सपनाच्या निर्धन मायबापाचा सवाल
गुप्तधनासाठी नरबळी...माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार. मात्र पैशाच्या लालसेने तोंडाला पाणी सुटणा-या व चुकीने मनुष्य योनित जन्मलेल्या त्या लांडग्यांना त्याचे काय? अंधश्रद्धेचे भुत मानगुटीवर घेऊन ते एक चिमुकला जीव संपवायला निघाले होते. माणुसपण जीवंत असलेल्या ग्रामस्थांनी तो प्रकार हाणुन पाडला.
हे प्रकरण जेवढे घृणास्पद आहे त्यापेक्षा जास्त त्यानंतर झालेल्या घडामोडींनी संपुर्ण समाजाला कोड्यात टाकले आहे. एक आदिवासी समाजातील मुलगी दिड महिन्यापासुन बेपत्ता होते. त्यातच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न उजेडात येतो. मात्र पोलीस एवढ्या गंभिर प्रकरणातही नेहमीची ‘रफादफा’ भुमिका घेतात. आधी तर आरोपी गुप्तधनासाठी गेलेच नव्हते असा पवित्रा पोलीस घेतात. पण प्रकरण अंगलट आल्यावर गुप्तधनाचा प्रयत्न कबुल होतो. मात्र बेपत्ता सपनाच्या बाबत सर्वच कानावर हात ठेवतात. खुनासाठी अपहरणाचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा, बेपत्ता मुलीचा नसलेला सुगावा व गुप्तधन प्रकरणातील पुढे न आलेले आरोपी अशी परिस्थिती असतानांही पोलीसांना केवळ एकाच दिवसाची कोठडी मिळवता येते. आरोपींच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादावर पोलीस गप्प बसतात. आरोपींना न्यायालयीन कोठडीत नेतांना खासगी वाहनातून नेण्यात येते. गुप्तधन प्रकरण हाणुन पाडणारे ग्रामस्थ, फिर्यादी, मुलीच्या आईला तक्रार लिहुन देणारे वकील, पोलीस तपासात मदत व्हावी या दृष्टीने वृत्तांकन करणारे पत्रकार या सर्वांची पोलीस सखोल चौकशी करतात. मात्र आरोपींचीही अशा प्रकरणी प्रसंगी पोलीसी खाक्या दाखवुन ऊलटतपासणी करायची असते ही गोष्ट सोयीस्कररित्या दुर्लक्षीत केल्या जाते. गुप्तधन शोधणा-या टोळ्यांमध्ये केवळ चार पाच सदस्य नसतात ही गोष्ट पोलीसांना सांगण्याची गरज नसावी. दस-याच्या दिवशी चोरांबा येथिल विज बंद होते, कोणीतरी डि.पी.वरील फ्युज काढुन ठेवतो. अन त्याच दिवशी सपना बेपत्ता होते.
हा केवळ एक योगायोग की कटाचा भाग याचा तपास करणेही पोलीसांना गरजेचे वाटू नये का? फिर्यादीचे वारंवार बयाण घेऊन त्यातील विसंगती शोधण्यापलिकडे तपास गेलेला नाही. अशीच भुमिका राहिली तर यापुढे कोणी अशा घटनांमध्ये पोलीसांची मदत करायला पुढे येणार का?
पोलीस अधिक्षकांपासुन ते ठाण्यातील शिपायापर्यंत सर्वच याप्रकरणी नकारात्मक विचार करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीसांना नेमके सिद्ध काय करायचे आहे? गुप्तधनाची घटनाच झाली नाही का? पण आरोपींनी तर त्यासाठीच गेलो होतो अशी कबुली दिली आहे. सपना नावाची चिमुकली बेपत्ता नाही का? जर या आरोपांrनी तिला नेले नाही तर मग ती कुठे आहे? या दोन्ही प्रकरणातील किमान एकतरी बाजु पोलीसांनी स्पष्ट करून त्यांचे अस्तित्व आहे हे दाखवायला नको का? असे प्रश्न आता जनसामान्यांमध्ये चर्चिल्या जात आहे. सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघेंना पत्रपरिषदेत या विषयावर छेडल्यावर त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा गंभिरतेने तपास करण्याचे आदेश दिले. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. तालुका कॉंग्रेस मधील काही कार्यकर्ते या प्रकरणात गुंतले असल्याचीही चर्चा आहे. पण ते अद्याप चौकशीच्याही फे-यात आले नाहीत. ऊलट फिर्यादी व सपनाच्या परिवाराला तक्रार मागे घेण्यासाठी दडपणात आणल्या जात आहे. पोलीसांशी संबंधीत एक व्यक्ती पळसकर परिवाराला तुम्हाला मुलगी पाहिजे की पैसा असा प्रश्न विचारतो याचा अर्थ काय? घटनेच्या संशयास्पद तपासाची सुरूवात करणारे पोलीस अधिकारी अरूण गुरनूले तणावात का आहेत? हे सर्व प्रश्न तपासाबाबत संशय निर्माण करणारे आहेत.
सर्वसामान्यांना न्यायासाठी भटकावे लागू नये यासाठी उद्या घाटंजी येथे महापंचायत आयोजीत केली आहे. तर संपुर्ण राज्याला सामाजीक न्याय देण्याची जबाबदारी असलेले ना.शिवाजीराव मोघे व जिल्ह्याचे पालकत्व स्विकारलेले ना.नितिन राऊत याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. यावेळी तरी दिड महिन्यांपासुन न्यायासाठी वणवण भटकणा-या त्या मातेला दिलासा मिळणार का? गरिब असल्याने दुर्लक्षीत असल्याची तिची खंत दुर होणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment