Pages

Showing posts with label अंत्यसंस्कार. Show all posts
Showing posts with label अंत्यसंस्कार. Show all posts

Tuesday, 29 January 2013

आमदार निलेश पारवेकर यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पारवा येथे उसळला प्रचंड जनसागर
साश्रुनयनांनी लाडक्या नेत्याला निरोप
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची गर्दी



यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश देशमुख पारवेकर यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घाटंजी तालुक्यातील पारवा येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत वीर शैव लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार दफन विधी करण्यात आला. शासकीय इतमामात हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. 
त्यांचे पार्थिव स्मृतिरथातून पारवा येथील त्यांच्या वाड्यावर आणण्यात आले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांसह सर्वसामान्य नागरिकांनी पारवा येथे धाव घेतली होती. संपूर्णगाव मूकशोक व्यक्त करीत होते. गावात सर्वत्र शांतता पसरली होती. आमदार पारवेकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या वाड्यात ठेवण्यात आले. त्यानंतर पार्थिव वाड्याबाहेर नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पारवा येथे आगमन झाले. त्यांनी आमदार नीलेश पारवेकरांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
त्यानंतर सर्वांनी मौन पाळून सामूहिक श्रध्दांजली अर्पण केली. पारवेकर घराण्याच्या कौटुंबिक स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. अंत्यसंस्काराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, राज्यमंत्री रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, खा.विलास मुत्तेमवार, खा.भावना गवळी, खा.सुभाष वानखडे, खा.हंसराज अहीर, अ.भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राजीव सातव, आ.गिरीश बापट, आ.विजय वडेट्टीवार, आ.रावसाहेब शेखावत, आ.वामनराव कासावार, आ.विजय खडसे, आ.संजय राठोड, आ.संदीप बाजोरिया, आ.रवी राणा, आ.प्रणिती शिंदे, आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, आ.अनिल बोंडे, आ.वसंत खोटरे, आ.प्रकाश डहाके, डॉ. एन. पी. हिराणी, उपस्थित होते. 
नीलेश पारवेकरांची अंत्ययात्रा यवतमाळ शहरातून पारवा येथे जाण्यासाठी निघाली तेव्हा 'आमदार नीलेश पारवेकर अमर रहे' च्या घोषणांनी आसमंत गहिवरून गेले. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. तर यवतमाळ शहरातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. 
राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक अंत्यदर्शन घेत होते. त्यांच्या निवासस्थानासमोर अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना निधी व मैत्रयी यानी हंबरडा फोडला तेव्हा वातावरण गहिवरले होते. आमदार नीलेश पारवेकर यांची अंत्ययात्रा पारवा येथील त्यांच्या वाड्यातून निघाली त्यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. पारवा येथे रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्व रस्ते चाहत्यांच्या गर्दीने गजबजले होते.


आमदार निलेश पारवेकर यांच्या अंत्यसंस्काराची निवडक छायाचित्रे

































  छाया :- महेंद्र देवतळे, अमोल राऊत



Friday, 21 December 2012

घाटंजी पं.स.कर्मचारी रविंद्र उगले यांचे अपघाती निधन


अज्ञात मेटॅडोअरने दुचाकीला दिलेल्या धडकेत रविंद्र दिलीप उगले (२६) रा.मुरली याचा मृत्यू झाला. काल (दि.१९) ला रात्री ८.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. तो घाटंजी पंचायत समिती मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत फिरते विशेष शिक्षक पदावर कार्यरत होता. यवतमाळ येथुन परत येत असताना कोळंबी जवळ हा अपघात झाला. 
अपघातात गंभिर जखमी झाल्याने त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आज मुरली येथे शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, पं.स.सभापती शैलेष इंगोले यांचेसह पंचायत समितीचे कर्मचारी, जिल्ह्यातील फिरते विशेष शिक्षक उपस्थित होते. वडील हयात नसल्याने रविंद्र हाच घरातील कर्ता होता. मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र ओळखल्या जाणा-या एका तरूण कर्मचा-याच्या अकाली मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती

Monday, 17 December 2012

त्या बालकांचे मृतदेह पाहुन चिताही गहिवरली.....

मानोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार





काळीज चिरत जाणारा आक्रोश... हंबरडे अन आठवणींच्या हुंदक्यांनी व्यापलेले शोकमग्न वातावरण...  अशातच जेव्हा तिरडीवरील ते निरागस बालकांचे मृतदेह भडाग्नी देण्यासाठी चितेवर ठेवण्यात आले तेव्हा कदाचित त्या चितेलाही गहिवरून आले असेल. माणसाच्या देहाची काही क्षणातच राखरांगोळी करणारी ती निष्ठुर चिता देखिल ते निपचीत पडलेले देह पाहुन क्षणभर थांबली असणार. दोन भावांचे पार्थिव असलेली एक तिरडी व दुस-या तिरडीवर आणखी एका बालकाचे पार्थिव ठेवुन अंत्ययात्रा निघाली तेव्हा सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्या मुलांच्या मातापित्यांचा आकांत तर पाहावल्या जात नव्हता. पोटचा गोळा गमावल्याने हतबल झालेल्या त्या दोन्ही मातांची अनेकदा शुद्ध हरपली. काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिघांवर आज मानोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आबालवृद्धांसह मानोली गावातील जवळजवळ प्रत्येक माणूसच यावेळी स्मशानभुमि मध्ये उपस्थित होता. 
आरती व रामदास मोहुर्ले या दाम्पत्याची तुषार व समय ही दोन मुले, तर कुसूम व ज्ञानेश्वर निकोडे यांचा मुलगा शुभम. बालपणाच्या स्वच्छंदीपणातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. मानोली गावात काल रात्रीपासुनच भयाण शांतता होती. ऐकु येत होता तो फक्त रडण्याचा आवाज. मरण म्हणजे काय असते हे कळेल असेही ज्यांचे वय नाही ती गावातील बालके नेमके काय झाले हे न कळाल्याने चिंतातूर चेह-याने ईकडे तिकडे पाहतांना दिसत होती. तर मृतक विद्यार्थ्यांचे अनेक मित्र अक्षरश: ओक्साबोक्सी रडत होते. हे दृष्य पाहुन अनेकांच्या डोळ्यात आपसुकच अश्रु तराळले. 
या अंत्ययात्रेला तालुक्यातून अनेक लोक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, प.स.सभापती शैलेष इंगोले, जि.प.सदस्य पवार, न.प.सदस्य किशोर दावडा, गटविकास अधिकारी अजय राठोड यांचेसह प्रशासकीय कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. आज दिवसभर गावातील शाळा व दुकाने बंद होती. 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...