घाटंजीत शेकडो वाहने यार्डातून परतली
केंद्र शासनाने कापुस निर्यातबंदी केल्याने कापसाच्या भावात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे मार्केट यार्डामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असल्यामुळे शेतक-यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षेने
आजवर संग्रहीत ठेवलेला कापुस विक्रीस काढला होता. आज सुमारे ३०० ते ४०० कापसाची वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात लागलेली होती. मात्र आज कापुस खरेदी करणारे व्यापारीच यार्डात आले नसल्याने पेच निर्माण झाला होता. बाजार समिती कर्मचा-यांनी परिस्थिती शेतक-यांसमोर सांगताच काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. गतवर्षी यार्डामध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे तातडीने पोलीसांना पाचारण करण्यात आले. महसुल विभागाच्या अधिका-यांनी यार्डावर येऊन शासनाच्या निर्णयामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगीतल्यावर तणाव निवळला. त्यानंतर मोठ्या अपेक्षेने शेतक-यांनी विक्रीस आणलेला कापुस घरी परत नेला. कर्जफेडीच्या महिन्यातच शेतक-यांवर कोसळलेल्या या संकटामुळे शेतक-यांचे अवसान गळाले असुन कापुस परत न्यावा लागल्याने गाडी भाड्याचा आर्थिक भुदंड शेतक-यांना नाहक सहन करावा लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.
No comments:
Post a Comment