मांडवा येथिल ग्रामस्थांचे तोंडावर बोट
ग्रामसेवक अमोल चांदेकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी घाटंजी पोलीसांचा तपास संथगतीने होत असुन हा घातपात नव्हे तर अपघातच असल्याचा पोलीसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अपघातावरच घुटमळत असल्याने मोबाईलवरील संभाषणाचे ‘कॉल डीटेल्स’ पोलीसांकडे येईस्तोवर ठोस निष्कर्ष लागण्याची शक्यता मावळली आहे.
बाभुळगाव तालुक्यातील ग्रामसेवक आशिष पाटील यांच्या खुनाच्या प्रकरणाची धग कमी होते न होते तोच मांडवा येथिल ग्रामसेवक अमोल चांदेकर यांचा मृतदेह दि. २१ मार्च रोजी एका शेतातील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला. सुरूवातीला हा अपघातच असल्याच असावा असे सर्वांनाच वाटत होते. मात्र सकाळी मृतदेह बाहेर काढल्यावर हा घातपातच आहे असा सुर उमटला. मृतकाचे वडील व अकोला येथे तहसिलदार पदावर कार्यरत असलेले रामभाऊ चांदेकर यांनी सुद्धा आपल्या मुलाचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप केला आहे.
चांदेकर यांचा मृत्यू विहिरीत अपघाताने पडल्यामुळेच झाल्याचा अंदाज पोलीस वर्तवित आहेत. मात्र मृतकाच्या गळ्यावर आढळलेल्या जखमा, लाल खुणा, रक्ताने माखलेला चेहरा, विहिरीच्या बाजुला सुस्थितीत ठेवुन असलेली मोजपट्टी तसेच सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले आढळले. शिवाय मृतक हा पट्टीचा पोहणारा होता असे त्याच्या वडीलांचे म्हणणे आहे. मग अपघाताने पडल्यास मृत्यू कसा होऊ शकतो या संशयालाही जागा निर्माण होते. या सर्व बाबींमुळे हा अपघात असल्याच्या शक्यतेवर विश्वास बसत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसेवक अमोल चांदेकर यांनी एकट्याने भल्या मोठ्या व अडचणीच्या जागी असलेल्या विहिरीचे तंतोतंत मोजमाप कसे केले ? हा देखिल प्रश्न चर्चिल्या जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यातील ग्रामसेवकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मांडवा येथिल ग्रामस्थ या घटनेबाबत काहीही बोलायला तयार नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने काही ग्रामस्थांशी या प्रकरणाबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला त्याबद्दल काहीच माहित नाही असा एकमुखी सुर मांडवा येथिल ग्रामस्थांनी आवळला.
एकंदरीतच या घटनेने निर्माण झालेले संशयाचे मळभ हटवायचे असेल तर उच्चस्तरीय चौकशी करून नेमके तथ्य शोधुन काढण्याची गरज आहे. स्थानिक पोलीसांनी तर या घटनेमध्येही नेहमीप्रमाणे औपचारीक सोपस्कार पुर्ण करून प्रकरण थंडबस्त्यात ठेवले आहे.
ग्रामसेवक संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ व उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी २६ मार्चला भव्य मोर्चाचे आयोजन केले असुन या मोर्चामध्ये जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या सर्वच संघटना सहभागी होणार आहेत. तसेच त्यानंतर ग्रामसेवक संघटना कामबंद आंदोलन करणार आहे. या आंदोलनामध्ये सर्व कर्मचा-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन म.रा.ग्रामसेवक संघटनेचे घाटंजी तालुकाध्यक्ष विश्राम वाडगे, डी.पी.तनमने, डी.के.पाटील, ए.एस.गाणार यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment