मनाचा माणुस, संवेदनशील राजकारणी व शब्द पाळणा-या नेत्याला जिल्ह्याने गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Click Below Link To Read News
आमदार निलेश पारवेकर यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Sunday, 13 January 2013

माझ्या भावाचा अपघात नव्हे तर खुन झालाय

'त्या' घटनेतील मृतकाच्या भावाची एस.पी.कडे तक्रार

यवतमाळ घाटंजी रस्त्याने मुरली शिवाराजवळ अपघात सदृष स्थितीत अफरोजखाँ पठाण यांचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद असतांना पोलीसांनी कोणताही तपास न करता या घटनेला अपघात म्हणुन नोंद केली. त्यामुळे मृतकाचा भाऊ फिरोज शमिउल्लखॉं पठाण रा.पारवा यांनी हा अपघात नसुन पुर्वनियोजीत कट करून खुन करण्यात आल्याचा आरोप जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
इमरानखॉं ताजखाँ पठाण, सलमा अफरोजखॉं पठाण, जावेदखॉं ताजखाँ पठाण, ताजखॉं सरदारखॉं पठाण, जमीलाबी ताजखाँ पठाण तसेच मृतकाचा मामा या कटात समाविष्ट असल्याचेही तक्रारीत नमुद आहे.
दि. ६ जानेवारी रोजी घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना मृतदेह ग्रामिण रूग्णालयात नेल्यावर देण्यात आली. तक्रारकर्त्याने हा अपघात नसुन खुन असल्याबाबतची तक्रार घाटंजी पोलीस स्टेशनला देण्याचा प्रयत्न केला सर्व नातेवाईकांनी हा खुन असल्याचे ठासुन सांगितले. मात्र ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्यांचेवर दबाव टाकुन अपघाताची नोंद केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. 
उल्लेखनिय म्हणजे मृतकाची पत्नी ही सुमारे १० महिन्यांपासुन भांडण करून वेगळी राहात होती. तिने पतीसह ईतर कुटूंबियांविरोधात तक्रारही केली होती. त्यानुसार त्यांचेवर ४९८ अ, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल असुन प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. घटनेच्या सुमारे ३ महिन्यांपुर्वी ईमरानखॉं ताजखाँ पठाण याने फोनवरून मृतकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत मृतक पारवा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला असता तक्रार नोंदविण्यात आली नाही. असा तक्रारीत आरोप आहे. मृतक हा घटनेच्या दिवशी यवतमाळ येथे होता. मग दुसरे दिवशी त्याचे प्रेत मुरली गावाजवळ कसे सापडले? प्रेत रस्त्याच्या एका बाजुला पडलेले होते. दुचाकीची चाबी रस्त्यावर पडली होती. दुचाकीचे केवळ सायलेन्सर व मागील लाईट फुटले होते. मोबाईल घटनास्थळी आढळला नाही. घटनेच्या दिवशी त्यावर कॉल केला असता कोणी उचलत नव्हते. मृतकाच्या कपाळावर ठोसा मारल्याची खुण होती. तसेच अंगावर मारहाण केल्यासारख्या जखमा होत्या. एकंदरीतच सर्व परिस्थिती व कौटूंबीक वादाची पार्श्वभूमी यावरून हा खुन असल्याचा थेट आरोप मृतकाच्या भावाने केला आहे. संबंधीतांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. जर मृतकाच्या कुटूंबीयांचा या घटनेबाबत असा आरोप होता तर घाटंजी पोलीसांनी तेव्हाच यादृष्टीने किमान चौकशी का केली नाही? फिर्यादींना धाकदडप का करण्यात आली? घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये नेहमीच असे प्रकार घडत असतानांही वरिष्ठ का गप्प आहेत असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.
साभार :- देशोन्नती 

Friday, 21 December 2012

घाटंजी पं.स.कर्मचारी रविंद्र उगले यांचे अपघाती निधन


अज्ञात मेटॅडोअरने दुचाकीला दिलेल्या धडकेत रविंद्र दिलीप उगले (२६) रा.मुरली याचा मृत्यू झाला. काल (दि.१९) ला रात्री ८.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. तो घाटंजी पंचायत समिती मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत फिरते विशेष शिक्षक पदावर कार्यरत होता. यवतमाळ येथुन परत येत असताना कोळंबी जवळ हा अपघात झाला. 
अपघातात गंभिर जखमी झाल्याने त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आज मुरली येथे शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, पं.स.सभापती शैलेष इंगोले यांचेसह पंचायत समितीचे कर्मचारी, जिल्ह्यातील फिरते विशेष शिक्षक उपस्थित होते. वडील हयात नसल्याने रविंद्र हाच घरातील कर्ता होता. मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र ओळखल्या जाणा-या एका तरूण कर्मचा-याच्या अकाली मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती

