मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांचा सवाल
स्वत:चा खिसा भरण्यासाठी शासन व प्रशासनातील दलाल विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पद्धतीनेच त्याचा निषेध करणार अशी संतप्त प्रतिक्रीया मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी दिली. आमच्या आक्रमक पावित्र्यामुळे कर्मचा-यांची सुरक्षा धोक्यात आली आहे असे प्रशासनाला वाटते. त्याबद्दल त्यांनी आमच्या कृतीचा निषेधही नोंदवला आहे. मात्र गरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरच हल्ला करण्याच्या प्रकारावर सगळेच आपली जबाबदारी का झटकत आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शासकीय कार्यालयात निवेदने, तक्रारी कचराकुंडीतच जातात. त्यामुळेच आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ येते असेही धांदे म्हणाले. आम्हाला तोडफोड करण्याची संधीच मिळु न दिल्यास आम्ही प्रशासनाचे आभारी राहु. प्रशासनच नियम कायदे बासनात गुंडाळून आपला खिसा गरम करण्यात व्यस्त असेल तर आमच्याकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
गरीब विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणा-या या प्रकाराचे वृत्त ‘देशोन्नती’ मध्ये वाचताच तातडीने वसतिगृहात जाऊन अंथरूणाच्या साहित्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तिथले भयावह चित्र पाहताच राहवले नाही आणी त्या गाद्या दाखविण्यासाठी यवतमाळ येथे आणल्या. राज्य आणी जि.प. समाजकल्याण विभागाचे अधिकारी या गंभिर प्रश्नाबाबत टोलवाटोलवीचे उत्तरे देत असल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणी त्यामुळेच कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा आक्रमक पद्धतीने निषेध नोंदविला. जनतेच्या प्रश्नांसाठी लढतांना आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. शासन व प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर राहील असे ते म्हणाले. या गैरप्रकारात दोषी असलेल्यांवर कार्यवाही न झाल्यास मनसे जिल्ह्यात सर्वत्र आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगीतले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment