घाटंजीत रामनवमीची जय्यत तयारी
गत काही वर्षांपासुन घाटंजीकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या रामनवमी शोभायात्रेची जय्यत तयारी सध्या शहरात सुरू आहे. यावर्षीच्या शोभायात्रेमध्ये विवीध देखाव्यांसह
अष्टधातुंनी बनविलेला रत्नजडीत रामरथ प्रमुख आकर्षण राहणार आहे. हा रथ बनविण्याचे काम दिल्ली येथे सुरू असुन काशी विश्वनाथ येथिल कारागीर त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या रथामध्ये आठ प्रकारचे मौल्यवान धातू, चंदनाचे लाकुड, हिरे, मोती व नवरत्न वापरण्यात येणार आहे. या रथासाठी सुमारे दहा लाख रूपये खर्च येणार आहे.
शिवाय शोभायात्रेमध्ये राधाकृष्ण, शिवाजी महाराज, रामभक्त हनुमान यासह विवीध प्रकारचे देखावे राहणार आहेत. परळी वैजनाथ येथिल ढोल ताशा यावर्षीही गुंजणार असुन सोबतीला लेझिम झांज पथकही राहणार आहे. रामनवमी शोभायात्रेचा भव्य सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. घाटंजीच्या रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा उरत नाही एवढी प्रचंड गर्दी राहते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक राहणार आहेत.
घाटंजी शहराच्या मुख्य चौकात भव्य स्वागत कमानी उभारण्याचे काम सुरू असुन सर्वत्र भगवे झेंडे व पताका लावण्यात येत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे मौल्यवान रामरथ ओढण्यासाठी भक्तांना संधी मिळणार असुन त्यासाठी राम अग्रवाल यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील दानशुरांकडून ठिकठिकाणी थंड पेय, महाप्रसाद, थंड पाणी असे विवीध स्टॉल लावण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रिती कोल्ड्रींक्सचे भावेश सुचक, शुभमंगल बर्तन भंडार, रमेश सायरे, अशोक गावंडे, जलाराम मंदीर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शिवम हॉटेल, येथे पुरूषांसाठी तर शिव सायकल स्टोअर्स व डॉ. यमसनवार यांच्या घराजवळ महिलांसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना घाटंजी तालुक्यातील सर्व नागरीकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन शोभायात्रेचे संयोजक विक्रम जयस्वाल यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment