एच.एम.टी.तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांना यावर्षीचा वीर राजे संभाजी पुरस्कार देऊन शिवजयंती उत्सवात गौरविण्यात आले. यावेळी सुमारे १५ हजार घाटंजीकरांनी उभे राहुन दादाजींच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के होते. याप्रसंगी संपुर्ण खोब्रागडे कुटूंबीयांचाही सत्कार करण्यात आला. मराठमोळा वेश परिधान केलेल्या युवक युवतींनी गौरवचिन्ह सभामंडपात आणले तेव्हा सर्वांच्याच नजरा त्याकडे खिळल्या होत्या. राजेश उदार यांनी मानपत्राचे वाचन केले. पुरस्काराला उत्तर देताना दादाजी खोब्रागडे यांनी संशोधनाची प्रामाणीक भुमिका विशद केली. शासन शेतक-यांच्या समस्यांकडे कधीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के म्हणाले की, आजची पिढी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. या पिढीचा बुध्यांक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता मात्र भावनांक वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पुर्वीच्या काळी किती लढाया जिंकल्या यावर एखाद्या परिवाराला महत्व दिले जात असे. आज किती सॉफ्टवेअर इंजीनियर कुटूंबात आहेत याला महत्व आले आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना फाजील गोष्टींऐवजी लॅपटॉप घेऊन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. वीर राजे संभाजी पुरस्कारासाठी एका संशोधकाची निवड करून शिवजयंती उत्सवात विज्ञाननिष्ठतेला सुरूवात केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांचा पी.एच.डी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राजेश उदार व आभार प्रदर्शन दिपक महाकुलकर यांनी केले.
No comments:
Post a Comment