Tuesday, 11 September 2012

अपघातातील आरोपीच्या अटकेसाठी टिटवी येथे रास्तारोको





तालुक्यातील टिटवी बसथांब्यावर काही दिवसांपुर्वी झालेल्या अपघातातील आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी टिटवी येथे शिवसेना व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत दलाल यांचे नेतृत्वात सुमारे चार तास चक्काजाम करण्यात आला. भाजपाचा पदाधिकारी व खासदार हंसराज अहिर यांचा निकटस्थ असलेल्या राजु तोडसाम यांच्या स्विफ्ट कारने टिटवी बसथांब्याजवळ गणेश किशोर पोटवडे (वय ९) या विद्यार्थ्यास धडक दिली. यात तो विद्यार्थी गंभिर जखमी झाला. मात्र वाहन चालवित असलेल्या राजु तोडसाम यांनी कोणत्याही प्रकारचे सौजन्य न दाखवता घटनास्थळावरून पळ काढला. अपघातग्रस्त मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे अपघातास जबाबदार असलेल्या तोडसाम यांनी किमान उपचाराचा खर्च उचलावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. शिवाय पोलीसांनी सदर आरोपीस अटक करावी अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आरोपीस अटक करण्यात आली नाही. त्यामुळे आज टिटवी येथिल सुमारे २०० ते ३०० नागरिकांनी घाटंजी पांढरकवडा मार्ग जाम केला. त्यामुळे सुमारे ४ तास वाहतुक ठप्प झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन यांनी आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिल्यावरच गावक-यांनी मार्ग मोकळा करून दिला. यावेळी नायब तहसिलदार एस.व्ही भरडे, जयस्वाल हे उपस्थित होते. एका राजकीय पक्षाच्या कार्यकत्र्याची ही भुमिका अत्यंत निषेधार्ह असुन यापुढे त्यांना या मतदारसंघात फिरू देणार नाही अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत दलाल यांनी दिली.

साभार :- देशोन्नती  

Saturday, 1 September 2012

एस.टी.ने दुचाकीस्वारास चिरडले; १ ठार १ जखमी

घाटंजी - यवतमाळ मार्गावर भिषण अपघात


घाटंजी यवतमाळ मार्गावर सावरगड दर्ग्यापासुन सुमारे १ किलोमीटर अंतरावर एस.टी.बसने दुचाकीस भिषण धडक दिली. या धडकेत घाटंजी येथिल युवकाचा करूण अंत झाला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा भिषण अपघात घडला. या अपघातात विशाल सुभाष दिडशे (२०) हा एस.टी.खाली चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत दुचाकीवर असलेला गौरव सुरेश कुडेगावे (१९) हा जखमी झाला. हा अपघात एवढा भिषण होता की, मृतकाचे डोके फुटून मेंदू बाहेर आला. तर गौरव कुडेगावे हा जखमी आहे. त्याच्यावर यवतमाळ येथिल खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. नेर आगाराची एम.एच.४० ८५९४ क्रमांकाची एस.टी. बस घाटंजी येथुन यवतमाळला जात होती. तर मृतक व जखमी युवक एम.एच.२९ एक्स. ८१३३ या क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळहून घाटंजीकडे येत होते.  मृतक विशाल दिडशे हा यवतमाळ येथिल अध्यापक विद्यालयात डि.टी.एड. प्रथम वर्षाला शिकत होता. एस.टी.बसचा चालक हुकरे याला पोलीसांनी अटक केली. या घटनेची माहिती मिळताच घाटंजीतील सराफा मार्केट मधील व्यावसायीकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद केली. या दु:खद घटनेबद्दल तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती  


Tuesday, 19 June 2012

प्रा.कमलेश मुणोत अपघातात गंभिर जखमी


येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे जेष्ठ प्राध्यापक कमलेश मुणोत यांच्या वाहनाचा नागपुर येथून येतांना अपघात झाला. या अपघातात प्रा. कमलेश मुणोत व त्यांची पत्नी गंभिर जखमी झाले. तर त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. काल (दि.१८) ला रात्री ८ वाजेदरम्यान नागपुर पांढरकवडा मार्गावर वडकी जवळ हा अपघात झाला. ते कुटूंबासह सिंगापुरला सहलीसाठी गेले होते. तिथुन परतल्यावर नागपुरवरून ते घाटंजीकडे येत होते. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीचे संतुलन गेले. रस्ता दुभाजकाला धडकल्याने गाडी पलटी झाली. त्यांना गंभिर अवस्थेत सावंगी मेघे येथिल वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून प्रा. मुणोत यांना नागपुरच्या सिम्स रूग्णालयात व त्यांच्या पत्नीला अन्य एका रूग्णालयात हलविण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभिर परंतु स्थिर आहे. प्रा. मुणोत यांनी अनेक वर्ष घाटंजी येथे पत्रकारीतेच्या क्षेत्रातही कार्य केले आहे.



Friday, 13 April 2012

मोहदा येथे व-हाडाच्या वाहनाला अपघात: १ ठार; १२ जखमी


घाटंजी तालुक्यालगत असलेल्या मोहदा ता. पांढरकवडा येथे लग्न वरातीच्या वाहनाला आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर १२ व-हाडी जखमी झाले. मोहदा येथुन लग्न आटोपुन निघालेले मॅक्स पिक अप हे वाहन मोहद्यापासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोली गावाजवळ उलटले. त्यामुळे या वाहनात बसुन असलेले शिवलाल रायसिंग राठोड (४०) रा. कारेगाव यावली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या सुमारे १२ व-हाड्यांना यवतमाळ येथे भरती करण्यात आले असुन त्यापैकी गंभिर जखमी असलेल्या चौघांना सेवाग्राम येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. जखमींमध्ये पवन ठाकुर पवार (२७), विक्रम मधुकर पवार (१५), रूपेश राजु जाधव (१०), गुलाब जांभुळकर (२४), वाल्मीक ढोबळे (१६), जयश्री राजु जाधव (१२), दुर्गा राजु जाधव (३५), नरेश चांदेकर (३५) संदिप पवार (३२), राजु वासुदेव जाधव (२७), संतोष नेवारे (३५) यांचा समावेश आहे. कारेगाव तांडा येथिल गजानन रामदास राठोड याचे मोहदा येथिल दामु जाधव यांच्या मुलीशी लग्न होते. लग्न आटोपून परता जातेवेळी हा अपघात घडला. 


दोन लाखांची अफरातफर करणा-या आरोपींना  मध्यप्रदेशातून अटक

येथिल बिर्ला जिनिंग मध्ये कापसाच्या वजनकाट्यात खोडतोड करून जिनिंग मालकाला तब्बल १ लाख ८६ हजार रूपयांनी गंडा घालणा-या दोन आरोपींना मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात आली. काल (दि.१२) च्या मध्यरात्री घाटंजी पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी हितेष उर्फ रितेष राजु राठोड (२२) रा.शेगाव जि.खरगोन मध्यप्रदेश व रविराज मधुसूदन पवार (२२) रा.बंजर ता.भिकनगाव जि.खरगोन मध्यप्रदेश या आरोपींना रात्रीच घाटंजी येथे आणण्यात आले. सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरूनूले यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचारी उमेश चंदन व सारंग बालपांडे यांनी ही कार्यवाही केली. फिर्यादी गोपाल रूडमल मित्तल यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी आरोपींविरूद्ध कलम ४०६, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
साभार :- देशोन्नती 



Monday, 2 April 2012

छायाचित्रकार धम्मानंद कांबळे यांचे अपघाती निधन



येथिल युवा छायाचित्रकार धम्मानंद कांबळे वय (३२) यांचे आज रात्री ८ च्या सुमारास यवतमाळ येथिल खासगी रूग्णालयात दु:खद निधन झाले. आज सकाळी पांढरकवड्याजवळ दुचाकी वन्यप्राण्याला धडकल्याने झालेल्या अपघातात ते गंभिर जखमी झाले होते. त्यांच्या सोबत असलेले छायाचित्रकार संदिप धांदे हे सुद्धा अपघातात जखमी झाले असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाटंजी येथे छायाचित्रणाच्या व्यवसायामुळे सर्वांना सुपरिचीत असलेल्या धम्मानंद कांबळे यांच्या अकाली जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.

Sunday, 25 March 2012

ग्रामसेवक मृत्यूप्रकरणाचा तपास अद्याप अपघातावरच केंद्रित

मांडवा येथिल ग्रामस्थांचे तोंडावर बोट

ग्रामसेवक अमोल चांदेकर यांच्या संशयास्पद  मृत्यू प्रकरणी घाटंजी पोलीसांचा तपास संथगतीने होत असुन हा घातपात नव्हे तर अपघातच असल्याचा पोलीसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अपघातावरच घुटमळत असल्याने मोबाईलवरील संभाषणाचे ‘कॉल डीटेल्स’ पोलीसांकडे येईस्तोवर ठोस निष्कर्ष लागण्याची शक्यता मावळली आहे. 
बाभुळगाव तालुक्यातील ग्रामसेवक आशिष पाटील यांच्या खुनाच्या प्रकरणाची धग कमी होते न होते तोच मांडवा येथिल ग्रामसेवक अमोल चांदेकर यांचा मृतदेह दि. २१ मार्च रोजी एका शेतातील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला. सुरूवातीला हा अपघातच असल्याच असावा असे सर्वांनाच वाटत होते. मात्र सकाळी मृतदेह बाहेर काढल्यावर हा घातपातच आहे असा सुर उमटला. मृतकाचे वडील व अकोला येथे तहसिलदार पदावर कार्यरत असलेले रामभाऊ चांदेकर यांनी सुद्धा आपल्या मुलाचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप केला आहे. 
चांदेकर यांचा मृत्यू विहिरीत अपघाताने पडल्यामुळेच झाल्याचा अंदाज पोलीस वर्तवित आहेत. मात्र मृतकाच्या गळ्यावर आढळलेल्या जखमा, लाल खुणा, रक्ताने माखलेला चेहरा, विहिरीच्या बाजुला सुस्थितीत ठेवुन असलेली मोजपट्टी तसेच सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले आढळले. शिवाय मृतक हा पट्टीचा पोहणारा होता असे त्याच्या वडीलांचे म्हणणे आहे. मग अपघाताने पडल्यास मृत्यू कसा होऊ शकतो या संशयालाही जागा निर्माण होते. या सर्व बाबींमुळे हा अपघात असल्याच्या शक्यतेवर विश्वास बसत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसेवक अमोल चांदेकर यांनी एकट्याने भल्या मोठ्या व अडचणीच्या जागी असलेल्या विहिरीचे तंतोतंत मोजमाप कसे केले ? हा देखिल प्रश्न चर्चिल्या जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यातील ग्रामसेवकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मांडवा येथिल ग्रामस्थ या घटनेबाबत काहीही बोलायला तयार नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने काही ग्रामस्थांशी या प्रकरणाबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला त्याबद्दल काहीच माहित नाही असा एकमुखी सुर मांडवा येथिल ग्रामस्थांनी आवळला. 
एकंदरीतच या घटनेने निर्माण झालेले संशयाचे मळभ हटवायचे असेल तर उच्चस्तरीय चौकशी करून नेमके तथ्य शोधुन काढण्याची गरज आहे. स्थानिक पोलीसांनी तर या घटनेमध्येही नेहमीप्रमाणे औपचारीक सोपस्कार पुर्ण करून प्रकरण थंडबस्त्यात ठेवले आहे.
ग्रामसेवक संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ व उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी २६ मार्चला भव्य मोर्चाचे आयोजन केले असुन या मोर्चामध्ये जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या सर्वच संघटना सहभागी होणार आहेत. तसेच त्यानंतर ग्रामसेवक संघटना कामबंद आंदोलन करणार आहे. या आंदोलनामध्ये सर्व कर्मचा-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन म.रा.ग्रामसेवक संघटनेचे घाटंजी तालुकाध्यक्ष विश्राम वाडगे, डी.पी.तनमने, डी.के.पाटील, ए.एस.गाणार यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 



Friday, 23 March 2012

ग्रामसेवकाचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू

घातपाताची दाट शक्यता
पोलीसांनी दाखल केला मर्ग

तालुक्यातील मांडवा येथे कार्यरत असलेले अमोल रामभाऊ चांदेकर (वय २९) या ग्रामसेवकाचा काल (दि.२१) ला विहिरीत पडून अकस्मात मृत्यू झाला. घटनास्थळावरील परिस्थितीवरून हा अपघात नसुन घातपात असल्याचा दाट संशय व्यक्त केल्या जात असल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दि. २१ मार्चला दुपारच्या सुमारास मांडवा शिवारात संजय पाचपोर यांच्या शेतात असलेल्या अधिग्रहीत विहिरीचे मोजमाप करण्यासाठी अमोल चांदेकर गेले होते. त्यांची दुचाकी ग्रा.पं.कार्यालयाबाहेर ठेवलेली होती. रात्री उशिरा पर्यंत ते न परतल्याने गावक-यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांचा मृतदेहच विहिरीत आढळला.  या घटनेची माहिती होताच रात्री तालुक्यातील समस्त ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. 
सकाळी पाच वाजताच्या सुमारास मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. हा मृत्यू अपघाती आहे अथवा यामागे काही घातपात आहे याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. उत्तरीय तपासणी दरम्यान मृतकाच्या गळ्यावर जखमा व लाल व्रण असल्याचे आढळुन आले. मृत्यू मात्र फुफ्फुसात पाणी गेल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामसेवक अमोल चांदेकर हे अधिग्रहीत विहिरीचे मोजमाप करण्यासाठी एकटेच गेले होते. त्यांच्या डायरी मध्ये विहिरीच्या मोजमापाच्या नोंदी सुद्धा आहेत. मात्र विहिरीची मोजणी एकटा व्यक्ती करू शकत नाही. पोलीसांनी पंचनामा करतांना विहिरीची मोजणी करून डायरीतील नोंदींशी पडताळणी केली असता नोंदी तंतोतंत जुळल्या. विहिरीची खोली एकटा व्यक्ती मोजू शकतो. मात्र लांबी, रूंदी व व्यास मोजण्यासाठी मदतनिसाची गरज असते. 
मात्र घटनेच्या दिवशी गावातील सरपंच, ग्रा.पं.चा शिपाई एका प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. चांदेकर यांनी गावातीलच एका मुलाला विहिर नेमकी कुठे आहे हे विचारण्याच्या हेतूने सोबत नेले होते. मात्र त्यांनी त्या मुलाला अध्र्यावरच परत पाठविले. एवंâदरीतच घटनास्थळावरील परिस्थिती व साहित्यावरून हा अपघात अथवा आत्महत्या नसुन घातपातच असल्याचा आरोप मृतकाचे वडील रामभाऊ चांदेकर यांनी केला आहे. घाटंजी पोलीसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण तपासात ठेवले आहे. पोलीसांचा तपास हत्येच्या दिशेने नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे घाटंजी पोलीस या प्रकरणात गांभिर्याने तपास करणार का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामसेवक संघटनांनी या प्रकरणी आक्रमक भुमिका घेतली असुन सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. मृतक अमोल चांदेकर यांचे वडील अकोला येथे तहसिलदार पदावर कार्यरत आहेत. ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्युची ही जिल्ह्यातील दुसरी घटना असल्याने ग्रामसेवकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
साभार :- देशोन्नती 



Thursday, 26 January 2012

अपघातात तरूण ठार; एक जखमी


ट्रॅक्टरच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला तर दुसरा गंभिर जखमी झाल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. विजय शामराव भलावी (२२) रा. विद्याभुवन वार्ड घाटी, घाटंजी  असे मृताचे नाव आहे. तर मुन्ना अशोक ठाकरे हा जखमी आहे.  काल (दि.२४) ला रात्री ९ वाजेदरम्यान हा अपघात झाला. घाटंजी वरून पारव्याकडे जाणा-या ट्रॅक्टर क्र. एम.एच.२९ सी.४२५२ ने विरूद्ध बाजुने येणा-या दुचाकी क्र.एम.एच.३१ ए.एन.५९०७ ला जबर धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की दुचाकी सुमारे २० फुटावर  फेकल्या गेली. तर ट्रॅक्टर विजय याच्या अंगावरून गेल्याने विजय भलावी हा जागीच ठार झाला. अपघात झाल्यावर ट्रॅक्टरचालक फरार झाला. 
विजय भलावी हा तरूण पोलीस भरतीची लेखी परिक्षा पास झाला होता. दोन दिवसांनी मौखिक परिक्षेसाठी तो गडचिरोली येथे जाणार होता असे समजते.
साभार :- देशोन्नती